शंकर महादेवाच्या गळ्यातील बारावे रुद्राक्ष आणि त्यांच्या मळापासून तयार झालेल्या बाबीर देवाची महती राज्यभर आहे. धनगर समाजाचे कुलदैवत असलेले हे मंदिर इंदापूर तालुक्यातील रुई गावामध्ये आहे. नवसाला पावणारा देव म्हणून बाबीर देवाची ख्याती आहे. येथील यात्रा प्रसिद्ध आहे आणि या यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणासह अनेक राज्यांतून भाविक सहभागी होतात.
पुणे-सोलापूर महामार्गावरील काळेवाडी येथून पाच किलोमीटर अंतरावर रुई गाव आहे. रानावनात रोजीरोटीसाठी भटकणाऱ्या धनगर समाजाचे ते श्रद्धास्थान असले तरी अठरापगड समाजाचे लोक श्रद्धेने, भक्तिभावाने येथे येतात.
या मंदिराबाबत आख्यायिका अशी की बाबीर देव हे येलूमाता आणि मालोजी गवळी यांचे पुत्र. हे घराणे अतिशय श्रीमंत होते. त्यांच्याकडे नोकरचाकरांचीही कमी नव्हती. सर्व काही सुखसोई असतानाही पोटी संतान नसल्यामुळे त्यांचे कशातच मन लागत नव्हते. एकदा येलूमाता गोठ्यातील गाईंची सेवा करीत असतानाच संततीच्या विचारात मग्न होत्या. त्याच वेळी गोठ्यातील एक गाय अचानक बोलू लागली, “तू १२ वर्ष एकही दिवस न चुकता शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची भक्ती केलीस, तर तुला पुत्रप्राप्ती होईल.” गाईच्या मुखातून निघालेल्या शब्दांनुसार येलूमाता अपत्यप्राप्तीसाठी अखंड १२ वर्षे शिखर शिंगणापूरला शंभू महादेवाची भक्ती करीत राहिली. या भक्तीवर प्रसन्न होऊन शंकर महादेवाने अंगाचा मळ आणि गळ्यातील बारावे रुद्राक्ष यातून बाबीर देवाची निर्मिती केली. मात्र, बाबीर केवळ १२ वर्षे जगेल, असेही महादेवाने सांगितले होते.
शंकर महादेवाच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक सुरू असताना बाबीर देवाला बारावे वर्ष लागले. त्यावेळी रानात गुरे चारत असताना लुटारूंनी हल्ला करून, त्याला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाबीर देवानेही त्यांच्याशी दोन हात केले. त्यामध्ये बाबीर देवाचा मृत्यू होत नसल्याने शंकर महादेवानेच वेशांतर करून बाबीर देवाचा शिरच्छेद केला. आई येलूमातेला हे समजताच तिने हंबरडा फोडला. त्यावर शंकर महादेवाने येलूमातेला धीर देताना ‘तुझ्या पुत्राची कीर्ती सर्वत्र पसरेल’, असे सांगितले. त्यानंतर स्वतः महादेवानेच गावातील डोंगरावर बाबीर देवाचे मंदिर बांधले, असे सांगितले जाते. ज्या ठिकाणी महादेवांनी बाबीरचा शिरच्छेद केला, त्या जागेला सायाळीचे बीळ म्हणतात. ती गुहा आजही येथे आहे.
हे मंदिर सुमारे ८०० वर्षे पुरातन असल्याचे सांगितले जाते. मंदिराकडे जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. मंदिराच्या समोरच दोन दीपमाळा आहेत. हे देवस्थान रुई गावाच्या डोंगरावर आहे आणि मुख्य मंदिरासमोर पीर, तसेच इतर मंदिरे आहेत. पिराच्या दर्शनासाठी मुस्लिम भाविक येथे मोठ्या प्रमाणावर येत असतात. दगडी बांधकामातील या भव्य मंदिरात येलूमाता व बाबीर देव यांच्या मूर्ती आहेत. मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर आणि खंडोबा मांडलिक यांनी केल्याची नोंद आहे.
बाबीर देवाचे घट बसवले जातात. नऊ दिवसांनी घट उठल्यानंतर यात्रेला सुरुवात होते. बाबीर देवाची यात्रा दिवाळी-पाडवा, माघ पौर्णिमा व गुढीपाडव्याला साजरी केली जाते. या यात्रेत घोंगडी व लाकडी खेळण्यांची कोट्यवधींची उलाढाल होते. पारंपरिक गजढोल स्पर्धा यावेळी भरवली जाते. तसेच माघी यात्रेला कुस्ती आखाडा भरतो. गुढीपाडव्याला अखंड हरिनाम सप्ताह होतो. या मंदिरात सांगितली जाणारी भाकणूक ऐकण्यासाठी शेकडो भाविक येत असतात. या भाकणुकीवर अनेकांचा विश्वास आहे.
बाबीर देवाची पालखी रथातून उत्साहात आणि भक्तिभावाने गुलालाची उधळण करीत काढली जाते. पालखीमध्ये बाबीर देवाचा चांदीचा मुखवटा असतो. पालखीत हलगीचा गजर, अश्व नृत्य, गजढोलाच्या निनादात असंख्य भाविक भक्तिरसात न्हाऊन निघतात. यावेळी मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण केली जाते. यात्रेत विविध गावच्या सासनकाठ्या म्हणजेच गजकाठ्याही आणल्या जातात. या सासनकाठ्यांमध्ये सर्वांत महत्त्वाची सासनकाठी निमोडची असते. यात्रेत देवीची फुले अंगावर घेणे म्हणजेच देवीचा चाबूक अंगावर मारून घेण्याची प्रथा आहे. अनेक भक्त नवस पूर्ण झाल्यानंतर दंडवत घालत मंदिरापर्यंत जातात. एकूणच हे मंदिर व परिसर मनाला शांती देणारा आहे.