बालाजी मंदिर

वाशिम, जि. वाशिम

पौराणिक आख्यायिकेनुसार भृगू ऋषींच्या आशीर्वचनाच्या योगे पृथ्वीवर भगवान विष्णूने घेतलेला अवतार म्हणजे बालाजी होय. देशभरात विष्णुरूपातील बालाजीची अनेक मंदिरे आहेत. त्यातीलच एक प्रसिद्ध व इतिहासकालीन मंदिर वाशिम येथे स्थित आहे. एखाद्या किल्ल्याप्रमाणे तटबंदीने घेरलेले हे मंदिर वाशिम जिल्ह्यातील मानाचे ऐतिहासिक व धार्मिक वारसास्थळ मानले जाते. विदर्भातील तिरुपती म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराची स्थापना नागपूरकर भोसले यांचे दिवाण भवानीपंत काळोजी (काळू) यांनी केली. या मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यामुळे उत्तरायण काळात येथे किरणोत्सव पाहावयास मिळतो.

बालाजी देवाबाबत आख्यायिका अशी की सत्ययुगात ऋषीमुनींच्या तपाचे फळसंचित कोणत्या देवाला द्यावे, याबाबत परीक्षा घेण्याकरिता भृगू ऋषी विष्णूकडे गेले. देवाची परीक्षा घेण्यासाठी भृगू ऋषींनी विष्णूच्या छातीवर लाथ मारली. तेव्हा विष्णूच्या हृदयात वास करणारी लक्ष्मी रागावून देवलोक सोडून पृथ्वीवर आली. विष्णूने भृगू ऋषींच्या पायाला श्रम पडले म्हणून त्यांचे पाय कुरवाळले व त्यांच्या पायाला असलेल्या गर्वाच्या डोळ्याचा नाश केला. तेव्हा भृगू ऋषींनी सर्व संचितफळ विष्णूला अर्पण केले व कलियुगात पृथ्वीवर प्रत्येक याचकाच्या इच्छा तू पूर्ण करशील, असा आशीर्वाद दिला. त्यानंतर विष्णू पृथ्वीवर बालाजी रूपात स्थापित होऊन भक्तांच्या इच्छा पूर्ण करू लागला.

बालाजीच्या येथील मंदिराचा इतिहास यांच्याशी निगडित आहे. सन १९३४ मध्ये प्रकाशित झालेल्या यादव माधव काळे लिखित ‘नागपूर प्रांताचा इतिहास’ या ग्रंथानुसार, भवानी काळोजी हे मंगरुळपीर तालुक्यातील खडीधामणी आदी गावांचे वतनदार पटवारी होते. ते ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण होते. त्यांच्या वडिलांचे नाव काळोजी असे होते. त्यावरून या घराण्यास काळू असे आडनाव पडले. भवानी काळोजी यांचा भाचा राजाराम वाळके हा प्रथम नागपूरचे जानोजीराजे भोसले यांचे बंधू साबाजीराजे यांच्याकडे नोकरीस होता. त्यावेळी साबाजींचे ठाणे व जहागीर दारव्हा येथे होती. राजाराम हा काही दिवसांनी साबाजीचा दिवाण झाला. त्यांच्या मार्फत भवानीपंत यांची साबाजी यांच्याशी ओळख झाली. कालांतराने ते साबाजींचे दिवाण झाले. पुढे त्यांचे जानोजीराजे भोसले यांच्याशी सख्य झाले व ते भोसल्यांच्या फौजेचे मुख्य सेनापती झाले.

भोसल्यांकडे ओडिशा (कटक) प्रांतातील चौथाईचा हक्क होता. त्या वसुलीसाठी शिवभट साठे याची कटक प्रांतावर सुभेदार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. परंतु त्याने मोठी अफरातफर केली. त्यामुळे जानोजीराजांनी एप्रिल १७६१ मध्ये त्याची सुभेदारी काढून घेतली. परंतु त्याने बंडखोरी सुरू केली व कटक प्रांतातील जमीनदारांना चिथावणी दिली. अखेरीस इ.स. १७६४ मध्ये जानोजीराजांनी आपले नातेवाईक चिमणाबापू यांस ओडिशाचा सुभेदार म्हणून नेमले. त्यावेळी त्यांच्यासमवेत कसलेला योद्धा म्हणून भवानीपंत काळोजी यांना पाठवण्यात आले होते. त्यांनी शिवभटाचा मोड करून त्याला कटक प्रांतातून हाकलून लावले. असे सांगण्यात येते, की या स्वारीच्या आधी चार वर्षे वाशिम येथे उत्खननात बालाजीची मूर्ती सापडली होती.

