उत्तराखंड या देवभूमीत असलेले चारधाम यात्रेतील बद्रीनाथ हे तीर्थक्षेत्र उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात, अलकनंदा नदीकाठी आहे. असे मानले जाते की भगवान विष्णू तेथे तपश्चर्येसाठी बसले असता उन्हापासून त्यांचे रक्षण व्हावे म्हणून लक्ष्मीने बदरी म्हणजेच बोरीच्या झाडाचे रूप घेतले होते. त्यामुळे या स्थानाला बदरीनाथ हे नाव पडले. येथील बद्रीनाथाचे म्हणजे विष्णूचे मूळ मंदिर हे आद्य शंकराचार्य यांनी आठव्या शतकात बांधले होते. या बद्रीनाथाचे एक प्रसिद्ध मंदिर जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे आहे. प्रतीबद्रीनाथ धाम म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर येथील ग्रामदैवत व परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
मंदिराची अख्यायिका अशी की बहादरपूर या गावात उत्तरप्रदेशातून वास्तव्यास आलेले एक ब्राम्हण कुटूंब राहत होते. सुमारे १०० वर्षांपूर्वी या कुटूंबातील रामलाल मिश्र व कलावतीबाई हे दाम्पत्य येथून चारधाम यात्रेसाठी गेले होते. यात्रा करीत असताना बद्रीनाथ येथील विष्णूचे दर्शन घेतल्यावर हे दाम्पत्य भावुक झाले. विष्णूची ती मनमोहक मूर्ती पाहून तिचे चरणस्पर्श करावे, असे रामलाल यांना वाटले. त्यांनी तेथील पुजाऱ्यांना तशी विनंती केली. परंतु त्या पुजाऱ्यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. त्यामुळे रामलाल यांना वाईट वाटले. देवाचे चरणस्पर्श न झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत त्यांना झोप आली नाही.
डोळ्यापुढे सतत विष्णूची मूर्ती दिसत होती. पहाटेच्या सुमारास बद्रीनारायणाने त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे व तुझी इच्छा मी पूर्ण करणार आहे. मी तुझ्यासोबत तुझ्या गावी येण्यासाठी तयार आहे. तेथे माझी शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना कर. त्यामुळे मी सदैव तुझ्या जवळ असेन.
त्याबरोबर खडबडून जागे झालेले रामलाल यांनी स्वप्नदृष्टांताबाबत पत्नीला सांगितले. दोघांनाही अत्यानंद झाला. ते लगेचच आपल्या गावी म्हणजे पारोळ्याकडे येण्यासाठी निघाले. येथे आल्यावर त्यांनी दृष्टांताबद्दल गावकऱ्यांना सांगितले. गावकऱ्यांनीही त्यांना मदत करण्याचे ठरविले. रामलाल मिश्र यांनी आपल्या मालकीच्या जमिनीवर मंदिर बांधण्यास सुरूवात केली. राजस्थान येथील कारागीर गोविंदराम उदेराम यांच्याकडून त्यांनी बद्रिनाथ पंचायतनाच्या मूर्ती बनवून घेतल्या व ज्येष्ठ शुद्ध दशमी, गुरूवार, १२ जून १९२४ या दिवशी बहादरपूरात त्यांची स्थापन केली. येथील नोंदींनुसार या मूर्तींसाठी तेव्हा १,२१२ रुपये आणि मंदिरासाठी १९,११० रुपये इतका खर्च आला होता.
बहादरपूर गावाच्या वेशीवर असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंतच्या मार्गावर दोन्हीकडे उंच झाडे असल्यामुळे हा परिसर शांत व सुंदर भासतो. दीड ते दोन फूट उंचीच्या अधिष्ठानावर बद्रिनारायणाचे हे मंदिर आहे. अधिष्ठानावर प्रदक्षिणामार्ग सोडून आतील बाजूला मंदिर उभे आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या लाकडी प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. या प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. बंदिस्त स्वरूपाच्या या सभामंडपातून बाहेर पडण्यासाठी डाव्या व उजव्या बाजूसही दरवाजे आहेत.
सभामंडपापेक्षा काहीशा उंचावर असलेल्या अंतराळात चार स्तंभांना जोडणाऱ्या तीन कमानी आहेत. यापैकी मध्यभागी असलेल्या कमानीतून गर्भगृहातील वज्रपिठावर असलेल्या बद्रीनारायण पंचायतचे दर्शन होते. बद्रिनारायणाच्या मूर्तीशेजारी येथे नारद, नरनारायण, लक्ष्मी व कुबेर यांच्या मूर्ती आहेत. या मुख्य गर्भगृहाशेजारी दोन्ही बाजूंस उपगर्भगृहे आहेत. त्यापैकी एकात लक्ष्मी व दुसऱ्यात केदारनाथ यांचे स्थान आहे. याशिवाय येथे बद्रीनारायणाचे परमभक्त व मंदिराचे संस्थापक रामलाल आणि त्यांच्या पत्नी यांची संगमरवरी शिल्पे आहेत.
मंदिराच्या सभामंडपावर पत्र्याची शेड आहे व मध्यभागी एक लहानसे शिखर आहे. गर्भगृहावर असलेल्या मुख्य शिखरावर लहान शिखरांच्या प्रतिकृती आहेत. या शिखराच्या चारही कोपऱ्यांत चार लहान शिखरे व गजशिल्पे आहेत. मंदिरासमोर असलेल्या सभागृहात अनेक धार्मिक व मंगलकार्ये होतात. कार्तिक शुद्ध त्रयोदशीपासून चार दिवस येथे यात्रा असते. चतुर्दशीला रथोत्सव साजरा केला जातो. १९२८ पासून हा उत्सव साजरा केला जातो. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. या यात्रेसाठी जिल्ह्यातील अनेक भाविक व परिसरातील माहेरवाशीणी आवर्जून येतात.