‘कशास काशी, गया, अयोध्या जावे रामेश्वरी… असता श्रीहरी आमुचे घरी..’ असे बार्शीच्या भगवंताचे आणि त्याच्या महतीचे वर्णन केले जाते. या भगवंत मंदिरामुळे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीची एक धार्मिक क्षेत्र म्हणून ओळख आहे. अशी मान्यता आहे की या ठिकाणी भगवान श्रीविष्णूंचे लक्ष्मीसह वास्तव्य आहे. बार्शीचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरासाठी १७६० मध्ये नानासाहेब पेशव्यांनी, १८२३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने आणि १८७४ मध्ये ब्रिटिशांनी सनदा दिलेल्या आहेत. एखाद्या गावाचा जसा सरपंच असतो त्याप्रमाणे या मंदिराच्या प्रमुखाला सरपंच म्हणून ओळखले जाते.
मंदिराची अख्यायिका अशी की बार्शी हे पूर्वी बारस या नावाने ओळखले जात असे. बारस म्हणजे द्वादशी आणि त्यामुळे द्वादशी क्षेत्र म्हणून या ठिकाणाची ओळख होती. फार पूर्वी द्वादशी ही अंबरीष राजाची नगरी होती. हा अंबरीष राजा विष्णूभक्त होता. त्याने बारा वर्षे म्हणजे एक तप साधनद्वादशी व्रताचा संकल्प केला होता. दशमीला एकवेळेचे जेवण, एकादशीला निरंकार उपवास आणि द्वादशीला सूर्योदयाला उपवास सोडणे म्हणजे साधनद्वादशी व्रत होय. व्रत पूर्ण झाल्यावर राजाला इंद्राचे स्थान प्राप्त होऊ शकणार होते. व्रत पूर्ण होण्यासाठी एक द्वादशी शिल्लक राहिली होती. ती म्हणजे वैशाख शुद्ध द्वादशी. त्यामुळे इंद्राला आपले स्थान डळमळीत होण्याची भिती वाटली व त्याने दुर्वास ऋषींना पाचारण करून राजाचा व्रतभंग करण्यास विनविले.
इंद्राच्या विनविण्यानुसार दुर्वास ऋषी या द्वादशी क्षेत्री आले. दुर्वास ऋषी अंबरीष राजाचा व्रत भंग करण्यासाठी आले आहेत हे समजल्यावर येथील पुष्पावती नदीने आपला प्रवाह वाढविला व त्यांना पुढे येण्यास अडसर निर्माण केला. तेव्हा दुर्वास ऋषींनी पुष्पावती नदीला पालथी वाहण्याचा शाप दिला व आपला पुढे जाण्याचा मार्ग मोकळा केला. परंतु त्याच वेळी दुर्वास ऋषींनी काही ब्राह्मण राजवाड्यातून बाहेर येताना पाहिले व राजाचे व्रत पूर्ण झाले, अशी त्यांची समजूत झाली. कार्य सफल झाले नाही म्हणून दुर्वास ऋषींनी क्रोधाने आपटलेल्या जटांमधून एका दैत्याचा जन्म झाला.
दैत्यापासून अंबरीषाचे रक्षण करण्यासाठी प्रत्यक्ष भगवान विष्णू येथे प्रकट झाले व सुदर्शन चक्र सोडून त्यांनी या दैत्याचा संहार केला. त्यानंतर ते सुदर्शन चक्र दुर्वास ऋषींच्या मागे लागले. ऋषींनी अंबरीष राजाची क्षमा मागितल्यावर सुदर्शनचक्र शांत झाले आणि बार्शीतल्या उत्तरेश्वर मंदिरात विसावले. आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी प्रकट झालेल्या श्रीविष्णूंनी भगवंत या नावाने कायम येथेच राहावे, या अंबरीष राज्याच्या विनंतीनुसार श्रीविष्णूंनी येथेच वास्तव्य करण्याचे मान्य केले. तेव्हापासून हे मंदिर भगवंत मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
बार्शी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर स्थित आहे. मंदिराच्या प्रांगणाभोवती सुमारे ३० फूट उंचीच्या दगडी तटभिंती आहेत. या तटभिंतीत असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराला सोनेरी रंगाच्या पत्र्याने मढविलेले आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल व ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. गणपती मूर्तीच्या वरील बाजूला गरुडाचे शिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. दुमजली सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. अर्धखुल्या सभामंडपात असलेले सर्व लाकडी स्तंभ एकमेकांशी महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ शुभ्र संगमरवरी गरुडमूर्ती आहे. या सभामंडपाच्या छतावर प्राचीन काळात वापरले जाणारे काचेचे दिवे आहेत. येथे अखंड विणावादन केले जाते. सभामंडपात अंतराळासमोर गरुड खांब आहे. भगवंताच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक गरुडखांबाला प्रेमाने आणि श्रद्धेने आलिंगन देतो.
अंतराळ व गर्भगृहाचे बांधकाम हे दगडी आहे. अंतराळातील दगडी स्तंभांवर विविध नक्षीकाम व मूर्ती कोरलेल्या आहेत. याशिवाय अंतराळात श्रीदत्त, विठ्ठल-रुख्मिणी, जोगा परमानंद, गणपती आणि काही पुरातन मूर्ती आहेत. गर्भगृहात वज्रपिठावरील चांदीच्या मखरात भगवंताची गंडकी शिळेतून घडविलेली मूर्ती आहे. वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या मूर्तीच्या हातांत शंख, चक्र, गदा व पद्म आहेत. भगवंताच्या मस्तकावर शिवलिंग व छातीवर भृगुऋषींच्या पावलांची खूण आहे. मूर्तीच्या उजवीकडे अंबरीष राजाची मूर्ती व मागे लक्ष्मीची मूर्ती आहे. या मागे असलेल्या लक्ष्मीमूर्तीचे भाविकांना आरशातून दर्शन होते.
भगवंताचे परमभक्त जोगा परमानंद यांची समाधी मंदिरात उत्तरेकडील ओवरीत आहे. त्यांची पुण्यतिथी येथे प्रतिवर्षी साजरी होते. संत तुकाराम महाराजांनीही या मंदिराला भेट दिल्याचे उल्लेख आहेत. वैशाख शुद्ध षष्ठीपासून द्वादशीपर्यंत या मंदिरात श्रीविष्णूंचा प्रकटदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी सजविलेल्या रथातून भगवंताच्या उत्सवमूर्तीची मिरवणूक काढण्यात येते. उत्सव मूर्तीची ही नगरप्रदक्षिणा म्हणजे बार्शी शहरासह पंचक्रोशीचा जणू लोकोत्सवच असतो. या काळात देवस्थान ट्रस्ट आणि बार्शी नगरपालिकेतर्फे सात दिवस येथील भगवंत मैदानावर भगवंत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, संगीत रजनी आदींचा समावेश असतो. दरवर्षी आषाढी, कार्तिकी आणि माघी एकादशीला भगवंत मंदिर भक्तांच्या गर्दीने फुलून जाते. मंदिरात दररोज काकड आरती, महापूजा, धुपारती आणि शेजारती पार पडतात. दररोज सकाळी ५.३० ते रात्री ११.५५ पर्यंत भाविकांना या मंदिरात भगवंताचे दर्शन घेता येते.