‘एकविसाव्या शतकातील शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई या नियोजनबद्ध शहरात पूर्वी अनेक गावे आणि पाडे वसलेले होते. नेरूळ हे त्यांपैकीच एक. आज नवी मुंबईतील ते एक सर्वांत मोठे उपनगर आहे. बहुप्रांतीय लोक येथे मोठ्या संख्येने राहतात. त्यांच्या आराध्य देवतांची अनेक मंदिरे येथे आहेत. भगवान अय्यप्पाचे भव्य मंदिर हे त्यांपैकीच एक. नेरूळमधील गजबजलेल्या सेक्टर १७ मध्ये एका मोठ्या भूखंडावर हे मंदिर स्थित आहे. केरळमधील नागरिकांची अय्यप्पावर मोठी श्रद्धा असल्याने येथे दर्शनासाठी रोज गर्दी असते.
केरळमध्ये साबरीमला येथे अय्यप्पाचे भव्य मंदिर आहे. साबरीमला हे नाव रामायणातील शबरीवरून पडल्याचे सांगण्यात येते. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. नवी मुंबई, ठाणे व मुंबई परिसरात राहणाऱ्या अय्यप्पा भक्तांना येथे त्याच्या दर्शनाचा लाभ मिळावा या हेतूने नेरूळ येथील ‘श्री अय्यप्पा सेवा समिती’ने १९९६ मध्ये येथे हे मंदिर बांधले. अय्यप्पा षष्ठ, हरिहरपुत्र तसेच मणिकंदन या नावांनीही ओळखला जातो. तो शिव आणि मोहिनीच्या रूपातील विष्णू यांचा पुत्र मानला जातो. भस्मासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनी हा स्त्रीअवतार घेतला होता. यानंतर मोहिनीने शिवशंकराला आपल्या सौंदर्याने मंत्रमुग्ध केले. त्यांच्या मिलनातून अय्यपाचा जन्म झाला. म्हणून त्यास हरिहरपुत्र असेही संबोधले जाते.
अय्यप्पाबाबत पौराणिक आख्यायिका अशी सांगितली जाते की केरळमधील पंडालमचा वैष्णव राजा राजशेखर एकदा शिकारीसाठी गेला असताना त्याला पंबा नदीच्या तीरावर एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. त्या बालकाच्या गळ्यात माला होती व चेहऱ्याभोवती प्रभा पसरली होती. राजा निपुत्रिक होता; परंतु त्या मुलाला सोबत घ्यावे की न घ्यावे याबाबत त्याच्या मनात शंका होती. तेव्हा अगस्त्य ऋषींनी त्याला सांगितले की हे बालक दैवी आहे तेव्हा त्याचा स्वीकार कर. त्या बालकाच्या गळ्यात मणिमाला असल्याने त्याचे नाव मणिकंठ असे ठेवण्यात आले. काही काळाने राजा राजशेखर याच्या राणीला पुत्र झाला. मात्र मणिकंठ यालाच राजा आपला थोरला पुत्र मानत असे. त्याने युवराज म्हणून त्याचा अभिषेक करण्याचेही ठरवले होते.
