
सांगली परिसरात चालुक्य, शिलाहार, यादव, छत्रपती शिवाजी महाराज व अखेरीस पेशवे अशी राज्यकर्त्यांची नावे येतात. पेशवाईत सांगली आणि आसपासच्या संस्थानांत पटवर्धनांची सत्ता होती. पटवर्धन घराणे कोकणातील गणपतीपुळ्याच्या गणपतीचे भक्त होते. त्यांनी सांगली परिसरात गणेशाची अनेक विशाल देवालये बांधली, तशीच काही लहान मंदिरेही बांधली. मिरज तालुक्यातील हरिपूर येथील बागेतील गणपती म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिरही पटवर्धन राजांनीच बांधले, असे सांगितले जाते. या मंदिरातील जागृत गणपती नवसाला पावणारा व मनोकामना पूर्ण करणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
रावबहादुर डी. बी. पारसनीस यांच्या ‘द सांगली स्टेट’ या १९१७ साली प्रकाशित झालेल्या ग्रंथानुसार, सांगली संस्थानचे अधिपती असलेल्या पटवर्धनांचे मूळ पुरूष हरभट बाळंभट हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवडे गावचे ग्रामोपाध्ये होते. घरच्या गरिबीमुळे ते गणपतीपुळे येथे जाऊन राहिले. तेथे त्यांनी बारा वर्षे गणपतीची तपश्चर्या केली व त्यामुळे त्यांची परिस्थिती पालटली. कोल्हापूरचे सेनापती संताजी घोरपडे यांचे मंत्री नारो महादेव यांच्या ओळखीने ते घाटावर कापशी येथे आले व घोरपडे यांचे कुलोपाध्ये म्हणून काम करू लागले. हरभट यांना सात मुले होती. त्यातील त्र्यंबक, गोविंद आणि रामचंद्र या मुलांनी मराठा साम्राज्यात मुत्सद्देगिरी आणि पराक्रमाने मोठे नाव कमावले. यातील गोविंद हरि यांनी आपल्या पित्याच्या स्मरणार्थ मिरजनजीक एक छोटे गाव वसवले. तेच हे हरिपूर.
या गोविंद हरि यांची कर्तबगारी पाहून पहिल्या बाजीराव पेशव्यांनी त्यांना १७२८ मध्ये लष्करी चाकरीत घेतले होते. पुढे नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत (इ.स. १७४० ते १७६१) पटवर्धन सरदारांना मंगळवेढा, कुरुंदवाड
व मिरजची जहागिरी प्राप्त झाली. याच गोविंद हरि पटवर्धन यांनी हरिपूर येथील पूर्वी बोरवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी आपले आराध्य दैवत असलेल्या गणेशाचे मंदिर बांधले. या ठिकाणी पूर्वी दाट झाडी असल्याने यास बागेतला गणपती म्हणून ओळखले जाऊ लागले.सांगली–हरिपूर रस्त्यालगत असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर गणपतीचे परमभक्त मोरया गोसावी यांची चार भिंती व छतावर घुमट असलेली नक्षीदार देवळी आहे. त्यात समोरच्या भिंतीत हात शिरेल इतके छिद्र आहे व त्यातून आत तेलाचा दिवा लावला जातो.
बागेतल्या गणपतीचे मंदिर दगडी बांधकामाचे व हेमाडपंती स्थापत्यशैलीतील आहे. मंदिराला आवारभिंती व प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावर साधीशी कमान व लोखंडी झडपा आहेत. रस्त्यापेक्षा उंचावर असलेल्या मंदिराच्या फरशी आच्छादित प्रांगणात जाण्यासाठी पाच पायऱ्या चढून वर जावे लागते. पुढे चार लोखंडी स्तंभांवर ॲस्बेस्टॉस सिमेंट पत्र्याचे छत असलेला खुला सभामंडप आहे. छताला पितळी घंटा टांगलेली आहे. सभामंडपात वज्रपिठावर मोदक
धरलेली पितळी मूषक मूर्ती आहे. ही मूर्ती सुमारे तीनशे वर्षापूर्वीची असल्याचे सांगितले जाते. पुढे जमिनीवर पितळी कासव आहे.
सभामंडपापेक्षा अंतराळ उंचावर असल्यामुळे पाच पायऱ्या चढून यावे लागले. अंतराळाच्या प्रवेशद्वाराजवळील दोन्ही चौथाऱ्यांवर गजराज शिल्पे आहेत. अंतराळात चार नक्षीदार स्तंभ, त्यांच्या शीर्षभागी कणी व कणीवर महिरपी आकारातील हस्त आहेत. हस्तांवर तुळया व तुळयांवर छत आहे. अंतराळात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन दीपकोष्टके आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर खालील दोन्ही बाजूस कमळ फुलांची व वरील भागात पानाफुलांच्या नक्षी आहेत. मंडारकावरील प्रतिमा अस्पष्ट आहे. ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपिठावर चांदीच्या नक्षीदार मखरात दोन ते अडीच फूट उंचीची गणेशाची चतुर्भुज, शेंदूरचर्चित, डाव्या सोंडेची मूर्ती आहे. देवाच्या मस्तकी चांदीचा मुकूट आहे. वज्रपीठ रजतपटल आच्छादित आहे व त्यावर मध्यभागी ओम् चिन्ह
व दोन्ही बाजूस पानाफुलांच्या नक्षी आहेत. मूर्तीच्या मागे चांदीची प्रभावळ आहे. त्यात मध्यभागी कीर्तिमुख व दोन्ही बाजूंस पानाफुलांच्या नक्षी आहेत.
गर्भगृहाच्या छतावर चारही कोनांवर चार लघू शिखरे व त्यावरील आमलकावर कळस आहेत. मध्यभागी घुमटाकार मुख्य शिखर आहे. त्यावरील आमलकावर कळस व ध्वजपताका आहे. सर्व शिखरांत कमळ फुलांच्या नक्षी आहेत.
मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी हा पाच दिवसांचा गणेश जन्मोत्सव साजरा केला जातो. यावेळी गणेशाला पाळण्यात घालण्यात येते. प्रतिपदेस गणेशयाग व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. पाच दिवस मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गणेशभक्तांच्या धान्य दानातून महाप्रसाद केला जातो.
माघी उत्सवात महाप्रसादाचा वेगळाच थाट असतो. त्यावेळी तीन मोठे रांजण भरून खीर केली जाते. त्यासाठी सात पोती गहू लागतो. खीर शिजवण्यासाठी रात्री अकरा वाजता रांजण चुलीवर ठेवले जातात. पहाटे त्यास कढ येतो. मग त्यात गहू घालतात. चवीचे अन्य साहित्य टाकून दुपारपर्यंत खीर तयार होते. तोवर उपस्थित भाविक खिरापतीस सज्ज असतात. यावेळेस महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यातून हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात. भाद्रपदातील गणेशोत्सव काळात तसेच दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला मंदिरात भाविकांची वर्दळ असते.