बालाजी मंदिर / उंच हनुमान मूर्ती

नांदुरा, ता. नांदुरा, जि. बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा शहर एकेकाळी रंगकाम उद्योगासाठी आणि विणलेल्या साड्यांच्या कलाकुसरीसाठी प्रसिद्ध होते. परंतु, आज हे शहर हनुमान नगरी म्हणून ओळखले जाते. येथील आकाशाला गवसणी घालणाऱ्या पवनपुत्र हनुमानाच्या १०५ फूट उंचीच्या मूर्तीमुळे नांदुरा शहराला ही नवी ओळख प्राप्त झाली आहे. येथील दाक्षिणात्य शैलीत बांधलेल्या बालाजी मंदिराच्या विश्वस्त मंडळाने या भव्य मूर्तीची उभारणी केली आहे. सध्या महाराष्ट्रातील ही सर्वाधिक उंचीची हनुमानाची मूर्ती समजली जाते. या हनुमंताच्या मस्तकावरील तेजस्वी सुवर्णमुकुट, अंगावरील सुबक आभूषणे आणि मूर्तीवरील कलाकुसर यामुळे हे रूप अत्यंत मनोहारी दिसते.

सुमारे २५ वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील शिवराम मोहनराव नावाचे कांदा व्यापारी नागपूर येथील बाजारपेठेत गेले होते. नांदुरा येथील एका कांदा उत्पादकाने आपल्या शेतातील कांदा तेथे विक्रीसाठी आणला होता. मोहनराव यांना या कांद्याचा दर्जा आवडला. ‘हा कांदा कोठून आणला?’ अशी विचारणा त्यांनी त्या उत्पादकाकडे केली. नांदुरा येथून हा कांदा आल्याचे समजताच मोहनराव यांनी या शहराला भेट दिली आणि त्यानंतर व्यापारानिमित्त येथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. बालाजींचे निस्सीम भक्त असलेल्या मोहनरावांनी नांदुरा येथे बालाजी मंदिर तसेच हनुमंताची भव्य मूर्ती उभारण्याचा संकल्प केला. त्यासाठी त्यांनी १९९९ मध्ये बालाजी ट्रस्ट स्थापन केला. हनुमानाची १०५ फूट उंचीची भव्य मूर्ती तयार करण्यासाठी त्या वेळी सुमारे साठ लाख रुपये खर्च आला. आंध्र प्रदेशातील पेद्दापुरम येथील जॉन बाबू या मूर्तीकाराच्या नेतृत्वाखाली अनेक कारागिरांनी ही मूर्ती साकारली. डिसेंबर १९९९ मध्ये या मूर्तीच्या उभारणीस सुरुवात झाली आणि तब्बल २१० दिवस अथक प्रयत्न करून ही मूर्ती साकारण्यात आली. ८ नोव्हेंबर २००१ रोजी जगन्नाथपुरी येथील शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

या भव्य मूर्तीच्या खाली एक लहानसे मंदिर आहे. या मंदिरात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मुख्य मूर्ती आहेत आणि त्यांच्या शेजारी हनुमंताची एक लहान मूर्ती आहे. या मंदिराच्या मागील बाजूस डाव्या बाजूला मोठ्या चौथऱ्यावर हनुमानाची भव्य मूर्ती आहे. ही दक्षिणाभिमुख मूर्ती ३२.९२ मीटर (१०५ फूट) उंच आहे. या मूर्तीच्या डाव्या हाताला गदा आहे आणि उजवा हात अभय मुद्रेत आहे. या हाताच्या तळव्यावर ‘ॐ’ हे पवित्र चिन्ह कोरलेले आहे. या मूर्तीच्या निर्माणासाठी संगमरवर, लोखंड आणि सुमारे शंभर ट्रक सिमेंट लागले. या मूर्तीला सुमारे तीन किलो वजनाच्या चांदीचा टिळक लावण्यात आला आहे व त्याला ३०० ग्रॅम सोन्याचे पॉलिश करण्यात आले आहे. मूर्तीमध्ये सात ते बारा इंच व्यासाचे सुमारे एक हजार मौल्यवान खडे बसवण्यात आले आहेत. मूर्तीचे डोळे सुमारे ६० ते ७० सेंटीमीटर व्यासाचे आहेत. ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपातही तसेच सुमारे ३५० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळातही ही मूर्ती तग धरेल, अशा पद्धतीने तिची रचना करण्यात आली आहे. या मूर्तीवर रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने जलाभिषेक करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हनुमानाची सर्वात उंच मूर्ती म्हणून २००२-२००३ साली ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये या मूर्तीची नोंद करण्यात आली होती. तेव्हा ही १०५ फूट उंच मूर्ती भारतातील सर्वात उंच हनुमान मूर्ती मानली जात होती. परंतु सध्या भारतात हनुमानाच्या यापेक्षाही उंच मूर्ती उभारल्या गेल्या आहेत. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात असलेली सुमारे १८७ फूट उंच हनुमान मूर्ती सध्या देशातील सर्वोच्च स्थानांपैकी एक मानली जाते. ही मूर्ती भूकंपप्रवण क्षेत्रात आरसीसी तंत्रज्ञानाचा वापर करून उभारली आहे. याच रांगेत आंध्र प्रदेशातील मडपम येथील १७६ फूट उंच मूर्ती वंशाधरा नदीच्या तीरावर उभी आहे. कर्नाटकच्या बिदनगेरे येथे १६१ फूट उंचीची देशातील सर्वात उंच पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे. परिताला येथील १३५ फुटांची ‘वीर अभय अंजनेय’ मूर्ती ही ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. शिमला येथील जाखू टेकडीवरील आणि दिल्लीच्या करोल बागेतील १०८ फूट उंचीच्या मूर्तीही या यादीत आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील नांदुरा येथील १०५ फूट उंचीची मूर्ती येते. भविष्यात कर्नाटकातील हम्पी येथे ७०५ फूट उंच मूर्ती उभारण्याचा संकल्प आहे आणि तो भारतीय वास्तुकलेचा जागतिक मानदंड ठरणार आहे.

