बालाजी मंदिर

केतकावळे, ता. पुरंदर, जि. पुणे

पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील केतकावळे येथे साकारलेले श्री बालाजी मंदिर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील मुख्य मंदिराची हुबेहूब प्रतिकृती असलेले हे मंदिर ‘प्रति तिरुपती’ किंवा ‘प्रति बालाजी’ म्हणून प्रसिद्ध आहे. व्यंकटेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उभारलेल्या या मंदिरामध्ये तिरुपती येथील सर्व धार्मिक विधी आणि परंपरांचे तंतोतंत पालन केले जाते. या परिसरातील भाविकांची वाढती संख्या आणि उपलब्ध सोयीसुविधांचा विचार करून महाराष्ट्र सरकारनेही या क्षेत्राला तीर्थस्थळाचा ‘ब’ दर्जा देऊन गौरविले आहे.

व्यंकटेश्वरा हॅचरीज या प्रख्यात उद्योगसमूहाचे संस्थापक डॉ. बी. व्ही. राव यांच्या कल्पनेतून हे मंदिर साकारले आहे. भगवान व्यंकटेश्वराचे निस्सीम भक्त असलेल्या डॉ. राव यांनी महाराष्ट्रातील भाविकांना तिरुपती दर्शनाचा अनुभव मिळावा या उद्देशाने १९९६ मध्ये या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. वास्तुशास्त्रज्ञ आणि मंदिरनिर्मितीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे सात वर्षे या वास्तूचे काम चालले व ४ डिसेंबर २००३ रोजी हे मंदिर दर्शनासाठी अधिकृतपणे खुले झाले. सुमारे २३ एकराच्या परिसरात अडीच एकर जागेत हे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराच्या उभारणीसाठी त्यावेळी २७ कोटी रुपये खर्च झाला होता. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने तयार केलेल्या या मंदिराचे व्यवस्थापन सध्या व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पाहिले जाते.

भगवान व्यंकटेश्वर म्हणजेच बालाजी यांच्या अवताराची कथा ‘भविष्योत्तरपुराण’ ग्रंथातील ‘व्यंकटेश माहात्म्य’ या भागात दिलेली आहे. याशिवाय ‘वराह पुराण’ आणि ‘पद्म पुराण’ या ग्रंथांतही ही कथा आहे. ती अशी की एकदा ऋषींनी त्रिदेवांपैकी सर्वाधिक सहनशील आणि श्रेष्ठ देव कोण हे ठरवण्याचे निश्चित केले. या परीक्षेत भगवान शिव आणि ब्रह्मदेव अयशस्वी ठरल्यानंतर भृगु ऋषी वैकुंठात पोहोचले. त्यावेळी भगवान विष्णू शेषशायी अवस्थेत योगनिद्रेत होते. ऋषींच्या आगमनाकडे त्यांचे लक्ष न गेल्याने भृगु ऋषी अत्यंत क्रोधित झाले. संतापाच्या भरात त्यांनी भगवान विष्णूंच्या वक्षस्थळावर जोरदार प्रहार केला. भगवान विष्णूंनी या अपमानाचा राग न धरता उलट ऋषींची क्षमा मागितली आणि त्यांच्या पायांना झालेल्या दुखापतीबद्दल काळजी व्यक्त करत त्यांचे पाय चेपले. यामुळे ऋषींचा अहंकार गळून पडला आणि त्यांनी विष्णूंना श्रेष्ठ घोषित केले.

मात्र, भगवान विष्णूंच्या वक्षस्थळावर साक्षात माता लक्ष्मीचा निवास असतो. आपल्या निवासाच्या ठिकाणी ऋषींनी केलेला प्रहार लक्ष्मीला सहन झाला नाही. भगवान विष्णूंनी ऋषींना शिक्षा करण्याऐवजी त्यांची क्षमा मागितली, हे माता लक्ष्मीला अपमानकारक वाटले. या रागातून तिने वैकुंठाचा त्याग केला आणि ती पृथ्वीवर कोल्हापूर क्षेत्रात येऊन वास्तव्य करू लागली. लक्ष्मीच्या विरहाने व्याकुळ झालेले भगवान विष्णूही तिला शोधण्यासाठी पृथ्वीवर आले. त्यांनी ‘श्रीनिवास’ या नावाने अवतार घेतला आणि तिरुमलाच्या सात टेकड्यांवरील अरण्यात वास्तव्यास आले. तेथेच त्यांची भेट चोल प्रांताचे आकाशराजा यांची कन्या पद्मावती हिच्याशी झाली. दोघांचा विवाह निश्चित झाला, परंतु या दिव्य विवाहाचा खर्च करण्यासाठी श्रीनिवासांकडे पुरेसे धन नव्हते. विवाहासाठी आवश्यक संपत्ती मिळवण्यासाठी त्यांनी धनदेवता कुबेराकडून मोठे कर्ज घेतले. या कर्जाचा करार असा झाला की जोपर्यंत कलियुग समाप्त होत नाही, तोपर्यंत भगवान या कर्जाचे केवळ व्याज फेडत राहतील आणि कलियुगाच्या शेवटी मुद्दल परत केली जाईल. अशी मान्यता आहे की आजही भगवान व्यंकटेश्वर आपल्या विवाहाचे कर्ज फेडत आहेत. भाविक मंदिरात जे दान अर्पण करतात, ते या कर्जाच्या व्याजाचा भाग मानले जाते. या श्रद्धेतूनच मंदिरात ‘हुंडी’ किंवा दानपात्र ठेवण्याची परंपरा सुरू झाली. या ठिकाणी भाविक भक्तीसोबतच भगवंताला त्यांच्या कर्जातून मुक्त करण्याच्या भावनेतून दान करतात.

