देवगिरीच्या यादवांच्या काळात भरभराटीस आलेले प्राचीन एकचक्रनगर म्हणजे आजचे वेळापूर. येथे अर्धनारीनटेश्वराचे मंदिर म्हणून ओळखले जाणारे हरनारेश्वर महादेवाचे मंदिर आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधलेले हे मंदिर सुमारे सव्वासातशे वर्षांपूर्वीचे आहे. या मंदिरातील शिव व शक्ती यांचे लिंग स्वरूपात एकरूप आढळते. धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे केंद्र असलेल्या या मंदिराच्या परिसरातील अनेक वीरगळ पुरातत्त्व खात्याने जवळच बांधलेल्या संग्रहालयात आहेत. यातील काही वीरगळांचे वैशिष्ट्य असे की त्यांवर हात फिरवला अथवा टिचकी मारल्यास त्यातून सप्तसूर निघतात.
वेळापूर हे गाव आळंदी ते पंढरपूर या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर वसलेले आहे. या गावचा परिसर रामायण काळात दंडकारण्याचा भाग होता. प्राचीन काळी ही अनेक ऋषीमुनींची तपोभूमी होती. या ठिकाणी शांडिल्य ऋषींनी तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. यादवकाळापासूनचे म्हणजे तेराव्या–चौदाव्या शतकापासूनचे पुरावे येथे आढळतात. या गावाच्या नामोत्पत्तीबद्दल असे सांगण्यात येते की वेळ याचा एक अर्थ सीमा असाही आहे. हे गाव यादवांच्या देवगिरी साम्राज्याच्या दक्षिण सीमेवर असल्याने त्यास त्या काळात वेळापूर असे नाव पडले असावे. माणदेश व इतर भागांवर लक्ष ठेवण्यासाठी वेळापूर येथे उपराजधानीप्रमाणे यादवांचे लष्करी ठाणे होते व यादवांच्या वतीने या ठाण्याचा कारभार ब्रह्मदेवराणा आणि त्याचा बंधु बाइदेवराणा हे पाहात असत.
या बंधुंनी येथील इ.स. १३०० ते १३०५ या काळात अर्धनारीनटेश्वराच्या मूळ मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. या बाबतचे तीन शिलालेख उपलब्ध आहेत. त्या काळात या मंदिरातील महादेवास अर्धनारीनटेश्वर नव्हे, तर वटेश्वर असे संबोधन होते, हे या शिलालेखांवरून स्पष्ट होते. ‘महाराष्ट्र व गोवे शिलालेख–ताम्रपटांची वर्णनात्मक संदर्भ सूची’ या डॉ. शां. भा. देव यांच्या ग्रंथात या शिलालेखांची माहिती देण्यात आलेली आहे. यातील एक शिलालेख हा मंदिरासमोरील विहिरीच्या पायऱ्यांनजीक आहे. ‘शके १२२७, विश्वावसु संवत्सर, मार्गशीर्ष शुद्ध ५, सोमवार, २२ नोव्हेंबर १३०५’च्या या शिलालेखात असे नमूद आहे की ‘ब्रह्मदेवराणा याने वेळापुरातील वटेश्वराच्या लहान देवळावर मलयाचलाप्रमाणे प्रासाद उभारला. तसेच देवता व लोकपाल यांच्यात एकसूत्रता आणून कलश प्रतिष्ठापना केली व देवळावर ध्वज लावला.’ वटेश्वराच्या मंदिरास मिळालेल्या दानांचाही उल्लेख या शिलालेखात आहे व त्यात दानकर्ता म्हणून बाइदेव व चारुगुडा अशी नावे आहेत.
