आनंदी गणेश / महादेव मंदिर

अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर

एकेकाळी आशियातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत म्हणून गणल्या गेलेल्या अकलूज ग्रामपंचायतीचे आज नगरपरिषदेत रुपांतर झाले आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारे हे शहर असले तरी नीरा नदीकाठी वसल्याने ते समृद्ध आहे. या शहराच्या अनेक भागांत येथील मंदिरांभोवती सुंदर उद्याने आहेत. त्यांची चांगली देखभाल होत असल्याने या मंदिरांत जाणे हा एक सुखद अनुभव ठरतो. असाच अनुभव देणारे येथील आनंदी गणेशाचे मंदिर हे पर्यटकांसोबतच हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या गणेश मंदिर परिसरात वैशिष्ट्यपूर्ण रचनेचे महादेवाचे मंदिरही आहे

अकलूज शहराला लागून असलेल्या एका लहानशा निसर्गरम्य टेकडीवर आनंदी गणेश मंदिर स्थित आहे. येथील प्रमुख राजकीय घराणे असलेल्या मोहीतेपाटील कुटुंबियांकडून २००१ मध्ये या आनंदी गणेशाची स्थापना करण्यात आली. या मंदिर परिसराचे सुशोभिकरण सुरू असताना २००२ मध्ये मंदिरापासून काही अंतरावर जमिनीखाली शिवपिंडी सापडली. २००५ मध्ये शिवपिंडीची विधीवत स्थापना करून त्याच जागेवर एक शिवमंदिर उभारण्यात आले. या दोन्ही मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यामुळेच आज या परिसरात मोठ्या प्रमाणात बहरलेली झाडे दिसतात. त्यामध्ये आंबा, चिकू, नारळ आणि इतर अनेक झाडांचाही समावेश आहे. यासोबतच काही ठिकाणी औषधी वनस्पतींचीही लागवड करण्यात आलेली आहे.

या मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या वाहनतळापर्यंत खासगी वाहने येऊ शकतात. येथून मंदिरापर्यंत पायी जावे लागते. पण ही वळणावळणाची वाट झाडांमधून जात असल्याने चालण्याचे श्रम भासत नाहीत. रस्त्यात ठिकठिकाणी भाविक पर्यटकांना बसण्यासाठी बाके आहेत. परिसरातील स्वच्छता वाखणण्याजोगी आहे. झाडांची, रोपांची इतकेच काय पायाखालच्या हिरवळीचीही देखभाल काळजीपूर्वक होत असल्याचे दिसते. वाहनतळापासून सुमारे १० मिनिटे चालल्यावर गणेश मंदिराच्या उद्यानात प्रवेश होतो. या उद्यानात विविध प्रकारची फुलझाडे फुललेली दिसतात. या उद्यानातून गणेश मंदिरात येण्यासाठी पेव्हरब्लॉकची फरसबंदी असलेला रस्ता आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळाची झाडे आहेत. या रस्त्यावरून गणेश मंदिराच्या प्रांगणात पोहचण्याआधी भल्या मोठ्या शुभ्र नंदीमूर्ती दिसतात. प्रत्यक्षात त्या पाण्याच्या टाक्या आहेत. मंदिरात प्रवेश करताना हातपाय स्वच्छ करून जावे, हा उद्देश त्यामागे आहे

मंदिर जमिनीपासून काहीसे उंचावर आहे. तीन मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडप सभामंडपातील संगमरवरी स्तंभ हे कमळफुलात उभे आहेत, असे नक्षीकाम आहे. तिन्ही मुखंडपांतील पहिले दोन स्तंभ वरच्या दिशेने कमानीसदृश्य कलाकुसरीने एकमेकांशी जोडलेले आहेत. येथून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप हा पूर्ण खुल्या स्वरूपाचा आहे. येथील वैशिष्ट्य असे की गर्भगृह सोडल्यास या मंदिराला कोठेही भिंती नाहीत. सभामंडपाच्या मध्यभागी जमिनीवर संगमरवरी कासवमूर्ती आहे

येथील बंदिस्त गर्भगृहात वज्रपिठावर संगमरवरात घडवलेली सुबक गणेशमूर्ती आहे. गणेशमूर्तीच्या वरच्या दोन्ही हातात शस्त्रे आहेत. खालचा उजवा हात आशिर्वादासाठी पुढे आहे तर डाव्या हातात लाडू आहे. गणेशाच्या डोक्यावर मुकुट त्यावरील भागात छत्र आहे. या मूर्तीच्या समोर वज्रपिठावर एक लहान पितळी उत्सवमूर्ती आहे. उंची वस्त्रे ल्यालेली ही गणेशमूर्ती प्रसन्न भासते

मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील भिंतींमधील देवकोष्टकांत सुबक कोरीव काम असलेल्या विविध देवतांच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या तिन्ही मुखमंडपांवर असलेल्या लहान शिखरांवर आमलक कळस आहेत. सभामंडपावरील घुमटाकार शिखराच्या अग्रभागी मुखमंडपांप्रमाणेच आमलक कळस आहे. गर्भगृहावरील मुख्य शिखर हे पाच थरांचे आहे त्यात अनेक लहान लहान उपशिखरे आहेत. मुख्य शिखरावर अग्रभागी आमलक आणि कळस आहे.

तब्बल सत्तर एकरात पसरलेला हा मंदिर परिसर स्वच्छ सुंदर भासतो. येथे देवदर्शन आणि निसर्गदर्शनाची जोडपर्वणी साधण्यासाठी अनेक जण येत असतात. या मंदिरापासून काही अंतरावर महादेव मंदिर आहे. या दुमजली मंदिराची रचना वैशिष्ठ्यपूर्ण आहे. या मंदिराच्या तळमजल्यावर सभागृह आहे. या सभागृहाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजुला वरच्या मजल्यावर असणाऱ्या मंदिराकडे जाण्यासाठी अर्धगोलाकार आकाराचे दोन पायरीमार्ग आहेत. त्या शेजारी दीपमाळ आहे. वरच्या स्तरावर गेल्यानंतर काठाशी असलेल्या नक्षीदार देवकोष्टकांमध्ये कृष्णशिळेत घडवलेल्या काही मूर्ती आहेत. या मंदिराची रचनाही आनंदी गणेश मंदिराप्रमाणेच आहे. खुल्या सभामंडपात मध्यभागी नंदीची मूर्ती आहे गर्भगृहात कोरीवकाम असलेली शिवपिंडी आहे. या उंचीवरच्या शिवमंदिरातून अकलूज शहराचे विहंगम दर्शन होते.

गणपती आणि महादेवाची ही दोन मंदिरे असलेल्या या निसर्गरम्य परिसरात ध्यानमंदिर आणि सांस्कृतिक भवनही उभारण्यात आलेले आहे. तेथे मंदिर समितीच्या वतीने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आरोग्य शिबिरासह अनेक सामाजिक कार्यक्रमही तेथे आयोजित करण्यात येतात. रोज सकाळी या मंदिरात महाप्रसादाचे वाटप होते. दर सोमवारी, मंगळवारी, संकष्टी चतुर्थी महाशिवरात्रीला या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. दररोज सकाळी ते रात्री १० पर्यंत भाविकांना आनंदी गणेशाचे दर्शन घेता येते

उपयुक्त माहिती

  • अकलूज बस स्थानकापासून किमी अंतरावर
  • माळशिरसपासून १४ किमीतर सोलापूरपासून १२१ किमी अंतरावर
  • सोलापूरमधील अनेक शहरांतून अकलूजसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहनी मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८३०८० ७०३३७
Back To Home