अंबिका मंदिर

सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर

प्राचीन काळातसंगोलीया’, ‘सांगोली’, ‘सांघोलेअसा उल्लेख असलेल्या सांगोला या इतिहासप्रसिद्ध शहराची अंबिकामाता ही ग्रामदेवता आहे. येथील अंबिकादेवीचे मंदिर यादवकालीन असल्याचे सांगण्यात येते. या मंदिराचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे अंबिकामाता, तुकाई म्हणजेच तुळजाभवानी आणि औंधची यमाई या तिन्ही देवता एकाच सिंहासनावर विराजमान आहेत. त्यामुळे यास मोठे धार्मिक महत्त्व आहे. मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाचासांगोल्याचा तहझाला ते ठिकाण म्हणूनही हे अंबिका मंदिर ओळखले जाते.

पौराणिक ग्रंथांनुसार अंबिका देवी हे पार्वतीचे रूप आहे. ‘मार्कंडेय पुराणातीलदेवी माहात्म्याच्या ७व्या अध्यायानुसार, शुंभनिशुंभ या दैत्यांनी इंद्रदेवाकडून त्रैलोक्याचे राज्य जिंकले. तेव्हा देवांनी आदिशक्ती भगवतीस साकडे घातले. ते भगवतीची प्रार्थना करीत असताना पार्वती देवी तेथे आली. तिच्या शरीरकोषातून अंबिका देवी निर्माण झाली. चंड आणि मुंड हे शुंभनिशुंभाचे सेवक होते. अंबिकेस पकडून आणण्यासाठी शुंभनिशुंभाने चंड आणि मुंड यांना पाठवले. तेव्हा अंबिकेच्या शरीरातून प्रकटलेल्या कालीने चंडमुंडांचा वध केला. काली देवीने चंडमुंड यांचा वध केल्यामुळे देवी भगवतीने तिला चामुंडा असे नाव दिले. महाराष्ट्रात, विशेषकरून पश्चिम महाराष्ट्रात काळम्मा, कालिका, यमाई, अंबाबाई, अंबिका, चामुंडा अशा विविध रूपांत या देवीची पूजा केली जाते.

सांगोला येथील देवीचे स्थान चौदाव्या शतकातील असल्याचे सांगण्यात येते. कल्याणचे चालुक्य आणि कलचुरी यांच्यानंतर या भागात देवगिरीच्या यादव घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली. अफझलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार नेतोजी पालकर यांच्या फौजेने सांगोला परिसराची लूट केल्याची नोंद आहे. मराठ्यांच्या इतिहासातही या गावास महत्त्वाचे स्थान आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांचे १५ डिसेंबर १७४९ रोजी सातारा येथे निधन झाले. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ताराबाईसाहेबांचा नातू दुसरे शिवाजीराजे यांचा पुत्र रामराजे यांना सातारच्या गादीवर बसवण्यात आले. शाहू महाराजांनी मृत्युपूर्वी राज्याच्या कारभाराची जबाबदारी पेशव्यांवर सोपवली होती. त्यामुळे रामराजांऐवजी पेशवे हेच आता राज्यात सत्ता गाजवू लागले. त्यामुळे ताराबाईसाहेब नानासाहेब पेशवे यांच्यात सत्तासंघर्ष निर्माण झाला. याच काळात ताराबाईंच्या पक्षात असलेल्या जगजीवनराव प्रतिनिधी यांच्या ताब्यातील मुलूखापैकी बराचसा मुलूख पेशव्यांनी आपल्याकडे लिहून घेतला. त्यात सांगोल्याचा समावेश होता. हा प्रदेश ताब्यात देण्यासाठी प्रतिनिधींनी आपला मुतालिक यमाजी शिवदेव यास सांगोल्यास पाठवले. परंतु तेथे जाताच त्यांनी पेशव्यांविरुद्ध बंड पुकारले. त्यावेळी नानासाहेब पेशव्यांनी छत्रपती रामराजांना आपल्याकडे वळवून, त्यांच्या नेतृत्त्वाखाली सांगोल्यावर फौज धाडली. १५ दिवसांत पेशव्यांनी सांगोल्याची गढी जिंकली. त्यानंतर पेशव्यांनी राज्याच्या राज्यकारभाराच्या व्यवस्थेचे नवीन ठराव छत्रपती रामराजे यांच्याकडून लेखी करून घेतले. त्याससांगोल्याची व्यवस्थावासांगोल्याचा बंदोबस्तअसेही म्हटले जाते. या तहामुळे छत्रपतीपद नामधारी बनून पेशव्यांकडे राज्याची सत्ता गेली. हा तह अंबिकादेवीच्या मंदिरात झाला असे सांगण्यात येते.

सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अंबिका मंदिराला दगडी बांधकाम असलेले दुमजली प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारात आतील बाजूस पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वारातून पुढे आल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात मुख्य मंदिरासमोर दोन मोठ्या दगडी दीपमाळा आहेत. मंदिराच्या समोरील बाजूस एक धुनीमंडप आहे. शारदीय नवरात्रोत्सवात अष्टमीला रात्री १२ वाजता येथे होम केला जातो. ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. खुला मंडप, दर्शनमंडप, सभामंडप गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. खुल्या स्वरूपाचा येथील मंडप हा मागील काही वर्षांत मंदिरासमोर बांधलेला आहे. या मंडपामध्ये देवीचे वाहन असलेल्या सिंहाची मूर्ती आहे. या मंडपातून मंदिराच्या दर्शनमंडपात प्रवेश होतो. चार दगडी स्तंभ असलेल्या या दर्शनमंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत.

सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखांवर पानाफुलांचे वेलींचे नक्षीकाम आहे. सभामंडपात भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी दर्शनमार्गाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात वर्जपिठावर मध्यभागी तुळजाभवानी उजवीकडे औंधची यमाई तर डाव्या बाजुला सांगोल्याची ग्रामदैवत असलेली अंबिकादेवी विराजमान आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर पुराणकाळातील उठावशिल्पे कोरण्यात आलेली आहेत. मंदिराच्या आवारात मागील बाजूस एका चौथऱ्यावर रथाच्या दगडी चाकाप्रमाणे दिसणाऱ्या खरजाई खोकलाई या देवींच्या दोन मूर्ती आहेत. असे सांगितले जाते की या देवींच्या पुजनाने जुनाट खोकला, खरूज, नायटा यांसारखे आजार बरे होतात.

अंबिका देवी मंदिरात दर मंगळवार आणि शुक्रवारी पूजाआरती होते. येथे दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव दिमाखात साजरा केला जातो. या वेळी मंदिर परिसर दिव्यांनी उजळून निघतो. मंदिरात रामनवमी तसेच दुर्गाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी होते. शारदीय नवरात्र आणि पौष महिन्यातील शाकंबरी नवरात्रीमध्ये भरगच्च धार्मिक कार्यक्रम साजरे होतात. येथे दर वर्षी रथसप्तमीस पार पडणारी अंबिकादेवीची यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. यात्रेच्या कालावधीत देवीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. महापूजा, महानैवेद्य भजन आदी कार्यक्रम जल्लोषात साजरे होतात. दर वर्षी रंगणाऱ्या जंगी कुस्त्या हा यात्रेचा आकर्षणाचा भाग असतो. या काळात येथे शेळ्यामेंढ्यांचा बाजार भरतो. यात्रेचा समारोप शोभेच्या दारूकामाने केला जातो

उपयुक्त माहिती

  • सांगोला बस स्थानकापासून किमी अंतरावर
  • सोलापूरमधील अनेक शहरांतून सांगोल्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा
  • संपर्क : मयुरेश गुरव, मुख्यपुजारी, मो. ९९७०९११४०७
  • मंदिर वेबसाईट :
  • https://gramdaivatshriambikadevimandir.org.in/
Back To Home