सासवडमध्ये कऱ्हा नदीच्या काठावर साधारणतः ३५० वर्षांपूर्वीचे भैरवनाथाचे मंदिर आहे. सासवडचे ग्रामदैवत असलेले हे भव्य-दिव्य मंदिर सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांच्या ऐतिहासिक वाड्याला लागूनच आहे. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या काळात मंदिर बांधले गेले. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराभोवती २५ फूट उंचीची तटबंदी बांधली, अशा नोंदी आहेत.
दक्षिणाभिमुख असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी तटबंदीच्या दहा ते बारा पायऱ्या चढाव्या लागतात. मुख्य दरवाजातून प्रवेश करताच समोरच एक भलीमोठी पोर्तुगीज काळातील घंटा दिसते. चिमाजी आप्पा यांच्या नेतृ्त्वाखाली मराठ्यांनी १७३८-३९ या काळात पोर्तुगिजांविरुद्ध मोहीम आखली होती. त्यात मिळालेल्या विजयाचे चिन्ह म्हणून मराठ्यांनी आणलेल्या दोन घंटांपैकी ती एक आहे, तर दुसरी घंटा जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वारावर जय-विजय यांच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वारातून आत मंदिराच्या प्रांगणात गेल्यावर उजव्या बाजूला नगारखाना दिसतो. त्यामध्ये जुन्या काळातील वाद्ये आहेत. सणासुदीच्या दिवसांत ती वाजविली जातात. मंदिरासमोरील बाजूस दोन दगडी दीपमाळा आहेत. मुख्य मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन बाजूंनी दरवाजे आहेत. मुख्य मंदिर हे दगडी बांधकामातील असून त्यामध्ये केलेली लाकडी कामाची सुंदर गुंफण लक्ष वेधून घेते. तेथेच जुन्या काळातील काचेचे अनेक दिवे लावण्यात आले आहेत. अशा प्रकारचे दिवे इतरत्र क्वचितच आढळतात. सभा मंडपातील छत नक्षीदार आहे, तसेच भिंतींवर रामायण, महाभारत, शिवचरित्र आदींशी संबंधित प्रतिमा आहेत. गाभाऱ्यातील चांदीच्या मखरात श्री काळभैरवनाथ, श्री भैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या सुंदर मूर्ती विराजमान आहेत.
मंदिराच्या आवारात अनेक देवतांची लहान लहान मंदिरे आहेत. त्यामध्ये गणपती, श्री दत्त, महादेवाची पिंडी, गोरखनाथ महाराज, तुळजाभवानी, तसेच विठ्ठल-रुक्मिणी, संत सावता महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या मूर्ती आहेत.
या देवस्थानाचे वैशिष्ट्य असे की, येथे होणारी होळी ही प्रथम मानाची असते. सर्व ग्रामस्थांकडून त्यात टाकण्यासाठी सरपण, शेणाच्या गोवऱ्या आणल्या जातात. प्रथम मानाची ही होळी पेटविल्याशिवाय गावातील कोणतीही होळी पेटविली जात नाही, अशी येथील प्रथा आहे. याशिवाय फाल्गुन वद्य पंचमीला देवस्थानातर्फे मोठ्या प्रमाणावर रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात येतो.
सकाळी साडेपाच वाजता घंटानाद व सनई चौघडा वाजवून देवांना उठविले जाते. त्यानंतर मंदिरातील सर्व देवतांना अभिषेक केले जाते. सकाळी ११.३० ते १२.३० या कालावधीत माध्यान्ह पुजा व महानैवद्य अर्पण होते. सायंकाळी ६.३० ते ७ या वेळेत पंचारती होते. नवरात्रौत्सव, काळभैरवनाथ जन्मोत्सव असे विविध उत्सव येथे साजरे केले जातात. भाविकांच्या अडीअडचणींसंदर्भात देवाला कौल लावण्याची येथे प्रथा आहे. सकाळी ६, दुपारी १२ व रात्री ९ वाजता ते लावले जातात. भाविकांना सकाळी ५.३० ते रात्री ९.३० पर्यंत येथे देवदर्शन करता येते.