नवी मुंबईतील नेरूळमधील एका लहानशा टेकडीवर असलेले बालाजी मंदिर प्रसिद्ध आहे. तिरुपती येथील प्रसिद्ध वेंकटेश्वर मंदिराच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या या मंदिराची रचना प्राचीन शिल्पशास्त्राप्रमाणे केलेली आहे. हे मंदिर दक्षिण भारतीय वास्तुशैलीचा उत्तम नमुना आहे. तिरुपती येथील बालाजी मंदिरात असलेल्या मूर्तीप्रमाणेच या मंदिरात काळ्या ग्रेनाईटमधील सुमारे १० फूट उंचीची मूर्ती आहे. मंदिराच्या महाद्वाराला लागून ६० फूट उंचीचे राजगोपूरम् आहे व यावर दोनशेहून अधिक देवदेवतांची शिल्पे आहेत.
‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ या अभ्यासपूर्ण ग्रंथात थोर संशोधक रा. चिं. ढेरे यांनी असे नमूद केले आहे की पंढरपूरचा विठ्ठल आणि तिरुपतीचा वेंकटेश हे दोन्ही समधर्मी देव आहेत. दोघेही विष्णूच्या पुराणप्रसिद्ध अवतारांशी अथवा रूपांशी संबंध नसणारे आणि तरीही विष्णुरूप पावलेले आहेत. विठ्ठल हा बाळकृष्ण मानला जातो, तर वेंकटेश हा बालाजी या नावाने ओळखला जातो. विठ्ठलाची पत्नी राधेचे निमित्त सांगून दिंडीरवनात रुसून बसलेली, तर वेंकटेशाची पत्नी भृगूने केलेला अपमान पतीने सोसल्यामुळे चिडून प्रथम करवीरात आणि नंतर तिरुचानूरमध्ये दूर वेगळी राहिलेली. वेंकटेशाच्या पत्नीचे नाव पद्मावती, तर विठ्ठलाच्या प्रेयसीचे नाव पद्मा असे आहे. वेंकटेश हा विठ्ठलाप्रमाणेच शस्त्रहीन, मौनी आहे आणि डावा हात कटीवर ठेवून, उजव्या हाताने भक्तांना वरप्रदान करीत आहे. अशा या बालाजीचे भक्त आंध्राप्रमाणेच महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर आहेत.
याच भक्तांना तिरुपती बालाजीचे दर्शन नवी मुंबईतही घेता यावे याकरीता येथील दक्षिण भारतीयांनी एकत्र येऊन नेरूळमध्ये हे मंदिर बांधले. १९८० च्या दशकापासून आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या ‘श्री लक्ष्मी नृसिंह सभा’ या संस्थेने या करीता पुढाकार घेतला. तिरुपती बालाजीचे मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुमला डोंगरावर स्थित आहे. ते मंदिर किमान दीड हजार वर्षे एवढे जुने आहे. पल्लव राणी समवाई हिने इ.स. ६१४ मध्ये या मंदिराची पहिली वेदी बांधली असे सांगण्यात येते. त्या मंदिराच्या उभारणीत व देखभालीमध्ये चोल, पल्लव राजांप्रमाणेच मराठा सेनापती रघुजी भोसले यांचाही सहभाग आहे. रोममधील व्हॅटिकन सिटीनंतरचे हे जगातील सर्वांत श्रीमंत देवस्थान गणले जाते. तिरुपती बालाजीचे हे मंदिर द्राविड शैलीतील आहे व त्याच मंदिरशैलीमध्ये नेरूळमधील बालाजी मंदिरही बांधण्यात आलेले आहे.
या मंदिरासाठी १९९१ मध्ये सिडकोकडून नेरूळ पश्चिमेकडील ब्रह्मगिरी डोंगरावरील हा भूखंड भाडेतत्त्वावर घेण्यात आलेला आहे. या मंदिराचे भूमिपूजन कांची कामकोटी मठाचे अधिपती जगद्गुरू श्री जयेंद्र सरस्वती शंकराचार्य स्वामी यांच्या हस्ते झाले, तर तिरुमला तिरुपती येथील श्रीरंग रामानुज जीर स्वामी यांच्या हस्ते या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. मंदिराच्या पारंपरिक वास्तूबरोबरच आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यासाठी येथे संस्थेने बहुमजली इमारतही बांधली आहे. या इमारतीत गुरुजी सभागृह आणि विविध कार्यक्रमांसाठी तब्बल एक हजार आसनी सभागृह आहे.