दुसरा शिलालेख ‘शके १२२२, शार्वरी संवत्सर, मार्गशीर्ष वद्य ९, सोमवार, ५ डिसेंबर, १३००’चा आहे. त्यात बाइदेवाने वटेश्वराचा मठ करमुक्त केल्याचे उल्लेख आहेत. याच तारखेचा एक शिलालेख मंदिरातील एका शिळेवर कोरलेला होता. त्यात ‘यादव नृपती रामचंद्रदेव याचा सर्वाधिकारी जोइदेव याचा निरोपित (मुतालिक) ब्रह्मदेवराणा व त्याचा भाऊ बाइदेवराणा यांनी वेळापूरच्या वटेश्वर–जोगेश्वराच्या देवालयाचा काही भाग नवीन बांधून दानधर्म केला,’ असे नमूद करण्यात आले आहे. शिलालेखांत वटेश्वर असे म्हटलेल्या या मंदिरातील महादेवास हरनारेश्वर असेही म्हटले जाते. सोलापूर जिल्हा गॅझेटियरमध्ये हरनारेश्वर याच नावाने या मंदिराची नोंद आहे.
‘शिवपुराणा’च्या ‘शतरुद्र संहिते’च्या तिसऱ्या अध्यायात अर्धनारीनटेश्वराच्या निर्मितीची आख्यायिका नमूद आहे. त्यानुसार, सृष्टीची वाढ होत नसल्याने ब्रह्मदेव चिंतेत होते. त्यांनी मैथुनी सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला, पण तोपर्यंत शिवापासून स्त्रियांच्या कुळाचा जन्म झाला नव्हता. तेव्हा ब्रह्मदेवाने शिवाला शक्तीने संतुष्ट करण्यासाठी तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येने संतुष्ट होऊन भगवान शंकर अर्धनारीनटेश्वराचे रूप धारण करून त्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्या शरीरातील देवी शक्तीचे अंश वेगळे केले. त्यानंतर ब्रह्माजींनी त्यांची पूजा केली. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन, शक्तीने आणखी एक शक्ती निर्माण केली, जी दक्षाच्या घरी मुलगी म्हणून जन्मली. तीच सती होय.
वेळापूरचे ग्रामदैवत असलेले अर्धनारी नटेश्वर मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूस असलेल्या एका लहानशा देवळीत गणेशमूर्ती आहे. या प्रवेशद्वारातून आत मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात डाव्या बाजूस प्राचीन दीपमाळ आहे. या दीपमाळेच्या शेजारीच एक पुष्करणी (बारव) आहे. असे सांगितले जाते की या पुष्करणीला सर्व बाजूंनी झरे असल्यामुळे कितीही दुष्काळ पडला तरी ती कोरडी होत नाही. पुष्करणीच्या नैऋत्य दिशेला एक लहान मंदिर आहे. त्यामध्ये काशीविश्वनाथ व रामेश्वर अशी दोन शिवलिंगे आहेत. या दोन्ही पिंडी पाण्यात आहेत. पावसाळ्यात बारवेतील पाण्याची पातळी वाढल्यावर त्या पाण्याखाली जातात. त्यामुळे हे तीर्थ पवित्र समजले जाते.
या पुष्करणीला लागून वायव्येकडे बळीश्वर मंदिर आहे. बळीश्वर मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे दगडी आहे. हे मंदिर मुख्य मंदिराच्या समोरील बाजूस जमिनीमध्ये असल्याप्रमाणे भासते. या मंदिराच्या गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीजवळ उंच आसनावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात एक प्राचीन नंदी व दोन शिवपिंडी आहेत. या मंदिरापासून काही पायऱ्या वर चढून मुख्य मंदिराकडे जाता येते. नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप, मुख्य गर्भगृह व दोन उपगर्भगृहे अशी अर्धनारीनटेश्वर मंदिराची संरचना आहे. पूर्णपणे दगडी बांधणीच्या नंदीमंडपात एका चौथऱ्यावर भली मोठी नंदीची मूर्ती आहे. या नंदीच्या शिंगांतून पाहिले असता मंदिराच्या कळसाचे दर्शन होते. जमिनीपासून उंच जगतीवर असल्यामुळे नंदीमंडपापासून मंदिराच्या मुखमंडपात जाण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. अर्धखुल्या स्वरुपाच्या मुखमंडपात दगडी स्तंभ व दगडी कक्षासने आहेत. येथून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो.
