अष्टविनायक मंदिर

शिवाजीनगर, लातूर, ता. जि. लातूर

लातूर शहरात ‘ट्युशन नगर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिवाजीनगर परिसरात विद्येची देवता मानल्या जाणाऱ्या गणपतीचे मंदिर आहे. या मंदिरात गणपतीच्या मुख्य मूर्तीसह अष्टविनायकांच्या प्रतिमांची सुंदर रचना करण्यात आली आहे. याचप्रमाणे येथे शिवशंकर, नवग्रह आणि विठ्ठल-रखुमाई यांचीही स्थाने आहेत. येथे असलेल्या देवी-देवतांच्या मूर्ती, उद्याने, हिरवाई आणि सजावटीसाठी करण्यात आलेली वैशिष्ट्यपूर्ण रचना यामुळे हे मंदिर भाविकांबरोबर पर्यटकांचेही आवडते स्थान आहे. मंगळवारी आणि सुटीच्या दिवशी येथे मोठ्या संख्येने दर्शनार्थी येतात. उत्सवकाळात येथे पन्नास हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात, असे सांगितले जाते.

अष्टविनायकातील गणपतींची संख्या आठ असण्यामागे विशिष्ट विचार आहे. प्राचीन काळापासून आठ या अंकाला आपल्या संस्कृतीत मोठे महत्त्व आहे. अष्टविनायकाची ही आठ स्थाने प्रमुख अष्टदिशांचे प्रतिनिधित्व करतात, असे मानले जाते. गाणपत्य संप्रदायात ‘गणेश पुराण’ आणि ‘मुद्गल पुराण’ ही दोन पुराणे महत्त्वाची मानली जातात. या पुराणांच्या रचनाकाळाविषयी विविध विद्वानांची वेगवेगळी मते आहेत. महामहोपाध्याय पां. वा. काणे यांनी ‘धर्मशास्त्राचा इतिहास – खंड २’मध्ये असे म्हटले आहे की या दोन्ही पुराणांचा काळ अनिश्चित आहे. प्रख्यात संस्कृतविद् राजेंद्र चंद्र हाजरा यांनी ‘गणेश पुराणा’चा काळ इ.स. ११०० ते १४०० या दरम्यानचा असल्याचे व ‘मुद्गल पुराण’ हे गणेश पुराणाच्या आधीचे असल्याचे म्हटले आहे.

या ‘मुद्गल पुराणा’मध्ये प्रथम अष्टविनायकांची संकल्पना मांडण्यात आली आहे. नऊ खंड, ४२८ अध्याय आणि २३ हजार १५० श्लोक असा हा महाग्रंथ आहे. त्यातील आठ खंडांमध्ये एकेका विनायकाचे वर्णन आलेले आहे. ‘मुद्गल पुराणा’नुसार, मनुष्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार आणि अज्ञान हे आठ प्रकारचे मुख्य दोष किंवा विकार असतात. या पुराणाच्या आठ खंडांमध्ये हे विकार कामासुर, क्रोधासुर, लोभासुर, मोहासुर, मदासुर, मत्सरासुर, अहंकारासुर आणि अज्ञानासुर या रूपांत येतात. गणपतीच्या आठ रूपांनी या आठ असुरांचा नाश केल्याची कथा त्यात येते. याशिवाय गणपती हा अणिमा (अणुपेक्षाही सूक्ष्म होणे), महिमा (शरीर भव्य दिव्य करणे), गरिमा (शरीर जड करणे), लघिमा (हवेत उडता येईल एवढे शरीर हलके करणे), प्राप्ती (कोणतीही वस्तू प्राप्त करणे), प्राकाम्य (कोणत्याही परिस्थितीत टिकून राहणे), ईशित्व (ईश्वरीय शक्ती प्राप्त करणे) आणि वशित्व (दुसऱ्यांना वश करणे) या अष्टसिद्धींचा स्वामी असल्याचे मानले जाते. अष्टविनायक यात्रा केल्याने या अष्टसिद्धींची प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

अष्टविनायक यात्रेत या आठही ठिकाणच्या विनायकांचे क्रमाने दर्शन घ्यावे, असे सांगितले जाते. अष्टविनायक यात्रा ही मंडलाकार किंवा चक्राकार असते. अध्यात्मात पूर्णत्व या संकल्पनेला महत्त्व आहे. जिथून सुरुवात झाली, तिथेच येऊन थांबणे हे चक्र पूर्ण झाल्याचे लक्षण मानले जाते. पुणे जिल्ह्यातील मोरगाव हे गाणपत्य संप्रदायाचे आद्यपीठ आहे. त्यामुळे अष्टविनायकाची दर्शनयात्रा तेथून सुरू करून तेथेच संपवणे आवश्यक मानले गेले आहे. परंतु हे सर्वांनाच शक्य होत नाही. त्यांच्यासाठी एकाच ठिकाणी अष्टविनायकांचे दर्शन घडवणारी अशी मंदिरे महत्त्वाची ठरतात. लातूरमधील हे अष्टविनायकांचे मंदिर म्हणूनच एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे.

लातूर शहरातील या अष्टविनायक मंदिराची निर्मिती १९८९ मध्ये करण्यात आली होती. हे स्थान अतिशय रमणीय आहे. येथे मुख्य अष्टविनायक मंदिराच्या अगदी समोरच छोट्या गुंफा आणि दगडी मूर्तींचा आभास निर्माण करणारा कृत्रिम पर्वत उभारण्यात आला आहे. या पर्वताच्या समोरच शंकराची सुमारे दहा फूट उंच मूर्ती आहे. त्रिशूळ आणि जटाधारी असे त्या शंकराचे रूप आहे. या मूर्तीच्या समोर एक शिवपिंडीही आहे. या शिवपिंडीसमोर एका चौथऱ्यावर एकमेकांच्या पाठीला पाठ असणाऱ्या दोन मूर्ती आहेत. त्यातील एक नंदीची आणि दुसरी मूषकाची आहे. नंदीचे तोंड शंकराच्या दिशेला आहे, तर मूषकाची दिशा गणपती मंदिराच्या दिशेला आहे. गणपती मंदिराची रचना अष्टकोनी आहे. आत उंच वज्रपीठावर चांदीच्या सुंदर महिरपीत गणपतीची संगमरवरी मूर्ती स्थापित आहे. या मूर्तीच्या भोवतीने असलेल्या देवकोष्टकांत मयूरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरिजात्मज, विघ्नेश्वर आणि महागणपती यांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मंदिराच्या सभोवताली सुंदर आणि सुशोभित बाग आहे. मंदिर परिसरात विठ्ठल रखुमाई आणि नवग्रह मंदिरही आहे. मंदिर परिसरात इतरही अनेक देवतांच्या मूर्ती आहेत. येथे गोसेवेचा प्रचार करणारे पुतळेही आहेत.

येथे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीचा उत्सव अत्यंत थाटामाटात साजरा होतो. अनंत चतुर्दशीपर्यंतचे दहा दिवस येथे विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. माघ महिन्यातील गणेश जयंती देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला लातूर शहर आणि परिसरातील हजारो भाविकांच्या येथे दर्शनासाठी रांगा लागतात. या मंदिरात भाविक दररोज सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत दर्शन घेऊ शकतात. येथे महाशिवरात्र आणि आषाढी एकादशीही साजरी करण्यात येते.

उपयुक्त माहिती:

  • लातूर बस स्थानकापासून २.७ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून लातूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२३८२-४६८०५२, मो. ८४२१३ ८८२३८

अष्टविनायक मंदिर

शिवाजीनगर, लातूर, ताल. जिला. लातूर

Back To Home