अकलूज शहराची ग्रामदेवता असलेल्या अकलाई देवीचे मंदिर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की या देवीच्या स्थानावरून शहराला अकलूज हे नाव पडले. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या या शहरातील नीरा नदीच्या काठावर हे मंदिर स्थित आहे. ही जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे संतानप्राप्तीसाठी या देवीचा नवस करण्याची आणि नवजात बालकाला देवीच्या चरणावर ठेऊन तिचा आशीर्वाद घेण्याची येथे प्रथा आहे.
ऐतिहासिक दस्तऐवजांत इ.स. १२११ साली यादव वंशीय सिंघण राजाने अकलूज हे शहर आणि येथील किल्ला वसवल्याचे उल्लेख आढळतात. त्यानंतर या भागावर बहामनी, आदिलशाह, मुघल बादशाह आणि मग मराठ्यांनी सत्ता गाजवली. असे सांगितले जाते की इ.स. १६७९ मध्ये दिलेरखान आणि संभाजी महाराज अकलूजमध्ये चार महिन्यांसाठी वास्तव्यास होते. १४ डिसेंबर १६८८ ते १५ फेब्रुवारी १६८९ या काळात औरंगजेबही या परिसरात मुक्कामाला होता. त्याकाळात संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडल्याची बातमी समजताच औरंगजेबाने आनंद साजरा करण्यासाठी तत्काळ अकलूजचे नाव अदसपूर केले होते. इंग्रजांनी पेशवाई बुडविल्यावर दुसरे बाजीराव पेशवे आणि कालांतराने ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड डलहौसी यांनी या ठिकाणी काही काळ मुक्काम केल्याचाही संदर्भ मिळतो.
अकलाई हे पार्वती देवीचे उग्र रूप असल्याची मान्यता आहे. या मंदिराची अख्यायिका अशी की अंकलेश्वर नावाचा राक्षस या परिसरातील ऋषीमुनींना त्रास देत होता. तेव्हा त्यांनी पार्वतीची आराधना करून तिच्याकडे आपले गाऱ्हाणे माडले. त्यावेळी पार्वतीने या असुराचा वध केला व येथे स्थित झाली. एका लोककथेनुसार पार्वतीने एकदा शंकराबरोबर स्मशानात जाण्याचा हट्ट धरला. सर्व देवांनी तिला त्यापासून प्रवृत्त करण्याचे प्रयत्न केले. पण पार्वतीने त्यांचे ऐकले नाही. अखेर ती शंकरामागून या परिसरात आली. यावेळी शंकराने तिच्या रक्षणासाठी आपले वाहन नंदी तिच्यासोबत दिला.
त्यामुळे या मंदिराबाहेर नंदीची मूर्ती आहे. देवी मंदिरात नंदी असमे हे दुर्मिळ समजले जाते.
अकलूज शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे अकलाई देवीचे मंदिर हजार ते बाराशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. पेशवेकाळात व त्यानंतरही झालेल्या जिर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. वाहनतळापासून मंदिरापर्यंत असलेल्या मोठ्या जागेत अनेक उपहारगृहे व पुजासाहित्याची दुकाने आहेत. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीत मंदिराची स्वागतकमान आहे. या कमानीत एक मुख्य व दोन उप असे तीन दरवाजे आहे. चार पायऱ्या चढून या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराचे प्रांगण प्रशस्त आहे व येथे सुंदर उद्यान विकसित करण्यात आलेले आहे. या उद्यानातून मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी शेड टाकलेली आहे. मंदिराच्या डावीकडे एक मोठी दीपमाळ आहे.
मंदिरासमोर एका उंच चौथऱ्यावर अखंड पाषाणातील नंदीमूर्ती आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रांगणातून सात पायऱ्या चढून मुखमंडपात प्रवेश होतो. मुखमंडपातील चार स्तंभावर छत आहे. त्यातील दोन स्तंभ हे समोर तर उर्वरित स्तंभ हे सभामंडपाच्या भिंतीत आहेत. मुखमंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासनांची रचना आहे. बंदिस्त सभामंडपात हवा व प्रकाश येण्यासाठी जाळीदार भिंतींची रचना आहे. भाविकांच्या गर्दीचे नियोजन व्हावे यासाठी सभामंडपातून दर्शनरांगेची व्यवस्था आहे. सभामंडपाच्या सर्व भिंतींमध्ये कक्षासने आहेत. सभामंडपाच्या पुढे अंतराळ व गर्भगृह आहे. गर्भगृहाचा आकार अष्टकोनी आहे. त्यात प्रकाश व हवा येण्यासाठी वातायने आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर असलेल्या लाकडी मखरात अकलाई देवीची मूर्ती आहे. देवीच्या मस्तकी मुकुट, नाकात मोत्यांची नथ, अंगावर विविध दागिने व वस्त्रे आहेत.
या मंदिराच्या सभामंडप, अंतराळ व गर्भगृहावर प्रत्येकी एक अशी तीन शिखरे आहेत. गर्भगृहाच्या मुख्य शिखरावर अनेक लहान लहान शिखरांच्या प्रतिकृती आहेत. या मंदिरावर एकूण सत्तावीस लहान मोठ्या शिखरांच्या प्रतिकृती आहेत. सत्तावीस कळस हे सत्तावीस नक्षत्रांचे प्रतीक समजले जातात.
या मंदिरात नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शाकंभरी पौर्णिमेलाही ६५ भाज्याचा नेवैद्य दाखवून या वनदेवीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी अर्पण केलेल्या फळभाज्यांनी येथील गर्भगृह आणि सभामंडप अनोख्या रितीने सजवला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिर परिसर दिव्यांनी उजळून निघतो. कोजागिरी पोर्णिमेच्या आधी तीन दिवस देवी निद्रेला जाण्याची आणि पौर्णिमेला दुधाचा नेवैद्य दाखवून देवीला जागे करण्याची प्रथाही येथे पाळण्यात येते. आषाढी पौर्णिमेनंतर येणाऱ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी अकलाई देवीची यात्रा असते. यात्रेच्या दिवशी सायंकाळी होणाऱ्या दीपप्रज्वलन उत्सवाला शेकडो भाविक हजेरी लावतात. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावामध्ये देवीचा छबिना काढण्यात येतो. येथे भाविकांसाठी धर्मशाळाही उभारण्यात आली आहे.