त्याविषयी ‘वाशिम गॅझेटियर’मध्ये अशी आख्यायिका नोंदवण्यात आली आहे की इ.स. १७६० च्या सुमारास येथे एक घोडेस्वार त्याच्याकडील काठीने सहज माती उकरत होता. त्यावेळी त्याला एका मूर्तीच्या हाताचा भाग दिसला. तेव्हा तेथे उत्खनन करण्यात आले. त्यात ब्रह्मा, बालाजी (विष्णू), महादेव, पार्वती, गणपती, नाग आणि देवी यांच्या मूर्ती आढळल्या. औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीच्या काळात विटंबना होऊ नये म्हणून या मूर्ती येथे गाडून ठेवण्यात आल्या होत्या. कालांतराने लोकांना त्यांचे विस्मरण झाले. त्यातीलच या मूर्ती होत्या. याविषयीची आणखी एक आख्यायिका अशी की १७७७ च्या सुमारास वाशिम येथे (सध्याच्या गोपाल टॉकिजजवळील चंद्रेश्वर मंदिरानजीक असलेल्या जागेत) एका राजपूत स्त्रीच्या अंत्यविधीकरिता जमीन खोदत असताना या मूर्ती सापडल्या. त्यात सध्याच्या बालाजी मंदिरात असलेली बालाजीची मूर्तीही होती. या मूर्तींची गोष्ट भवानीपंत काळोजी यांना समजताच ते त्या उत्खननस्थळी गेले व त्यांनी असा नवस केला, की मोहिमेत यश मिळाले, तर येथे बालाजीचे भव्य मंदिर उभारीन. ती मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी हे मंदिर उभारले.

गॅझेटियरमध्ये या मंदिराचे बांधकाम १२ वर्षे चालले, असे म्हटले आहे. यावरून या बांधकामास इ.स. १७६६ मध्ये प्रारंभ झाला व ते १७७८ मध्ये पूर्ण झाले. मंदिराच्या बाहेरील भागातील एका स्तंभावरील शिलालेखात मंदिर उभारणीची तिथी ‘श्रावण शुद्ध त्रयोदशी शके १७००’ (म्हणजे ६ ऑगस्ट १७७८) अशी नोंदवली आहे. काही अभ्यासकांच्या मते, यातील तिथी ही मंदिर बांधकामास प्रारंभ झाल्याची असून, हे बांधकाम १७८३ मध्ये पूर्ण झाले. भवानीपंत काळोजी यांच्या हस्ते येथे २२ ऑगस्ट १७८३ (श्रावण वद्य दशमी, शके १७०५) रोजी बालाजीची मूर्ती व अन्य देवतांच्या मूर्ती यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

सुमारे अडीचशे वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिरास चारही बाजूंनी परकोट (तटबंदी) आहे. त्यात पूर्वाभिमुख महाद्वार आहे. महाद्वारासमोरील पायऱ्यांच्या मधोमध एक प्राचीन पाषाणस्तंभ ठेवलेला आहे. त्यावर द्वारपालाचे शिल्प कोरलेले आहे. मंदिर प्राकाराचे महाद्वार दगडी बांधणीचे आहे. या उंच, भव्य महाद्वाराच्या प्रवेशकमानीच्या वरील भागात नगारखान्यासारखी रचना आहे. त्यात पाच छोटी जालवातायने आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना पायऱ्यांच्या आकाराची उतरती भिंत आहे. या महाद्वारास मोठे लाकडी दरवाजे आहेत. येथून मंदिराच्या दगडी फरसबंदी केलेल्या प्राकारात प्रवेश होतो. समोरच धातूचा उंच ध्वजस्तंभ आहे. नजीकच अष्टकोनी पद्मकुंड आणि तुळशीवृंदावन आहे. समोर खुल्या प्रकारचा भव्य लाकडी मंडप आहे. हा मंडप १९३७ मध्ये कृष्णराव यशवंतराव काळू यांनी उभारला, असे सांगण्यात येते. येथील मुख्य मंदिरवास्तू उंच जगतीवर उभारलेली आहे.

मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या प्राचीन मंदिराची संरचना आहे. चार पायऱ्या चढून मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश होतो. मुखमंडपाचे प्रवेशद्वार दुहेरी स्वरूपाचे, महिरपी कमान असलेले आहे. त्यावरील छताच्या खालच्या बाजूस कोरीव तरंगहस्त आहेत. मुखमंडपाच्या छतास एक धातूची जुनी, दुर्मीळ स्वरूपाची घंटा टांगलेली आहे. प्रमाणापेक्षा मोठी लोळी हे या घंटेचे वैशिष्ट्य होय. आत सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस काचेच्या कपाटांत जय आणि विजय या द्वारपालांच्या प्राचीन मूर्ती ठेवलेल्या आहेत. सभामंडपाचे दगडी प्रवेशद्वार साधे त्रिशाखीय असून, द्वारचौकटीच्या बाजूस स्तंभाकार कोरलेले आहेत. चौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशशिल्प आहे. उतरांग भागावर नक्षीकाम केलेले तोरण आहे, तर मंडारकावर कीर्तिमुखे कोरलेली आहेत. गोलाकार सभामंडपात चारही बाजूंनी चौकोनाकार स्तंभ कोरलेले आहेत. या स्तंभांवर अर्धगोलाकार तरंगहस्त आहेत. त्यांमुळे दोन स्तंभ एकमेकांस गोलाकार कमानीने जोडलेले असल्याचे दिसते. सभामंडपास तिन्ही बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. सभामंडपातील जमिनीवर भाविकांनी ठोकून बसवलेली अनेक नाणी पाहावयास मिळतात. इतक्या वर्षांच्या काळात सततच्या वावरामुळे ही नाणी गुळगुळीत झालेली असली, तरी काही नाण्यांवरील कोरीवकाम आजही दिसते. सभामंडपात मध्यभागी कूर्मशिल्प विराजमान आहे.

