अंबाबाई मंदिर

जत, ता. जत, जि. सांगली

साडेतीन शक्तिपिठांची संकल्पना ही ओंकाराच्या साडेतीन मात्रांशी निगडित आहे. या पिठांना औट पिठे असेही म्हटले जाते. याच औटपिठांतील एक पूर्ण पीठ म्हणजे कोल्हापुरातील महालक्ष्मीचे मंदिर. ही देवी अंबाबाई या नावानेही ओळखली जाते. देशातील सर्वच शाक्त उपासकांना कोल्हापूर येथे जाऊन अंबाबाईचे दर्शन घेण्याची इच्छा असते. परंतू ते सर्वांनाच शक्य होत नाही. त्यामूळे देशात त्या त्या ठिकाणी असलेल्या अंबाबाईच्या मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी जातात. यापैकी एक प्राचीन प्रसिद्ध मंदिर जत शहराच्या वेशीवरील डोंगर माथ्यावर आहे. येथील जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

हे मंदिर सुमारे बाराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. परंतू अलिकडील काळात मंदिरांचा जीर्णोद्धार होऊन त्यास आधुनिक स्वरूप प्राप्त झालेले आहे. या मंदिराबाबत अख्यायिका अशी की अंबाबाईच्या चौसष्ट योगिनींपैकी जयंती नामक योगिनी या निसर्गरम्य डोंगर माथ्यावर वसली. देवीच्या छत्रछायेखाली हे गाव सुखशांती अनुभवत असल्यामुळे देवीच्या नावावरून गावास आधी जयंती नंतर अपभ्रंश होऊन जत नाव पडले, असे सांगितले जाते. ही देवी येथील बिळूर रावळगुंडवाडी या गावातील अनेक कुटुंबियांची कुलदेवता आहे. ही देवी बिळूर येथील भैरवनाथाची बहीण असल्याची मान्यता आहे

जत शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगर माथ्यावरील या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पहिली स्वागत कमान आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन चौकोनी नक्षीदार स्तंभ त्यावरील सज्जावर प्रत्येकी चार चौकोनी स्तंभांवर तीन शिखर असे स्वागतकमानीचे स्वरूप आहे. येथून ५०० मीटर अंतरावरील डोंगर पायथ्यापर्यंत पक्की डांबरी सडक आहे. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडे आहेत. हे मंदिर परीसर वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने वनविभागाकडूनही येथे स्वागतकमान उभारण्यात आलेली आहे

पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे साठ पायऱ्या आहेत. कोरीव पाषाणात बांधलेल्या सुमारे सात फूट रुंद पायारीमार्गाच्या दोन्ही बाजूस लोखंडी सुरक्षा कठडे आहेत. कठड्यांवर वनविभागाच्या वतीने विविध सूचना सामाजिक संदेश लिहिलेले फलक लावण्यात आलेले आहेत. पायरीमार्ग संपताच मंदिरांच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात एका कोपऱ्यात निरीक्षण माची आहे. येथून जत शहराचे विहंगम दृश्य दिसते. पुढे पूर्णखुल्या स्वरूपाचा सभामंडप आहे. सभामंडपात भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी दर्शनरांगेची व्यवस्था आहे. गर्भगृहात वज्रपिठावर अंबाबाई देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीच्या वरील दोन हातात तलवार त्रिशूल आणि खालील एक हात आशीर्वाद मुद्रेत आणि दुसऱ्या हातात अमृतपात्र आहे. मूर्तीच्या डोक्यावर मुकुट, अंगावर वस्त्रे अलंकार कोरलेले आहेत. मूर्तीच्या पाठशिळेवर मध्यभागी कीर्तीमुख दोन्ही बाजूला पानाफुलांच्या नक्षी आहेत. वज्रपिठावर मूर्तीसमोर चांदीची पावले ठेवलेली आहेत

गर्भगृहाच्या डाव्या बाजूच्या कक्षात काचेच्या मखरात देवीची अष्टभुजा उत्सव मूर्ती आहे. या मूर्तीच्या हातांत त्रिशूल, खड्ग, धनुष्य, बाण, अग्नीकुंड आदी शस्त्र नरमुंड आहे. देवीने उजव्या पायाखाली महिषासुर राक्षसाला दाबून धरलेला आहे. देवी उंची वस्त्रे अलंकार ल्यालेली आहे. डोक्यावर सुवर्ण मुकुट डोळे चांदीचे आहेत. अंबाबाई गर्भगृहाच्या उजव्या बाजूला तीन देवकक्ष आहेत. त्यात गणपती, श्रीदत्त शिवपिंडी आहे. गर्भगृहाच्या छतावर उंच चौकोनी शिखर आणि त्यावर उभ्या धारेची नक्षी आहे. शिखरात शीर्षभागी आमलक त्यावर कळस आहे.

शारदीय नवरात्रौत्सव हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन पौर्णिमा असा सलग पंधरा दिवसांचा हा उत्सव असतो. दसरा कोजागिरी पौर्णिमेस भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या पंधरवड्यात देवीच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी हजारो भविक येतात. दर मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. अंबाबाई हिल्स पर्यटन स्थळ म्हणूनही या स्थानाची ओळख असल्याने निसर्गप्रेमी, पक्षी निरीक्षक पर्यटक येथे येतात. या डोंगरात विविध प्रजातीची फुलपाखरे, पक्षी, प्राणी वनस्पती आढळतात.

उपयुक्त माहिती

  • जत शहरापासून किमी, तर सांगलीपासून ८९ किमी अंतरावर
  • जत शहरापासून एसटी खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा
Back To Home