पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात गुंजवणी व शिवगंगा नद्यांच्या संगमावर मोहरी गाव वसले आहे. शिवकाळापासून विशेष महत्त्व असलेल्या या गावात हेमाडपंती शैलीतील अमृतेश्वर मंदिर स्थित आहे. गुंजवणी नदीच्या प्रवाहामुळे या संपूर्ण परिसरास गुंजन मावळ असे संबोधले जाते. यादवकालीन शैलीचे हे प्राचीन मंदिर शिळीमकर-देशमुख घराण्याचे कुलदैवत मानले जाते. स्वराज्याच्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज व दादोजी कोंडदेव यांच्या उपस्थितीत येथे ऐतिहासिक न्यायनिवाडे पार पडल्याच्या नोंदी आढळतात. या मंदिरातील गंडभेरुंड शिल्प, सहा हातांच्या शंकराची मूर्ती व नृत्यावस्थेतील नग्न भैरवाची मूर्ती हा दुर्मिळ ठेवा मानला जातो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुंजन मावळावर शिळीमकर, जेधे व बांधल या देशमुखांचे वर्चस्व होते. शिळीमकर-देशमुख घराण्याच्या कार्यकाळात मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. पुढे पेशवे काळात १७६३ मध्ये मंदिराच्या शिखराचे काम पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक नोंदी सापडतात. एका आख्यायिकेनुसार गणेश व कार्तिकस्वामी यांच्या पृथ्वी प्रदक्षिणेची कथा या ठिकाणी घडली होती.
येथील गर्भगृहापुढे असलेल्या दगडाभोवती तीन वेळा गायत्री मंत्रासह प्रदक्षिणा केली असता पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याचे पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराबाबतची दुसरी आख्यायिका अशी की येथील एका शेतकऱ्याच्या दोन गाई नेहमी ओढ्याकाठी येऊन पान्हा सोडत असत. ग्रामस्थांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी ती जागा खोदली असता तेथे दोन शिवपिंडी सापडल्या. त्यातील एक पिंडी वरच्या भागात नेऊन शिव मंदिर उभारावे, असा त्या शेतकऱ्याचा मानस होता. परंतु काही केल्या ती पिंडी तेथून त्याला हलवता आली नाही. त्याच वेळी त्याला शंकराने ‘ज्या गाई मला दुग्धाभिषेक करीत होत्या, त्यांची दोन खोंडे लावून मला बाहेर काढण्याचा प्रयत्न कर तुला यश मिळेल’ असा स्वप्नदृष्टांत दिला. स्वप्नदृष्टांतानुसार तसे करताच त्याला यश मिळाले व सध्या असलेल्या मंदिराच्या जागी ती पिंडी आणण्यात आली. शिवकाळात अमृतेश्वर मंदिर हे न्यायनिवाड्याचे व दिव्य प्रयोगांचे महत्त्वाचे केंद्र मानले जाई. ३० मे १६३१ रोजी कोढीत येथील मुकादमीबाबत बाबाजी नेलेकर व जनाजी खैरे यांच्यात वाद निर्माण झाला होता. दादोजी कोंडदेव यांच्या उपस्थितीत जनाजी खैरे यांनी येथे दिव्य करून स्वतःचे सत्य सिद्ध केले.
१६४८ मध्ये मोहरीतील पानसे व खंडेराव यांच्यातील जमिनीचा वाद मिटवण्यासाठी उकळत्या तेलातून सोन्याचा तुकडा काढण्याचा ‘हारवा’ हा दिव्य प्रयोग याच मंदिरात झाला होता. या प्रसंगी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज उपस्थित राहिल्याचे ऐतिहासिक उल्लेख सापडतात. १६९० मध्ये दोन घराण्यांतील वाद मिटवण्यासाठी याच मंदिरात पुन्हा दिव्य प्रयोग करण्यात आले होते. वाद सोडवण्यासाठी आरोपीचे हात बांधून उकळत्या तेलात सोन्याचा तुकडा टाकला जात असे. ज्याच्या हाताला इजा होत नसे, तो निर्दोष मानला जाई. सुभेदार सर्जेराव मांग यांना रायगडावर महाप्रचंड तोफ घेऊन जाण्याची जबाबदारी येथेच सोपवण्यात आली होती. मंदिराच्या चारही बाजूंनी आवारभिंत बांधलेली आहे. त्यातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ गरुडाप्रमाणे दोन मुखे असलेल्या गंडभेरुंड पक्षाचे शिल्प आहे. विजयनगर साम्राज्याचे बोधचिन्ह असलेला हा काल्पनिक पक्षी शक्ती व सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो. मंदिराच्या प्रशस्त आवारात दगडी बांधकामातील तीन स्वतंत्र कुंडे व एक दीपमाळ उपलब्ध आहे. प्रांगणात मूळ मंदिरासमोर सिमेंट काँक्रीटचा मंडप आहे. या नवीन बांधकामामुळे मूळ मंदिरासमोरील स्वतंत्र नंदीमंडप आता या मंडपाचाच एक भाग बनला आहे. या नंदीमंडपात चार दगडी स्तंभांच्या मध्यभागी चौथऱ्यावर नंदीची मूर्ती स्थित आहे. मुख्य मंदिराचे बांधकाम पूर्णतः पाषाणातील आहे.
