महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा हा प्रदेश संत आणि देवतांची भूमी म्हणून ओळखला जातो. येथील प्रत्येक डोंगरदऱ्यांत आणि नद्यांच्या तीरांवर आध्यात्मिकतेचा समृद्ध वारसा जतन केलेला आहे. जालना जिल्हा देखील या ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. या जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात वसलेले साखळडोह-मेरखेडा येथील आसरा देवी संस्थान हे भाविकांच्या श्रद्धेचे एक जागृत केंद्र आहे. निसर्गरम्य जीवरेखा नदीच्या काठावर असलेल्या या स्थानाला शेकडो वर्षांचा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा लाभला आहे. हे मंदिर जलसंस्कृती आणि लोकश्रद्धेचे प्रतीक मानले जाते. विशेषतः ‘साती आसरा’ या जलदेवतांच्या उपासनेसाठी हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. मनोकामना पूर्ण करणाऱ्या देवी म्हणून साखळडोहच्या आसरा देवीवर भाविकांची अढळ श्रद्धा आहे.
आसरा देवीच्या स्थानाचा इतिहास आणि जालना जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी अत्यंत प्राचीन काळापासून सुरू होते. जालना जिल्हा प्राचीन काळापासून विविध राजकीय सत्तांचा साक्षीदार राहिला आहे.
सातवाहन कालखंडापासून सुरू झालेला हा ऐतिहासिक प्रवास यादव, मुघल आणि मराठा साम्राज्यांच्या पाऊलखुणा मिरवत आजच्या आधुनिक काळापर्यंत येऊन पोहोचला आहे. ऐतिहासिक संदर्भांनुसार, जाफराबाद शहराची स्थापना मुघल बादशाह औरंगजेब याच्या काळात जफर खान याने केली. औरंगजेबाने इतर ११५ गावांसोबत या ठिकाणाची जहागिरी जफर खानला सोपवली होती, त्यावरून या गावाला जाफराबाद हे नाव पडले. मात्र, येथील जलदेवतांची उपासना ही त्याही आधीच्या काळापासून चालत आलेली प्राचीन लोकपरंपरा आहे. मराठवाड्यातील मंदिरांच्या परंपरेत ‘आसरा’ किंवा ‘साती आसरा’ या जलदेवतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या देवतांचे वास्तव्य प्रामुख्याने नैसर्गिक पाणवठ्यांच्या ठिकाणी असते. साखळडोह येथील हे स्थान अशाच एका निसर्गरम्य डोहाच्या काठावर वसलेले आहे.
जालना जिल्ह्याचा धार्मिक इतिहास थेट रामायण काळाशी जोडला गेलेला आहे. मंठा तालुक्यातील नांगरतास मंदिर हे श्रीराम वनवास मार्गावरील १४८ वे स्थान मानले जाते. या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे बंधू लक्ष्मण यांनी स्थानिक रहिवाशांना शेतीचे प्राथमिक धडे दिल्याची आख्यायिका प्रचलित आहे. हीच परंपरा पुढे चालत असताना यादव काळात या भागात वास्तुकलेचा मोठा विकास झाला. यादव राजांनी या प्रदेशात अनेक मंदिरे आणि बारवा म्हणजे पायऱ्यांच्या विहिरी बांधल्या.
या वास्तू आजही त्यांच्या वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून उभ्या आहेत. अंबड येथील मत्स्योदरी देवी मंदिर आणि भोकरदन येथील खोलेश्वर मंदिर ही याची ठळक उदाहरणे आहेत. साखळडोह येथील आसरा देवी मंदिर देखील या ऐतिहासिक साखळीचाच एक भाग आहे. जीवरेखा नदीच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर आणि येथील नैसर्गिक डोह वर्षानुवर्षे जालना जिल्ह्यातील जलसंस्कृतीचा भाग राहिले आहेत.
साती आसरा या मुळात लोकदेवता किंवा ग्रामदेवता आहेत. त्यांची उपासना समाजात खोलवर रुजलेली आहे. साखळडोह येथील मंदिराचा इतिहास सुमारे ४०० ते ५०० वर्षे जुना असल्याचे मानले जाते. सृजनाची अधिष्ठात्री देवता म्हणून यांना लोकसाहित्यात ओळखले जाते. स्त्रीच्या सर्जन शक्तीचे प्रतीक म्हणून या संकल्पनेचा संबंध सात आसरा किंवा सप्तमातृका यांच्याशी जोडला जातो. साती आसरा या मुळात सात बहिणी आहेत असे मानले जाते. त्यांची नावे मत्स्यी, कूर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमपा आणि मकरी अशी आहेत.
ही नावे जलचरांशी मिळतीजुळती आहेत. उदाहरणार्थ, मत्स्यी म्हणजे मासा, कूर्मी म्हणजे कासव, कर्कटी म्हणजे खेकडा, दर्दुरी म्हणजे बेडूक आणि मकरी म्हणजे मगर. त्यामुळेच साखळडोह येथील जीवरेखा नदी आणि तेथील नैसर्गिक धबधबा यांकडे देवीचे निवासस्थान म्हणून पाहिले जाते.
