भैरवनाथ हे भगवान शंकराचे एक रूप मानले जाते. भारतात अनेक ठिकाणी भैरवनाथास काळभैरव म्हणून पूजले जाते. करमाळा तालुक्यातील वाशिंबे या ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गावात ग्रामदैवत भैरवनाथाचे मंदिर स्थित आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीचे हे मंदिर पाचशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. भैरवनाथ हे वाशिंबे आणि लगतच्या प्रदेशाचे संरक्षक दैवत मानले जाते. या भागातील अनेक घराण्यांचे ते कुलदैवतही आहे. येथील भैरवनाथ नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामुळे येथे विशेषतः दर रविवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.
‘सिद्धांतबोध’ या ग्रंथामध्ये भैरवनाथांची आख्यायिका वर्णन केलेली आहे. हा ग्रंथ नगर जिल्ह्यातील पेडगाव येथे जन्मलेले मुस्लिम संतकवी शहामुनी यांनी लिहिलेला आहे. पेशवाईच्या काळात इ.स. १७७८ मध्ये या ग्रंथाची रचना करण्यात आली. या ग्रंथाप्रमाणेच ‘शिवलीलामृता’चे कर्ते थोर ग्रंथकार श्रीधरस्वामी नाझरेकर यांनीही भैरवनाथांची कथा मांडली आहे. त्यानुसार, प्राचीन काळी काळासूर नावाच्या एका दैत्याने दक्षिण भागातील ऋषी-मुनींचा मोठा छळ चालवला होता. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी ते शंकराकडे गेले. त्यांची याचना ऐकून शंकराने आपल्या जटा जमिनीवर जोराने आपटल्या. त्यातून एका सिद्ध पुरुषाची निर्मिती केली. त्याचेच नाव भैरवनाथ. शंकराच्या सांगण्यावरून त्याने पाताळलोकातील पाच कुंडांतील जल प्राशन करून दिव्य शक्ती प्राप्त केली व त्या योगे काळासुराचा वध केला.
भैरवनाथाला सिद्धनाथ, काळभैरव, भैरवनाथ, शिदोबा, सिद्धेश्वर या नावानेही संबोधले जाते. एका अख्याायिकेनुसार, भैरवनाथांचे भक्त डांगोजी यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन धाराशिव जिल्ह्यातील सोनारी येथून भैरवनाथ वाशिंबे येथे आले. डांगोजी हे दरवर्षी न चुकता सोनारी येथील भैरवनाथांच्या दर्शनाला पायी जात असत. एकदा पावसाळ्याच्या दिवसांत येथील सीना नदीला पूर आल्यामुळे डांगोजी यांना देवाच्या दर्शनासाठी सोनारी येते जाता आले नाही. त्यावेळी त्यांनी नदीतिरावर बसूनच भैरवनाथांना साकडे घातले. त्याच्या विनंतीवरून देव वाशिंबे येथे त्याला दर्शन देण्यासाठी आले.
त्याची खूण म्हणून मंदिराबाहेर असलेल्या दगडी चौथऱ्यावर देवाच्या पायाचे ठसे उमटलेले दाखविले जातात. चैत्र पौर्णिमेला देव येथे आले, अशी श्रद्धा आहे.
वाशिंबे गावाच्या वेशीवर प्रशस्त परिसरात भैरवनाथांचे हे प्राचीन मंदिर आहे. मंदिराभोवती असलेल्या सात ते आठ फूट उंचीच्या दगडी तटबंदीत मंदिराचे किल्लेवजा दगडी प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला स्तंभ व त्यात दीपकोष्टके आहेत. दुमजली प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर घोड्यावर स्वार भैरवनाथांची मूर्ती व त्याशेजारी दोन द्वारपालशिल्पे आहेत. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला असलेल्या मेघडंबरीत डावीकडे गरूड व उजवीकडे मारूतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या भिंतीलगत बाहेरील बाजूस तुलसी वृंदावन व अनेक विरगळ शिल्पे आहेत.
प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिरासमोर दोन्ही बाजूला मोठ्या चौथऱ्यांवर दोन दीपस्तंभ आहेत. मंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंडपात दर्शनमंडपाची रचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्हीकडे द्वारपालचित्रे व ललाटबिंबस्थानी देवीचे चित्र रंगवलेले आहे. सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीजवळ गणपती, विठ्ठल-रुख्मिणी आणि इतर देवतांच्या पाषाणी मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ एक पितळी घोडा व भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवीच्या पितळी पादुका आहेत.
गर्भगृहात वज्रपिठावर असलेल्या दगडी मखरात भैरवनाथ व जोगेश्वरी देवीच्या मूर्ती आहेत. या दोन्ही मूर्तींवर पितळी मुखवटे व मूर्तींच्या मध्यभागी पितळी नाग आहे. भैरवनाथांच्या डोक्यावर पगडी आहे. या मूर्तींच्या दोन्ही बाजूला दोन घोड्यांची शिल्पे आहेत. मूर्तींच्या समोरील बाजूस देव आणि देवीचे स्वयंभू पाषाण आहेत. या पाषाणांच्या दोन्ही बाजूला पितळी मुखवटे व घोडे आहेत. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी बाशिंगी कठडा व त्यात मध्यभागी कमळपुष्पात उभे असलेले शिखर आहे. या शिखरावर नक्षी कोरलेल्या आहेत.
हनुमान जयंती म्हणजेच चैत्र पौर्णिमेला या मंदिरात मोठी यात्रा आणि सप्ताह भरवला जातो. या सप्ताहामध्ये अखंड हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यात्रेच्या रात्री निघणाऱ्या मिरवणूकीत हजारो भाविक सहभागी होतात. यावेळी उंचच उंच काठ्यांना अनेक भगवे ध्वज लावून त्या नाचवल्या जातात. हा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातील अनेक भाविक येथे उपस्थित असतात.