सभामंडपात एकूण सोळा दगडी स्तंभ आहेत. यातील मध्यभागी असलेले चार स्तंभ पूर्णकृती स्वरूपाचे व नक्षीकाम केलेले आहेत. उर्वरित स्तंभ भिंतींमध्ये आहेत. सभामंडपाच्या उजव्या बाजूला सहा हात असलेली नृत्यावस्थेतील दुर्मिळ नग्न भैरवाची मूर्ती आहे. या मूर्तीच्या उजव्या हातांमध्ये जंबिया, पोथी व डमरू ही आयुधे आहेत. डाव्या हातांमध्ये त्रिशूळ व नरमुंड यांसह त्यातून गळणारे रक्त एक कुत्रा चाटत असल्याचे बारकाव्यांसह कोरलेले आहे. मूर्तीच्या अंगावर नरमुंडमाला व कंबरपट्टा असून कपाळावर भस्म लावलेले आहे. या शेजारीच अष्टभुजा भैरवीची मूर्ती स्थापित आहे. सभामंडपात डाव्या बाजूला शेंदूर चर्चित गणेशमूर्ती आहे. सभामंडपातून अंतराळात प्रवेश करताना उजव्या बाजूला एकाच धडाला पाच मस्तके असलेल्या गाईचे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प दिसते. सभामंडपात डाव्या बाजूला एक शरभ शिल्प कोरलेले आहे. या शरभाने आपल्या चार पायांत, शेपटीत व तोंडात प्रत्येकी एक हत्ती पकडलेला आहे.
गर्भगृहाच्या द्वारशाखेवर व्याल, मारुती, शरभ व सुरुची पाने अशी विविध शिल्पे कोरलेली आहेत. येथेच जमिनीवर दगडी कासवाचे शिल्प आहे. अंतराळातील दक्षिणेकडील भिंतीमध्ये महिषासूरमर्दिनी देवीची मूर्ती आहे. चार पायऱ्या उतरून खोलगट भागात असलेल्या गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी अमृतेश्वर महादेवाची पिंडी आहे. उत्सवाच्या वेळी या पिंडीवर पितळी मुखवटा चढवला जातो. पिंडीच्या खालून वर्षभर पाण्याचा नैसर्गिक प्रवाह वाहतो व ते पाणी उत्तरेकडील दगडी कुंडात साठवले जाते. गर्भगृहातील पिंडीच्या मागील देवकोष्टकात भगवान विष्णू व लक्ष्मी यांची गरुडावर विराजित अशी मूर्ती आहे. यामध्ये विष्णूंच्या डाव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. या मूर्तीमध्ये गरुडाच्या कानात कुंडले व पोटावर नागबंध कोरलेले आहेत. विष्णूच्या हातांत गदा, शंख व पद्म आहेत. लक्ष्मीने डाव्या हातात पद्म धारण केलेले आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतींवरील तळपट्टीवर गाय, वाघ, व्याल व कमळांची विविध शिल्पे कोरलेली दिसतात. जीर्णोद्धाराच्या वेळी जमिनीखाली सापडलेल्या मूर्तीपैकी सहा हात असलेल्या शंकराची मूर्ती मंदिर परिसरात जतन केलेली आहे.
या शिल्पात शंकराच्या डाव्या हातांमध्ये त्रिशूळ, कवटी व भिक्षापात्र आहे आणि उजव्या हातांमध्ये डमरू, माळ व परशू ही आयुधे दिसतात. मूर्तीच्या कमरेला कंबरपट्टा व अंगावर नरमुंडमाला यांसह उजव्या पायाखाली खडावांचे अंकन केलेले आहे.
मंदिरामध्ये वर्षभर विविध धार्मिक उत्सव परंपरेनुसार साजरे केले जातात. महाशिवरात्री व त्रिपुरारी पौर्णिमेला येथे मोठे उत्सव असतात. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दगडी दीपमाळेवर त्रिपुर प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा होतो. चैत्र पाडव्याच्या मुहूर्तावर या मंदिरातून शिखर शिंगणापूरसाठी कावड नेण्याची जुनी परंपरा आजही कायम आहे. प्रत्येक सोमवती अमावस्येला देवाची पालखी वाजतगाजत संगमावर स्नानासाठी नेली जाते. उन्हाळ्यात ओढ्यातील पाणी आटल्यानंतर तेथील पात्रात असलेले दुसरे शिवलिंग पाहायला मिळते. भाविकांना पहाटेपासून रात्रीपर्यंत या मंदिरात अमृतेश्वराचे दर्शन घेता येते.