मंदिराच्या अंतराळाचे महिरपी प्रवेशद्वार निळ्या-जांभळ्या काचेच्या तुकड्यांनी सजविलेले आहे. या प्रवेशद्वाराच्या डावीकडील भिंतीसमोर तिरुपती बालाजी आणि या मंदिरातील बालाजी यांच्या मोठ्या तसबिरी लावलेल्या आहेत. गर्भगृहातील मागच्या भिंतींमध्ये कोरलेल्या एका उंच दगडी मखरामध्ये बालाजीची भरजरी वस्त्र व पुष्पमालांनी शृंगारलेली उंच मूर्ती प्रतिष्ठापित आहे. ही विष्णू जनार्दनी मूर्ती आहे. ती वरील भागात त्रिकोणी आणि खालील भाग आयताकृती असलेल्या शिळेवर कोरलेली आहे. मूर्ती चतुर्भुज असून, तिच्या हातांत शंख, चक्र, गदा व पद्म आहे. मूर्तीच्या मस्तकी चांदीचा मुकुट आहे.

मूर्तीच्या पायथ्याशी बालाजीची धातूची उत्सवमूर्ती विराजमान आहे. या उंच दगडी मखराच्या दोन्ही बाजूंना तीन-तीन अशी छोटी देवकोष्ठके आहेत. त्यात उत्खननाच्या वेळी सापडलेल्या प्राचीन मूर्ती प्रतिष्ठापित केलेल्या आहेत. यांत विष्णू, महादेव, सरस्वती, लक्ष्मी, गणपती आदी मूर्तींचा समावेश आहे. या मूर्ती ११ व्या शतकातल्या असाव्यात, असा तर्क त्यांच्या रचनाशैलीवरून लावला जातो. मंदिराच्या गर्भगृहावर १८ व्या शतकातील मराठा स्थापत्यशैलीतील उंच शिखर आहे. सुवर्णरंगाने झळाळणाऱ्या शिखरावर चारी बाजूंनी देवकोष्ठके आहेत. अनेक छोट्या कळसांनी सजवलेल्या या शिखराच्या शीर्षभागी मोठा कळस आहे. मंदिराच्या परकोटाच्या आत तिन्ही बाजूंना जुन्या वाड्याप्रमाणे बांधलेल्या इमारती आहेत. यांतच, मंदिराच्या मागच्या बाजूस नरसिंहाचे मंदिर आहे. हे मंदिर वर्षातून एकदा नरसिंह जयंतीला उघडले जाते. एके ठिकाणी रथोत्सवात वापरला जाणारा लाकडी रथ ठेवलेला आहे. मंदिराजवळच देवतलाव नामक पुष्करिणी आहे. त्यास बालाजी तलाव असेही म्हटले जाते. हा तलाव बालाजी मंदिराच्या बांधकामावेळी बांधण्यात आला.

बालाजी मंदिरात रोज सकाळी ६ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत भाविक देवदर्शन घेऊ शकतात. येथे रोज पहाटे काकड आरती होते. याचबरोबर सकाळी ६.३० ते ८.३० या काळात उत्सवमूर्तीस अभिषेक, सकाळी ८.३० वाजता बाळभोग आरती होते. सकाळी ११ ते ११.३० दरम्यान येथे महानैवेद्य आरती होते, तर रात्री ८ वाजता सायं आरती व ९ वाजता शेजारती होते. मंदिरात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते नवमी या काळात श्रीराम नवरात्र, श्रावण शुद्ध त्रयोदशीला मंदिराचा वर्धापन दिन, श्रावण वद्य दशमीला प्राणप्रतिष्ठा दिन, गोकुळाष्टमी, अश्विन नवरात्र, दहीहंडी व गोपालकाला आदी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. हे मंदिर वाशिममधील एक महत्त्वाचे तीर्थ मानले जाते. यामुळे येथे सतत भाविकांची, तसेच पर्यटकांची वर्दळ असते.

उपयुक्त माहिती:

  • वाशिम बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून वाशिमसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ०७२५२२३३१४१

बालाजी मंदिर

वाशिम, जिला. वाशिम

Back To Home