परंतु मणिकंठाला राज्यपद उपभोगण्यात रस नव्हता. दरम्यान, राजशेखरच्या दरबारातील काही दुष्ट मंत्र्यांनी राणीचे कान भरले आणि त्यांनी मणिकंठचा काटा काढण्याचे ठरवले. राणीचे पोट दुखत आहे व त्यावर इलाज म्हणून वाघिणीचे दूध हवे असे त्यांनी राजाला सांगितले. तेव्हा मणिकंठने वाघिणीचे दूध आणण्याचे काम स्वीकारले. त्याकरीता तो जंगलात गेला असता, त्याचा तेथे महिषीशी सामना झाला. महिषी ही महिषासुराची बहीण होती. दुर्गादेवीने महिषासुराचा वध केल्यानंतर महिषीने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त केला की शिव आणि विष्णूच्या पुत्राखेरीस तिला कोणीही मारू शकणार नाही. शिव व विष्णूचा पुत्र असणे अशक्य असल्याचे माहीत असल्याने ती उन्मत्त झाली. अखेर सर्व देवांनी तिचे अत्याचार मिटवण्याची प्रार्थना विष्णूकडे केली. विष्णूने सागरमंथनाच्या वेळी मोहिनी रूप धारण केले होते. त्या रूपातच शंकराशी विवाह करून झालेले मूल पंडालमच्या निपुत्रिक राजाकडे सोपवण्याचे विष्णूने ठरवले होते. अय्यप्पा हा अशा प्रकारे शिव व विष्णूचा पुत्र असल्याने तो महिषीचा वध करू शकला. यानंतर तो वाघिणीचे दूध घेऊन राजवाड्यात परतला. तेव्हा तो दैवी अवतार असल्याची सर्वांची खात्री पटली. महिषीवधाचे जीवनकार्य समाप्त झाले असल्याने त्याने आता राजवाडा सोडण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्याने राजाला साबरीमला येथे आपले मंदिर
बांधण्यास सांगितले.
अय्यप्पाची पूजा ही शैव, वैष्णव आणि शक्ती यांचा अनोखा संगम आहे. काटेकोर ब्रह्मचर्य, मद्यपान व मांसाहार निषिद्ध आणि कठोर आचारसंहिता त्याच्या भक्तीसाठी आवश्यक मानली जाते. साबरीमला तीर्थयात्रेला जाणारे भाविक मंदिरात जाण्यापूर्वी ४१ दिवसांचे अशा प्रकारचे व्रत पाळतात. ‘श्रीभूतनाथ सदानन्द सर्वभूत दयापरः । रक्षः रक्षः महाबाहो शास्त्रे तुभ्यं नमोनमः ।।’ हा अय्यप्पाचा पूजामंत्र आहे. त्याच्या गजरात नेरूळमधील जुन्या अय्यप्पा मंदिराचा २०१३ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. १० जुलै २०१३ रोजी या मंदिरात प्राणप्रतिष्ठा समारोह साजरा करण्यात आला.
हे मंदिर खास केरळ स्थापत्यशैलीत, वास्तुशास्त्र आणि ‘थाचूशास्त्र’ म्हणजे (सुतारकाम शास्त्र) यांचा विचार करून बांधलेले आहे. ते लाल दगडात बांधलेल्या उंच अधिष्ठानावर स्थित आहे. अधिष्ठानावर प्राकार भिंत आहे. केरळ स्थापत्यशैलीत यास ‘पूरम मटिल’ (मर्यादा) असे म्हणतात. यात मंदिराचे गोपुरम् आहे. केरळ हा कोकणासारखेच पाऊसमान असलेला प्रदेश असल्याने तेथील छप्पर बहुतांशी चारी बाजूंनी उतरत्या प्रकारचे असते. या मंदिराच्या गोपुराचे छप्परही उतरत्या प्रकारचे व द्विस्तरीय आहे. या गोपुरात ‘सोपानम्’ म्हणजे पायऱ्यांचा मार्ग आहे. तेथून आत जाताच समोरच गोपुराहून उंच असा ‘कोडीमारम’ (ध्वजस्तंभ) आहे. हा ध्वजस्तंभ धातूचा आहे व तो सोनेरी पत्र्याने मढवलेला आहे. याच्या बाजूलाच दीपस्तंभही आहेत. याच्या समोरच अय्यप्पा स्वामींचे मंदिर आहे.
सोपानम्, मुखमंडपम् आणि ‘श्रीकोविल’ म्हणजे गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मुखमंडपात जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी तीन–चार पायऱ्या आहेत. मुखमंडाच्या भिंतीवर द्वारपालांची उंच मोठी शिल्पे कोरलेली आहेत. कृष्णपाषाणात कोरलेल्या या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्या नागाच्या वेटोळ्यावर उभ्या आहेत. द्वारपालांचा उजवा पाय नागाच्या फण्यावर ठेवलेला असून, त्या पायाच्या गुडघ्यावर डावा हात ठेवलेला आहे.