केतकावळे येथील हे मंदिर पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कापूरहोळपासून दोन किलोमीटर अंतरावर एका निसर्गसमृद्ध दरीत वसलेले आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला हा परिसर विशेषतः पावसाळ्यात हिरव्यागार निसर्गामुळे अधिकच सुंदर भासतो. या परिसरात उद्याने विकसित केलेली आहेत. त्यात अनेक शोभेची व फुलझाडे आहेत. मंदिराची स्थापत्य शैली दक्षिण भारतीय द्रविड पद्धतीची आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक भव्य आणि देखणे राजगोपुरम आहे. पायरी-पायरीने वर निमुळते होत जाणारे हे पिवळ्या रंगाचे गोपुरम विविध देवतांच्या कोरीव मूर्तींनी सजलेले आहे. राजगोपुरातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथे समोर सोन्याचा मुलामा असलेला व बालाजी मंदिरांची विशेष ओळख असलेला उंच ध्वजस्तंभ आणि देवाला नैवेद्य अर्पण करण्यासाठीचे बलिपीठ आहे.

सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपातील स्तंभांवर व भिंतीवर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या गर्भगृहात व्यंकटेश्वर म्हणजेच बालाजींची सात फूट उंचीची पाषाणमूर्ती प्रतिष्ठित आहे. मूर्तीचे रूप शांत आहे. मूर्तीच्या डोळ्यांवर कापराचा मोठा पांढरा टिळा लावलेला आहे. मूर्तीला चार हात असून त्यातील वरच्या दोन हातांमध्ये शंख आणि चक्र धारण केलेले आहेत. खालचा उजवा हात ‘वरद मुद्रेत’ आहे, तर खालचा डावा हात कमरेवर ठेवलेला आहे. मूर्तीच्या छातीवर उजव्या बाजूला लक्ष्मी देवी आणि डाव्या बाजूला पद्मावती देवी यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. ही मूर्ती विविध सुवर्णालंकार, हिरे आणि फुलांनी सजवलेली असते. मुख्य मंदिराच्या बाजूला पद्मावती माता, गरुड, सुदर्शन, नरसिंह, गोदामाता, विष्वक्सेन आणि वेणुगोपाळ यांची स्वतंत्र परिवार मंदिरे आहेत.

मंदिरातील विधी आणि उत्सव हे दक्षिणेकडील तिरुपती मंदिराच्या नियमावलीनुसार पार पाडले जातात. त्यासाठी तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील पुजाऱ्यांची येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पहाटे पाच वाजता देवाला जागे करण्यासाठी ‘सुप्रभातम’ स्तोत्रे म्हटली जातात व त्यानंतर दिवसभरात तीन वेळा पूजा, दोन वेळा सेवा आणि नैवेद्य अर्पण केला जातो. दर गुरुवारी येथे ‘नेत्रदर्शन’ नावाचा एक विशेष विधी होतो. त्या दिवशी देवाच्या डोळ्यांवरील कापराची पट्टी काढली जाते व देवाचे तेजस्वी दर्शन भाविकांना घेता येते. दर शुक्रवारी देवाला अभिषेक केला जातो. दररोज दुपारी भाविकांना तिरुपतीप्रमाणेच लाडूचा प्रसाद आणि महाप्रसाद मोफत दिला जातो. वैकुंठ एकादशी, रामनवमी, दिवाळी आणि गुढीपाडवा यांसारख्या सणांच्या वेळी मंदिरावर विशेष रोषणाई करण्यात येते. ब्रह्मोत्सवाच्या वेळी देवाची पालखी काढली जाते. दररोज सकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत भाविकांना येथे दर्शन घेता येते. सकाळी साडेदहा ते सव्वा अकरा या काळात नैवेद्यासाठी काही काळ गर्भगृहातील दर्शन बंद असते. मोबाईल किंवा कॅमेरा नेण्यास बंदी असल्यामुळे ते मंदिराबाहेरील लॉकर रूममध्ये ठेवूनच मंदिर परिसरात जाता येते.

उपयुक्त माहिती

  • सासवड येथून १७ किमी अंतरावर
  • पुणे येथून ४३ किमी अंतरावर
  • पुणे व सासवड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२११५-२३६१७६, ०२११५ – २३६१०९
Back To Home