बाराशिव हनुमान मंदिर

करंजाळा, ता. वसमत, जि. हिंगोली

जत्रा किंवा यात्रा म्हणजे महाराष्ट्राची धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि व्यापारी परंपरा होय. महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि मोठ्या अशा सुमारे बारा हजार जत्रा दरवर्षी भरतात. देवाचा मानपान, पूजा, पालखी, रथ मिरवणूक, गावपाटलाचा मानपान, बैलगाडा व कुस्तीच्या स्पर्धा, व्यापार, घोडेबाजार, बैलबाजार ही या जत्रांची प्रमुख ओळख असते. सुमारे पाचशे वर्षांची परंपरा असलेली अशीच एक प्रसिद्ध जत्रा वसमत तालुक्यातील करंजाळा येथील बाराशिव हनुमानाची भरते. हा जागृत देव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

हे मंदिर सुमारे पाचशे वर्षांहून अधिक प्राचीन असल्याचे येथील पुजारी व विश्वस्त सांगतात. करंजाळा, बोरी सावंत, गुंडा, रांजाळा, आजरसोंडा, जवळा बाजार, करंजी, विरेगाव, परळी, कळंबा, तपोवन, आडगाव या बारा गावांच्या शिवेवर हे मंदिर वसलेले आहे. त्यामुळे देवास बाराशिव हनुमान नावाने ओळखले जाते. या देवाबद्दल अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. त्यापैकी एका आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी या ठिकाणी हनुमानाची स्वयंभू पाषाण मूर्ती प्रकट झाली. ही बाब लगतच्या बारा गावांतील गावकऱ्यांना कळली, तेव्हा त्यांनी ही मूर्ती आपापल्या गावात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, अनेकानेक प्रयत्न करूनही मूर्ती जागची हालली नाही. त्यामुळे अखेर याच ठिकाणी मंदिर उभारण्यात आले. मंदिरातील पुजाऱ्यांनी सांगितलेल्या आख्यायिकेनुसार, करंजाळा गावातील एक हनुमान भक्त वनात राहून देवाचा धावा करीत असे. त्याला हनुमान प्रसन्न झाले तेव्हा भक्ताने देवास आपल्या गावी येऊन राहण्याची विनंती केली. ‘मी तुझ्या मागोमाग गावात येईन, परंतु पुढे चालत असताना ज्या ठिकाणी तू मागे वळून पाहशील, त्याच ठिकाणी मी मूर्तिरूपात स्थिर होईन’, असे म्हणून देव भक्ताच्या मागे चालू लागले. या ठिकाणी येऊन भक्ताचा विश्वास डळमळीत झाल्याने त्याने मागे वळून पाहिले, त्यामुळेच देव या ठिकाणी मूर्तिरूपात स्थिर झाले.

मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर मंदिराची मोठी दुमजली स्वागत कमान आहे. चार गोलाकार स्तंभांच्या वरील श्रीराम, लक्ष्मण, सीता व दास मारुती यांच्या मूर्ती आहेत. कमानीच्या छतावर तीन घुमटाकार शिखरे आहेत. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. मंदिराच्या पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगणात चौथऱ्यावर दीपस्तंभ आहे. मंदिराची रचना सभामंडप व गर्भगृह अशी आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारात दोन नक्षीदार स्तंभ आहेत. आणखी दोन स्तंभ दर्शनी बाजूच्या कोनांवर आहेत. सर्व स्तंभ महिरप कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपात मध्यभागी चार नक्षीदार गोलाकार स्तंभ आहेत. सर्व स्तंभ वर्तुळाकार स्तंभपादावर उभे आहेत. या स्तंभांच्या दंडावर पानाफुलांची नक्षी व शीर्षकमळ आहेत. छताच्या वितानावर चक्रनक्षीची सुंदर रचना दिसते. सभामंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर स्टेनलेस स्टीलचे कठडे लावून अंतराळाची रचना केलेली आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी दिसते, तर ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. गर्भगृहात वज्रपीठावरील मखरात हनुमानाची स्वयंभू पाषाण मूर्ती आहे. या शेंदूरचर्चित विशाल मूर्तीस धातूचा मुखवटा लावला आहे. गर्भगृहाच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. या प्रदक्षिणा मार्गावर मागील बाजूला बाहेर जाण्यासाठी दोन दरवाजे आहेत. मंदिराच्या छतावर चोहोबाजूने सुरक्षा कठडा आहे. त्यावर प्रवेशद्वाराच्या वरील बाजूला असलेल्या देवकोष्ठकात गणपती शिल्प आहे. कठड्यावर जागोजागी चौकोनी लघुशिखरांची रचना केलेली आहे. गर्भगृहाच्या छतावर सहा थरांचे षटकोनी शिखर आहे. शिखराच्या प्रत्येक थरात प्रत्येकी सहा देवकोष्ठके आहेत आणि शीर्षभागी आमलक आहे. आमलकावर कळस व ध्वजपताका आहे.