द्रविड मंदिर स्थापत्यशैलीनुसार आवारभिंत, गोपुरम्, मंडपम्, मणिमंडपम् (अंतराळ), गर्भगृह, विमान म्हणजे गर्भगृहावरील गोपुरासारखी रचना आणि त्यावर शिखर अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या आवारभिंतीत भव्य गोपुरम् आहे. गोपुरम् म्हणजे मंदिर परिसराचे महाद्वार. ते उंच आणि बहुस्तरीय असते. येथील मंदिराचे गोपुरम् राजगोपूर म्हणून ओळखले जाते. त्यात खालच्या बाजूस भव्य असे दगडी महाद्वार आहे. त्याच्या छतावर आठ स्तरीय आयताकार गोपुरम् आहे. प्रत्येक स्तरावर त्याचा आकार लहान लहान होत गेला आहे. याचा प्रत्येक स्तर नक्षीकामाने अलंकृत आहे. त्यावर विविध देवदेवतांच्या अनेक मूर्ती, तसेच देवकोष्टके आहेत.
या महाद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. पौराणिक दिव्यदेसम तीर्थांवर आधारलेली देवतांची रूपे अनेक दक्षिण भारतीय मंदिरांवर कोरण्यात येतात, तशीच नवी मुंबईतील या देवालयातही पाहायला मिळतात. इ.स. ५०० ते ८५० या काळात होऊन गेलेल्या बारा तामिळ वैष्णव संतकवी म्हणजे आळवारांनी ज्या वैष्णव पुण्यस्थळांची कीर्ती गायली त्या पुण्यस्थळांना दिव्यदेसम् असे म्हणतात. त्यांनी अशी १०६ महाविष्णुस्थाने म्हणजेच दिव्यदेसम् निश्चित केली आहेत. तेथील देवतांची रूपे या मंदिरातही पाहावयास मिळतात.
मंदिर व प्रवेशद्वार यामधील जागेत समोरच बलीपीठम् आहे. त्यापुढे एका दगडी चौथऱ्यावर सोनेरी मुलामा दिलेला धातूचा उंच ध्वजस्तंभ आहे. काहीशा उंच जगतीवर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी अकरा पायऱ्या आहेत. मंदिराचा सभामंडप सिमेंट आणि ग्रॅनाईटचा वापर करून बांधलेला आहे. त्यामुळे मंदिरात प्राचीन व आधुनिक वास्तुशैलीचा सुंदर संगम पाहायला मिळतो. मणिमंडपाच्या दर्शनी स्तंभांवर दोन्ही बाजूला वैष्णव द्वारपालांच्या मोठ्या मूर्ती आहेत. याच प्रमाणे विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाची मूर्तीही येथे आहे. या मणिमंडपातून बालाजीच्या मूर्तीचे दर्शन होते.
गर्भगृहात बालाजीची सुमारे दहा फूट उंच, उभी, वरदमुद्रेतील व श्यामवर्णी मूर्ती आहे. ही मूर्ती ग्रॅनाईट पाषाणात शिल्पशास्त्रानुसार कोरलेली आहे. ती महाबलीपुरम येथून आणण्यात आली आहे. उंच सोनेरी मखरात ही मूर्ती विराजमान आहे. या मखराचे स्तंभ आणि तोरण यांवर बारीक नक्षीकाम केलेले आहे. त्याच्या ललाटबिंबस्थानी कीर्तिमुख कोरलेले आहे. मूर्तीच्या मस्तकी मुकुट, कानांत कर्णफुले, खांद्यावर नाग आहे. गळ्यात वैजयंतीमाला आहे. वरील दोन हातांमध्ये पांचजन्य शंख व सुदर्शन चक्र, एक हात वरप्रदान करणारा, तर एक हात कटेवर आहे. मूर्तीचे हात व पाय सोन्याचे आहेत. मूर्ती वस्त्रालंकार तसेच पुष्पमालांनी मढवलेली आहे. मूर्तीच्या कपाळापासून डोळ्यांपर्यंत शुद्ध कापराच्या इंग्रजी व्ही आकाराच्या पट्ट्या लावलेल्या आहेत. यामुळे मूर्तीचे नेत्र नेहमी बंद असतात.