नांदुरा या मूर्तीच्या चारही बाजूंनी स्टेनलेस स्टीलचे रेलिंग बसवण्यात आले आहे. या मूर्तीच्या उजव्या बाजूस बालाजी मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायऱ्या आहेत. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अनेक देव-देवतांच्या मूर्ती आहेत. पायऱ्या चढून आल्यावर मंदिराच्या मोठ्या सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपातील स्तंभांवर कलाकुसर केलेली आहे आणि त्यांवर काही मूर्तीही कोरलेल्या आहेत. मध्यभागी बालाजींचे गर्भगृह आहे. डावीकडे लक्ष्मी-नृसिंहांचे तर उजवीकडे महालक्ष्मीचे गर्भगृह आहे. या संकुलात पद्मावती (गोदादेवी) माता मंदिर, गरुडालय, सुमारे सात फूट उंचीचा मनोकामना स्तंभ, पंचधातू उत्सव मूर्ती मंदिर आणि कृष्ण भगवानांचा बालरूप देखावा आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंना कृष्णलीला दर्शवणाऱ्या आठ मूर्ती आहेत. संकुलातील सर्व मंदिरांवर दाक्षिणात्य पद्धतीची सुंदर शिखरे आहेत. या मंदिरांवरील देवकोष्टकांमध्ये विविध देव-देवतांच्या मूर्ती आहेत. या संकुलात एके ठिकाणी ब्रह्मदेव आणि वीणाधारी सरस्वती यांच्या मूर्ती आहेत. नजीकच शिवशंकर, पार्वती, गणेश, मूषक तसेच कार्तिकेय यांच्या मूर्ती आहेत. याशिवाय मंदिरात शेषशायी विष्णू, लक्ष्मीदेवी, नारदमुनी तसेच गरुडदेव यांच्या मूर्ती आहेत. दर गुरुवारी तसेच शनिवारी येथे येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदानाची सोय करण्यात येते. येथे रामनवमी, गोकुळाष्टमी, गणेशोत्सव आदी सण-उत्सव साजरे केले जातात. हनुमान जयंती तसेच अश्विन महिन्यात होणारा ब्रह्मोत्सव हे येथील मुख्य उत्सव असतात. हनुमान जयंतीच्या दिवशी येथे सकाळी मूर्तीवर रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने जलाभिषेक करण्यात येतो. त्यानंतर मूर्तीवर सुमारे दीडशे किलो वजनाचा फुलांचा हार चढवण्यात येतो. या दिवशी मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

उपयुक्त माहिती:

  • नांदूरा बस स्थानकापासून ५०० मीटर अंतरावर
  • बुलडाणा येथून ५६ किमी अंतरावर
  • बुलडाणा जिल्ह्यातील अनेक शहरांतून नांदूरासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक सुविधा
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ७९७२९०४०८९

बालाजी मंदिर / ऊंची हनुमान प्रतिमा

नांदुरा, ताल. नांदुरा, जिला. बुलढाणा

Back To Home