श्रीकोविलमध्ये उंच वज्रपीठावर अय्यप्पा स्वामींची मूर्ती विराजमान आहे. गुडघे मुडपून बसलेल्या अय्यप्पांनी एका हाताचे कोपर डाव्या गुडघ्यावर ठेवलेले आहे. दुसरा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. मूर्तीच्या मस्तकी मुकुट आहे. पाठीमागे अर्धचंद्राकृती मखर आहे. मूर्तीच्या सभोवती अनेक दीप तेवत असते व त्यांची प्रभा मूर्तीच्या मुखावर पसरली असते.
या मंदिर प्राकारात भगवान अय्यप्पा या मुख्य देवतेशिवाय गणपती, देवी भद्रा (दुर्गामाता), श्रीकृष्ण, सुब्रमण्यम् (मुरूगन किंवा कार्तिकेयन), तसेच वेट्टाकोरू माकन (शिव) या देवतांचीही मंदिरे आहेत. ही मंदिरेही सोपानम्, मुखमंडपम् आणि श्रोकोविल अशा संरचनेची आहेत. ही सर्व मंदिरे, ध्वजस्तंभ असलेल्या बलिक्कल मंडपातील तसेच प्रदक्षिणा पदावरील स्तंभ हे सारे काही चकचकित सोनेरी पत्र्याने मढवलेले आहे. बारीक नक्षीकामाने ते सुशोभित आहे. यामुळे या मंदिरास एक समृद्धसा चेहरा प्राप्त झालेला आहे.
या मंदिरांच्या मागच्या बाजूस नागराज आणि नागयक्षी यांच्या पाषाणमूर्ती आहेत. त्यास मल्याळीमध्ये ‘कावू’ म्हणजे पाषाण असे म्हणतात. नागराज आणि नागयक्षी हे दिव्य दाम्पत्य मानले जाते. सौभाग्य, समृद्धी आणि संरक्षणासाठी भक्तगण त्यांची पूजा करतात. मंदिराच्या प्रांगणात उजवीकडे मोठे सभागृहही आहे. तेथे उत्सव, पूजाविधी, प्रवचने आदी कार्यक्रम केले जातात. नवी मुंबईतील केरळी नागरिकांच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक जीवनाचा हे सभागृह हा एक अविभाज्य भाग बनलेले आहे.
भगवान अय्यप्पा मंदिरात भाविकांची रोज सकाळ–संध्याकाळ रीघ असते. येथे दररोज पहाटे साडेपाच वाजता निर्माल्य दर्शन आणि देवतांचा अभिषेक होतो. त्यानंतर गणपती होम, उषा पूजा, दीपाराधना (आरती) हे सोहळे साडेदहा वाजेपर्यंत चालतात. यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता दर्शन, पूजा, दीपाराधना (आरती) हे सोहळे सुरू होतात. रात्री ८.३० वाजता अथाज पूजा (सायंकाळची पूजा) व आरती यांस सुरुवात होते. येथे पहाटे ५.३० ते सकाळी १०.३० आणि सायंकाळी ५.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत भक्त दर्शन घेऊ शकतात.
मंदिरात दरवर्षी नोव्हेंबरच्या मध्यापासून डिसेंबरच्या अखेरीपर्यंत ४१ दिवसांचा मंडला पूजा महोत्सव साजरा केला जातो. तसेच दरवर्षी येथे पाच दिवसांचा वार्षिक मंदिर महोत्सव साजरा केला जातो. मल्याळम पंचांगाच्या वृश्चिकम महिन्याच्या शेवटच्या शनिवारी (डिसेंबरच्या मध्यात) या उत्सवाची सांगता होते. याशिवाय मंदिरात महाशिवरात्र, गणेश चतुर्थी, मकर संक्रांत, रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, नवरात्र हे उत्सव व सण अत्यंत धार्मिक वातावरणात साजरे केले जातात.