मंदिराच्या प्रांगणात अलीकडील काळात बांधलेले भक्तनिवास व प्राचीन काळातील धर्मशाळा आहे. पूर्वी येथे अनेक योगी, साधू, संन्यासी राहत असत, असे मंदिराचे पुजारी सांगतात. प्रांगणात ओंकारनाथ महाराज यांचे समाधी मंदिर आहे. सभामंडप व गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. गर्भगृहात वज्रपीठावर श्रीओंकारनाथ महाराजांची मूर्ती आहे. या मंदिराची स्थापना नंतरच्या काळात झालेली आहे. मंदिराच्या प्रांगणात दिवंगत महंत गंगागीर महाराज यांनी लावलेला सुमारे शंभर ते दीडशे वर्षे प्राचीन औदुंबर वृक्ष आहे. तसेच प्रांगणात स्वामी चिन्मयानंद महाराजांचे समाधी मंदिर देखील आहे. मंदिराच्या परिसरात प्राचीन सूर्य मंदिर आहे. सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिराच्या गर्भगृहात महालक्ष्मीची मूर्ती आणि सात घोड्यांच्या रथात स्वार झालेला सूर्यनारायण अशा मूर्ती आहेत. वर्षातील काही दिवस उगवत्या सूर्याची किरणे या मूर्तींवर अभिषेक घालतात असे पुजारी सांगतात.

सूर्यमंदिराच्या बाजूला चिन्मयानंद महाराजांचे निवास स्थान आहे. याच्या आत महाराजांची गादी, दंड व खडावा आहेत. मंदिराच्या बाहेर नवसाला पावणारा कौल लावण्याचा चिंतामणी पाषाण आहे. मंदिर परिसरात कोरीव पाषाणात बांधलेली सुमारे पन्नास फूट खोल व प्राचीन आयताकार पायरीबारव आहे. बारवेच्या पायरीमार्गाच्या दोन्ही बाजूला भिंतीत देवकोष्ठके आहेत. यातील एका देवकोष्ठकात चतुर्मुख शिवपिंडी व नंदी आहे. दुसऱ्या बाजूच्या देवकोष्ठकात श्रीगणेशाची शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे. प्राचीन काळी या बारवेच्या भिंतीवर रहाट होता व येथील पाण्याने शुचिर्भूत होऊन भाविक मारुतीच्या दर्शनाला जात असत. बारवेच्या बाजूला अलीकडील काळात बांधलेला उर्ध्वस्थ जलकुंभ आहे. प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह आहे.

मंदिरात पाच दिवसांचा माघ पौर्णिमेचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी आमदार-खासदारांच्या हस्ते देवाची मानाची पूजा पार पडते. सलग पाच दिवस मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, रामकथा, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. उत्सवाच्या निमित्ताने, मानकऱ्यांच्या हातून कापूर उजळण्याचा कार्यक्रम होतो. तसेच सर्व गावकरी मिळून श्रद्धेने देवाचा गाडा ओढतात. यात्रेनिमित्त कृषी प्रदर्शन, कुस्त्यांचे जंगी सामने, शंकरपट आदी खेळांचे आयोजन केले जाते. परिसरात विविध वस्तूंची दुकाने सजून तात्पुरती बाजारपेठ भरते. वस्तूंच्या खरेदी-विक्रीतून बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यात्रेसाठी राज्यातील व परराज्यातील हजारो भाविक येथे हजेरी लावतात. देवाचे दर्शन घेऊन ते नवस फेडतात. हनुमान जयंती हा मंदिरातील दुसरा मुख्य उत्सव आहे. या वेळी देवाचा जन्मोत्सव साजरा करताना भाविक पाळणे गातात. याशिवाय मंदिरात चैत्र पाडवा, रामनवमी, दसरा, दिवाळी इत्यादी सण व उत्सव साजरे केले जातात. श्रावण मासातील दर शनिवारी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी असते. तसेच अनेक राजकीय पुढारी नियमितपणे या देवाच्या दर्शनाला येत असतात.

उपयुक्त माहिती:

  • औंढा नागनाथ येथून १५ किमी अंतरावर
  • हिंगोली येथून ४० किमी अंतरावर
  • वसमत, औंढा नागनाथ येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे.

बाराशिव हनुमान मंदिर

करंजला, वासमत, जिला हिंगोली

Back To Home