सभामंडपाच्या भिंतींवर दक्षिणमुखी गणेशमूर्ती व सप्तमातृका आहेत. सभामंडपात मध्यभागी एका मोठ्या चौथऱ्यावर भला मोठा नंदी आहे. याशिवाय सभामंडपात उत्तरेकडे मुख व हंस वाहन असलेली काहीशी भंगलेली एक मूर्ती, सिंहावर आरुढ व विविध शस्त्रे हातात घेऊन महिषासुराचा वध करणारी देवीची मूर्ती, बिगरसोंडेची गणेशमूर्ती आणि चामुंडा देवी यांच्या मूर्ती आहेत. या सभामंडपात दोन बाजूला असलेल्या उपमंडपांपैकी डावीकडे महान शिवउपासक शांडिल्य ऋषींचे शिवलिंगस्वरुपातील स्थान आहे. तर उजवीकडील उपगर्भगृहात देवाचे शेजघर आहे. त्यात देवाच्या विश्रांतीसाठी सागाचा पलंग आहे.
मंदिराच्या मुख्य गर्भगृहाबाहेर गजलक्ष्मी देवाची मूर्ती आहे. या मूर्तीच्या दोन्हीकडे हत्तीशिल्पे आहेत. गर्भगृहात मध्यभागी शिवलिंगावर शिव व पार्वती यांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहेत. शिवाच्या चतुर्भुज मूर्तीवर जटेमध्ये उजव्या बाजूस सूर्य व डाव्या बाजूस चंद्र कोरलेले आहेत. कपाळाच्या वर जटेखाली मुंडमाळा, कानात कुंडले व गळ्यापासून पायांपर्यंत विविध अलंकार कोरलेले आहेत. शिवाच्या डावीकडील एका हातात त्रिशुळ व दुसऱ्या हातात जपमाळ आहे. उजवीकडील एका हातात पाच फण्यांचा नाग आहे व दुसरा हात पार्वतीच्या कमरेवर आहे. पार्वतीची मूर्ती नाजूक चेहरा असलेली आहे. कानात कर्णफुले, डोक्यावर केसांचा आंबाडा, तिचा उजवा हात शिवाच्या खांद्यावर तर दुसऱ्या हातात कमळ व पाश आहेत. या दोन्ही हातांमध्ये बांगड्या, बोटांमध्ये अंगठ्या, गळ्यामध्ये विविध दागिने, पायात जोडवी व पैंजण कोरलेले आहेत. पार्वतीच्या नाकात नथ घालण्यासाठी लहानसे छिद्रही आहे. या मूर्तींच्या मागे पाषाणी प्रभावळ आहे. त्यामध्ये शिवाच्या हातातील त्रिशुळाच्या वरच्या भागात ब्रम्हदेवाची मूर्ती कोरलेली आहे. याशिवाय या प्रभावळीवर अष्टदेवता व मध्यभागी कीर्तिमुख आहे.
या मंदिराच्या परिसरात काही साधू–संतांच्या संजीवन समाध्या आहेत. या समाध्यांवर शिवपिंडी आहेत. याच प्रमाणे मंदिराच्या डाव्या बाजूस तीन सत्पुरुषांच्या मंदिरांसारख्या बांधलेल्या प्राचीन समाध्या आहेत. अर्धनारीनटेश्वर मंदिराचा वार्षिक उत्सव गुढीपाडव्यापासून सुरू होतो. यामध्ये चैत्र शुद्ध पंचमीला हळदी व लग्न उत्सव असतो, तो अष्टमीपर्यंत चालतो. याशिवाय महाशिवरात्र व श्रावणी सोमवारी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.