
कडाव येथील तलावाच्या काठावर असलेले बाल दिगंबर गणेश मंदिर हे रायगड जिल्ह्यातील एक प्राचीन आणि जागृत गणेशपीठ मानले जाते. अध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असलेला हा बाल दिगंबर नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ज्या जागेवर हे मंदिर आहे तेथे पूर्वी युद्धभूमी होती, असे येथील उत्खननात सापडलेल्या काही पुराव्यांवरून सांगितले जाते. अष्टविनायक क्षेत्रांपैकी महड या देवस्थानाच्या वर्णनात व गणेशकोष खंड दोनमध्ये या मंदिराचा उल्लेख आहे. मंदिराच्या कागदपत्रांमध्ये नाना फडणीस यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याची नोंद आहे.
या मंदिराची अख्यायिका अशी की दक्षिण भारताची यात्रा करीत असताना कण्वऋषी कडाव येथे आले होते. त्यांनी या ठिकाणी तात्पुरता आश्रम बांधला. ते गणेश उपासक होते. आपल्या उपासनेत खंड पडू नये म्हणून त्यांनी येथे बाल दिगंबर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. गणेश पुराण आणि मुद्गल पुराणांमध्ये बाल दिगंबर गणेशाचा उल्लेख आढळतो. त्यानुसार बाल गणेशाने युद्धभूमीवर अनेक दुर्जनांचा नाश केल्याचे म्हटले आहे. हे स्थळ याच पौराणिक कथेशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.
दुसऱ्या कथेनुसार, सुमारे ३०० वर्षांपूर्वी या गावचे पाटील असलेल्या धुले यांच्या शेतात जमिनीखाली ही मूर्ती सापडली. त्यांनी त्या मूर्तीची येथे स्थापना केली. तेव्हापासून माघी चतुर्थीला गणेश जन्मदिनी निघणाऱ्या पालखीपुढे या कुटुंबातील काठीला मानाचे स्थान आहे. या धुले घराण्यात भाद्रपद चतुर्थीला मातीची गणेशमूर्ती आणली जात नाही. त्याऐवजी त्यांच्या घरात असलेल्या या गणेशाच्या चांदीच्या मुखवट्याची पुजा केली जाते. पुणे येथील इतिहास संशोधक मंडळाचे संशोधक ग. ह. खरे यांनी केलेल्या पाहणीनंतर हे मंदिर सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे त्यांनी सांगितले. ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये थोरले माथवराव पेशवे यांनी या देवस्थानासाठी तीन एकर
जमीन दिल्याचा व नाना फडणीस यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे उल्लेख आहेत.
कडाव बाजारपेठेच्या गजबजलेल्या भागात बाल दिगंबर गणेशाचे मंदिर आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी रस्त्याला लागून ३५ फूट उंचीची एक वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर असलेली सुंदर कमान आहे. या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात महादेव, श्रीकृष्ण, विठ्ठल–रुख्मिणी व संत पंचायतन अशी लहान मंदिरे आहेत. दुमजली असलेले हे मंदिर जमिनीपासून काहीसे उंचावर आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला श्रीगणेशाची उठाव शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी आणखी एक गणेशमूर्ती आहे व त्यावरील भागात या मंदिराचे नाव मोठ्या अक्षरांत कोरलेले आहे. या प्रवेशद्वाराच्या वरील भागात दुसऱ्या मजल्यावर तीन देवकोष्टके आहेत. त्याच्यां उजवीकडे गणपती व डावीकडे कण्वऋषी यांच्या
मूर्ती आहेत.
येथील सभामंडप हा बंदिस्त स्वरूपाचा (गुढमंडप) आहे. यामध्ये प्रकाश व हवा खेळती राहावी यासाठी खिडक्यांची रचना आहे. सभामंडपात प्रवेशद्वाराजवळ एक हवनकुंड व गर्भगृहाच्या समोरील बाजूस चौथऱ्यावर गणेशाचे वाहन मुषकाची संगमरवरी मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवरील देवकोष्टकांत डावीकडे मारूतीची व उजवीकडे स्थानिक देवता यांच्या पाषाणमूर्ती आहेत. गर्भगृहात एका उंच वज्रपिठावर चांदीच्या मखरात, काळ्या पाषाणातील, बाल दिगंबर गणेशाची सुमारे साडेतीन फूट उंचीची मूर्ती आहे. ही मूर्ती वस्त्रांशिवाय म्हणजे दिगंबर अवस्थेत आहे. डोक्यावर मुकुट, गळ्यात माळ आणि जानवे, दोन हातांत शस्त्र, एक हात आशीर्वाद देणारा आणि एक सोंडेखाली आहे. ही शैली अतिशय दुर्मिळ समजली जाते. असे सांगितले जाते की १९५२ मध्ये या मूर्तीवरील शेंदुराचे कवच निघाल्यानंतर गणेशाचे सध्याचे बालदिगंबर रूप दिसले. हा कवच नऊ इंच जाडीचा होता. या मंदिराचे शिखर ५१ फूट उंचीचे आहे. या शिखरावर चारही बाजूला गणेशांच्या मूर्ती त्याच्या वाहनासहित आहेत. १९९१ मध्ये झालेल्या जिर्णोद्धारात हे शिखर येथे बसविण्यात आला.
प्रांगणात दक्षिणेकडे प्राचीन शिवलिंग आणि नंदीची भली मोठी मूर्ती आहे. याशिवाय जीर्णोद्धाराच्या वेळी खोदकामात आढळलेल्या मूर्ती व काही अवशेष येथे पाहायला मिळतात. मंदिरालगत असलेल्या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. येथील माघी उत्सव माघ शुक्ल प्रतिपदेपासून माघ शुक्ल पंचमीपर्यंत असतो. तसेच फाल्गुन महिन्यात एकनाथ षष्ठी ते द्वादशीपर्यंत हरिनाम सप्ताह, गुरुपौर्णिमा उत्सव, रामवमी, तसेच हनुमान जयंतीचा उत्सव येथे साजरा होतो. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मागील पन्नास वर्षांपासून ही प्रथा आहे.