साखळडोह येथील आसरा देवी मंदिराशी व येथील डोहाशी संबंधित महत्त्वाची आख्यायिका अशी की प्राचीन काळी जेव्हा गावात किंवा परिसरात कोणाकडे लग्नकार्य किंवा मोठा धार्मिक सोहळा असायचा, तेव्हा लोकांना मोठ्या भांड्यांची गरज पडायची. त्या काळी एवढी मोठी भांडी सहज मिळत नसत. अशा वेळी लोक साखळडोहच्या डोहापाशी जात असत. भाविक एका चिठ्ठीवर आपल्याला हव्या असलेल्या भांड्यांची यादी लिहून ती चिठ्ठी डोहामध्ये टाकत असत. असे मानले जाते की काही वेळातच ती सर्व भांडी डोहाच्या पाण्यावर तरंगताना दिसत असत. लोक ती भांडी वापरून आणि स्वच्छ करून पुन्हा डोहात अर्पण करत असत. ही परंपरा अनेक वर्षे चालली. मात्र, एकदा एका व्यक्तीने लोभापायी ती भांडी परत केली नाहीत किंवा अशुद्ध हेतूने ती चोरली.
तेव्हापासून हा चमत्कार बंद झाला, असे येथील वृद्ध माणसे आजही श्रद्धेने सांगतात.
साती आसरा या सात बहिणींविषयी देखील अनेक कथा प्रचलित आहेत. बाळंतपणात मृत्यू पावलेली स्त्री आसरा योनीत जन्म घेते आणि ती या पाणवठ्यांचे रक्षण करते, अशी एक धारणा आहे. मात्र, साखळडोह येथे या देवतांना देवीचे अत्यंत सात्त्विक आणि मंगलमय रूप मानले जाते. येथील डोहाचे नाव ‘साखळडोह’ का पडले, यामागेही एक कथा आहे. पावसाळ्यात जेव्हा धबधबा उंचावरून कोसळतो, तेव्हा त्याचे पाणी पांढऱ्या शुभ्र साखळीप्रमाणे भासते. म्हणून याला साखळडोह असे नाव पडले आहे. काही लोक असेही मानतात की या डोहाच्या तळाशी सोन्याची साखळी दडलेली आहे. ही साखळी केवळ शुद्ध मनाच्या लोकांनाच कधीतरी दर्शन देते, असा समज आहे.
देवीचे स्थान येथील नदीपात्रात असलेल्या डोहाजवळ आहे. मेरखेडा गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या स्थानावर रुढार्थाने कोणतेही बांधीव मंदिर नसून डोहातील काही पाषाणांचीच येथे आसरा देवी म्हणून पूजा केली जाते.
या नदीच्या किनाऱ्यावर भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याची शेड टाकून मंडप उभारण्यात आलेला आहे. या मंडपापासून नदीपात्रात जाण्याच्या मार्गावरही गजपृष्ठाकार शेड उभारण्यात आलेली आहे. या शेडखाली भाविकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था आहे. या शेडच्या उजवीकडे एका मोठ्या चौथऱ्यावर दीपस्तंभ आहे. येथून देवीच्या स्थानाजवळ जाण्यासाठी उतरावे लागते. नदीतील पाषाणातून बनविलेल्या पायऱ्यांतून खाली आल्यावर अनेक पाषाणांना शेंदूर लावलेले दिसते. मुख्य देवतांचे स्थान असलेल्या भागात एक पत्र्याची शेड आहे. येथे देवीचा पाळणा व आसरा देवीचे शेंदूर लावलेले पाषाण आहेत. याशिवाय मंडपात भाविकांनी नवसपूर्तीनिमित्त विविधरंगी कपड्यांत बांधलेली शेकडो नारळ आहेत. येथील देवीच्या पाळण्याजवळ अनेकांनी पितळी घंटा व पितळी पाळणे अर्पण केलेले आहेत. या डोहाच्या शेजारीच एक नंदीची मोठी मूर्ती व इतर लहान मंदिरे आहेत. येथील डोहाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील पाणी कधीही आटत नाही. अगदी भीषण दुष्काळातही या डोहातील पाण्याची पातळी कायम राहते, असे सांगितले जाते.
या देवीची वार्षिक जत्रा दरवर्षी चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी असते. या यात्रेसाठी महाराष्ट्रासोबतच रायपूर, सिमला, कोलकाता येथूनही हजारो भाविक येथे उपस्थित असतात. या उत्सवाच्या वेळी देवीची ओटी भरण्याची आणि नवस फेडण्याची विशेष परंपरा आहे. अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येथे येतात. ज्या दांपत्यांना अपत्यप्राप्ती होत नाही, असे भाविक मोठ्या श्रद्धेने येथे नवस करतात. याशिवाय मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या दिवसांत येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. रूढार्थाने येथे देवीचे मंदिर नसल्यामुळे डोहाशेजारी वसलेल्या या स्थानाच्या दर्शनासाठी भाविकांना कधीही येता येते.