पुणे-सासवड मार्गावरील केतकावळे येथे २३ एकर परिसरात भव्य श्री बालाजी मंदिर उभे आहे. वेंकटेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ते साकारण्यात आले. या कामासाठी तब्बल पाच वर्षे लागली. ४ डिसेंबर २००३ मध्ये मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिराची बाह्य व अंतर्गत रचना दक्षिणेतील तिरुपती मंदिराप्रमाणे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ-नारायणपूर फाट्यापासून दोन किमी अंतरावर निसर्गसमृद्ध परिसरात हे मंदिर आहे. हे मंदिर दक्षिण भारतीय वास्तुशैलीचा उत्तम नमुना असून वास्तुशास्त्रज्ञांच्या उत्तम कलाकुसरीतून ते साकारले आहे.
दक्षिणेतील तिरुपती मंदिरात गुंजणारे व्यंकट रमणा गोविंदा, अशा भजनांचे सूर मंदिरात प्रवेश करताच कानावर पडू लागतात. येथे होणारे सर्व धार्मिक विधी हेही तेथील मंदिराप्रमाणेच आहेत. यामध्ये दररोज तीन वेळा पूजा, दोन वेळा सेवा, नैवेद्यम आदींचा समावेश असतो. याशिवाय दर गुरुवारी येथे भाविकांना ‘नेत्रदर्शन’ घडविले जाते. (बालाजीचे नेत्र नेहमी उघडे असतात. या तेजस्वी नेत्रांमध्ये प्रचंड शक्ती असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे एरव्ही ते विशिष्ट प्रकारचा कापूर लावून बंद केलेले असतात. नेत्रदर्शनाच्यावेळी तो कापूर बाजूला काढला जातो. त्यावेळी बालाजीचे मूळ नेत्र भाविकांना पाहता येतात.)
मंदिर रचनेमध्ये अर्धमंडप, मुखमंडप, गर्भगृह, अंतराळ मंडळ, सोपानम, ध्वजस्तंभ, बलिपीठ, राजगोपूर हे सर्व तिरुपती मंदिराप्रमाणे येथे करण्यात आले आहे. याशिवाय तेथे असणारी सहा परिवार मंदिरेही येथे उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये गरुड, पद्मावतीमाता, सुदर्शन, नरसिंह, गोदामाता, विश्वसेना व वेणुगोपाळ यांच्यासाठी स्वतंत्र मंदिरे आहेत. येथील भिंतींवर सुंदर शिल्पे कोरली आहेत. याशिवाय कुबेर आणि वराहस्वामी यांचीही मंदिरे येथे आहेत. पिवळ्याधमक रंगातील त्यांचे कळस खूपच आकर्षक वाटतात.
मंदिरात बालाजीची काळ्या संगमरवरातील सुमारे सात फूट उंचीची मूर्ती असून ती तिरुपती येथील बालाजी मंदिरातील मुख्य मूर्तीप्रमाणे आहे. मूर्तीच्या कानांत कर्णफुले, खांद्यावर नाग आहे. तीन हातांमध्ये प्रत्येकी एकात शंख, चक्र, गदा असून चौथा हात आशीर्वाद देणारा आहे.
तिरुपती येथे देवाला केस वाहण्याची प्रथा आहे. तशी सुविधा केतकावळे येथील या मंदिरातही करण्यात आली आहे. याशिवाय तेथे मिळणाऱ्या प्रसादाप्रमाणेच येथेही लाडूचा प्रसाद उपलब्ध असतो.
ज्या भाविकांना तिरुपतीला जाऊन श्री बालाजीचे दर्शन घेणे शक्य होत नाही, अशा भाविकांसाठी व्यंकटेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हे मंदिर उभारण्यात आले आहे. मूळ देवस्थानाच्या अटी-शर्तींचे येथे तंतोतंत पालन करण्यात येते. त्यानुसार येथील पूजा विधीसाठी दक्षिणेकडील पुजाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय भाविकांना देण्यात येणारा प्रसाद बनविण्यासाठीही थेट तिरुपतीहून आचारी आणण्यात आले आहेत. भाविकांना सर्व सुविधा येथे मोफत पुरविण्यात येतात. दररोज दहा हजारांहून अधिक भाविक येथे दर्शनासाठी येतात. पहाटे ५ ते रात्री ८ पर्यंत भाविक या मंदिरात देवदर्शन करू शकतात.