भैरवनाथ मंदिर

पांगरे, ता. करमाळा, जि. सोलापूर

शिवाचे उग्र भीषण असे रूप असलेली भैरव हे मूलतः लोकदैवत आहे. भैरव हा भगवान शंकराचा प्रमुख गण मानला जातो. तसेच पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखासही भैरव असे म्हणतात. महाराष्ट्रातील अनेकांचे ते कुलदैवत आहे. त्यामुळेच राज्यात अनेक ठिकाणी भैरवनाथाची मंदिरे आहेत. मात्र, यात्रेच्या वेळी केसांनी बारा बैलगाड्या ओढण्याची अनोखी प्रथा असलेले भैरवनाथाचे मंदिर पांगरे येथेच आहे. शेकडो वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. या यात्रेसाठी पांगरे येथे दरवर्षी अलोट गर्दी उसळते

भैरवनाथाला काही ग्रंथांत कालीमातेचा पुत्र मानले आहे. अनेक ठिकाणी क्षेत्रपाल म्हणूनही तो पूजनीय आहे. जुन्या शिवमंदिरांमध्ये भैरव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अवश्य विराजमान असतो. शंकराचे दर्शन घेण्याआधी भैरवाची परवानगी घ्यावी लागते, त्याने मान्य केले तरच शिवदर्शन होते, अशी जुन्या काळची समजूत होती. अनेक देवी मंदिरांमध्ये सुद्धा भैरव हा रक्षक किंवा द्वारपाल स्वरूपात दिसतो. भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली, तर ती निष्फळ मानली जाते. भैरव कुत्र्याबरोबर असतो वा त्याच्यावर स्वार होऊन राहतो, म्हणून त्याला श्वाश्व (कुत्रा हा ज्याचा अश्व म्हणजे वाहन आहे, तो.) म्हणतात. शैव आगमांनुसार भैरवाचे आठ वर्ग आहेत. त्यांच्या आठ प्रमुखांनाअष्टभैरवम्हणतात. गावागावात भैरवनाथ हा काळभैरवनाथ, काळभैरी, बहिरीनाथ, भैरी(नाथ), भैरोबा आदी विविध नावांनी विराजमान असतो.

पांगरे येथील भैरवनाथाचे हेमाडपंथी शैलीचे हे मंदिर प्राचीन आहे. मंदिराच्या पुजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फार पूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला होता. त्यानंतरही या मंदिरात वेळोवळी सुधारणा होत गेल्याच्या खुणा दिसतात. असे सांगितले जाते की पूर्वी हे महादेवाचे मंदिर होते या मंदिरापासून वरच्या बाजूला दीड किलोमीटर अंतरावर भैरवनाथाचे मूळ स्थान होते. एकदा एका भाविकास झालेल्या दृष्टांतानंतर भैरवनाथाच्या अस्तित्वाची खूण म्हणून या देवळात दोन खडे सापडले. त्यांचीच भैरवनाथ आणि जोगेश्वरी म्हणून मंदिरात स्थापना करण्यात आली. मात्र अद्यापही आषाढ महिन्यात भैरवनाथाची पालखी मूळ स्थानावर जाऊन कौल घेते. तो मिळाल्यानंतरच ती पुन्हा या मंदिरात येते. ही प्रथा दरवर्षी पाळली जाते. या मंदिराच्या गर्भगृहात सध्या दिसणाऱ्या भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्या मूर्तींची स्थापना नंतरच्या काळात करण्यात आलेली आहे

पांगरे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी भैरवनाथाचे हे मंदिर आहे. मंदिराभोवती असणाऱ्या उंच आवारभिंतीत बुरुजासारखे प्रवेशद्वार आहे. काही पायऱ्या चढून या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात आवारभिंतीच्या आतील बाजूला दोन दगडी दीपमाळा आहेत. याशिवाय काही सतीशिळा विरगळ आहेत. प्रवेशद्वाराच्या डावीकडे भिंतीत ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यांमध्ये बारा बैलगाड्या ठेवलेल्या आहेत. असे सांगितले जाते की उत्सवकाळात या सर्व बैलगाड्या एकमेकांना जोडल्या जातात विशिष्ट व्यक्ती त्या आपल्या केसांनी ओढतात.

मंडप, सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील मंडप हा नंतरच्या काळात मूळ मंदिरासमोर बांधलेला जाणवतो. सभामंडपाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या स्तंभशाखांच्या खालील बाजूला स्वागतिका आणि द्वाररक्षक शिल्पे कोरलेली आहेत. ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. सभामंडपातील देवकोष्टकात गणपतीची मूर्ती आहे येथे भैरवनाथाचे वाहन असलेला लाकडी घोडा आहे. उत्सवाच्या वेळी याच घोड्यावरून देवाची मिरवणूक निघते. गर्भगृहात वज्रपिठावर भैरवनाथ आणि जोगेश्वरीच्या उभ्या मूर्ती आहेत. करारी डोळे भारदस्त मिशा असलेल्या भैरवनाथाच्या मस्तकी फेटा आहे. जोगेश्वरी देवीच्या डोक्यावर पदर गळ्यात मंगळसूत्र आहे.

गर्भगृहावर असणारे शिखर हे पाच स्तरीय आहे. या सर्व स्तरांवर देवकोष्टके त्यात विविध देवता, साधूसंतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या अग्रभागी दोन आमलक त्यावर कळस आहे. मंदिराच्या मागील बाजूस इंदापूर येथील माळीणबाई यांचे मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजासमोर .. १७९८मध्ये समाधिस्त झालेले लिंगनाथ गोसावी डवरी महाराज, तसेच महायोगी सोमनाथ मुगाजीबाबा यांची समाधीस्थाने आहेत.

या मंदिरात भरणाऱ्या मुख्य यात्रेला परिसरातबैलगाड्या ओढण्याची यात्राम्हणून ओळखले जाते. त्याचा मुख्य उत्सव चैत्र पौर्णिमेला म्हणजे हनुमान जयंतीला असतो. तत्पुर्वी नऊ दिवस गावात घट बसतात. नऊ दिवस उपवास केले जातात. या यात्रेत गाड्या ओढण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते असे दोन जण यात्रेपूर्वीचे हे नऊ दिवस कोणाच्याही संपर्कात येऊ नये म्हणून स्वतःला एका खोलीत बंद करून घेतात. यात्रेच्या दिवशी ते आपल्या केसांनी या बारा बैलगाड्या ओढतात. त्या बैलगाड्यांवर गावातील लहान मुले बसलेली असतात. या यात्रेसाठी पंचक्रोशीतीलच नव्हे, तर परराज्यातूनही भाविक उपस्थित राहतात.

उपयुक्त माहिती

  • करमाळा येथून ३७ किमी, तर सोलापूरपासून १०६ किमी अंतरावर
  • करमाळा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : राजाभाऊ पुजारी, मो. ९६९९३०५८२९
Back To Home