याबाबत असे सांगितले जाते की बालाजीचे नेत्र नेहमी उघडे असतात. या तेजस्वी नेत्रांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. त्या ऊर्जेने संपूर्ण विश्व भाजून निघण्याची शक्यता असते. त्यामुळे एरव्ही ते विशिष्ट प्रकारचा कापूर लावून बंद केलेले असतात. या विषयी आणखी एक स्पष्टीकरण असे देण्यात येते की बालाजीचे पद्मनयन अत्यंत सुंदर असतात. ते उघडे ठेवल्यास ते नेत्र पाहून भाविक एवढे भारावून जातील की तेथून निघण्याचे नावच घेणार नाहीत. म्हणून ते झाकले जातात. केवळ नेत्रदर्शनाच्यावेळी तो कापूर बाजूला काढला जातो. त्यावेळी बालाजीचे नेत्र भाविकांना पाहता येतात. विशेष म्हणजे या मंदिरात द्वारपालांच्या आणि अन्य काही देवतांच्या मूर्तींचे डोळेही अशाच प्रकारे कापराच्या पट्ट्यांनी झाकलेले आहेत.
बालाजीच्या मूर्तीशेजारी गर्भगृहात या बालाजीची उत्सवमूर्तीही आहे. तिला कौतुकबेर असे म्हटले जाते. ही मूर्ती चांदीची व मूळ मूर्तीची प्रतिकृती आहे. याशिवाय येथे श्रीदेवी, भूदेवी, राम–लक्ष्मण–सीता, कृष्ण–रुक्मिणी आणि सुदर्शन देवता यांच्या छोट्या मूर्तीही आहेत. मुख्य मंदिराशिवाय येथे बालाजीची पत्नी पद्मावती, विद्या गणपती, विश्वक्षेनार, योग अंजनेयार अर्थात मारुती, लक्ष्मी–नृसिंह, रामानुजाचार, सुदर्शनार, विश्वकेसनार, तसेच नवग्रह या देवतांचीही मंदिरे आहेत. यांस येथे सन्निधी असे म्हटले जाते. या सर्व मंदिरांच्या बाह्यभिंतींवर गरुडदेवासह अन्य देवदेवतांच्या सुंदर कोरीव मूर्ती आहेत. येथील सर्व मंदिरांमधील देवदेवतांना दररोज फुलांनी सजवले जाते. मंदिरात दक्षिण भारतीय पद्धतीने, प्रामुख्याने तामिळी अय्यंगार परंपरेनुसार पंचरात्र आगम पद्धतीने देवांची पूजा केली जाते.
या मंदिरात अक्षय्य तृतीयेस ‘श्री लक्ष्मी नृसिंह सभे’चा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या दिवशी येथे अन्नकूटही असतो. याशिवाय जून वा जुलैमध्ये त्या–त्या वर्षी ठरविण्यात येणाऱ्या तिथीस परतिष्ठ दिन, ज्येष्ठाभिषेक हे उत्सव साजरे केले जातात. विजयादशमी व त्यानंतरचे पाच दिवस येथे पवित्रोत्सव असतो, तर डिसेंबर वा जानेवारीमध्ये येथे २१ दिवसांचा अध्ययन उत्सव असतो. या काळात येथे रोज सकाळी हजारो भाविक येऊन संत अण्डाल यांनी रचलेल्या ‘थिरुप्पावै’ या पद्यग्रंथातील रचनांचे गायन करतात. या मंदिरात हनुमान जयंतीचा उत्सवही भव्य प्रमाणात साजरा केला जातो. सोमवार ते गुरुवार सकाळी ६.३० ते ११.३० व सायंकाळी ४.३० ते ९ या वेळेत व शुक्रवार ते रविवार सकाळी ६.३० ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरातील बालाजीचे दर्शन घेता येते.