सोलापूरमधील मानाचा समजला जाणारा आजोबा गणपती हा शहरातील आध्यात्मिक क्षेत्राचा मानबिंदू मानला जातो. लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आठ वर्षे आधी आजोबा गणपतीच्या उत्सवास सोलापूरमध्ये प्रारंभ झाला होता. आजही या गणेशाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात आज चर्चेत असलेल्या पर्यावरणस्नेही गणेशोत्सव या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवण्याचा मान या गणेशोत्सवास आहे. शहरात या गणेशाचे कायमस्वरूपी स्थान आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की मनोभावे पूजा केल्यास हा गणपती नवसाला पावतो.
महाराष्ट्रात बुद्धिदात्या श्रीगणेशाच्या उत्सवास मोठी परंपरा आहे. गणपती हे पेशव्यांचे आराध्यदैवत होते. त्यामुळे पेशवाईत पुण्यामध्ये मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जाई. सवाई माधवराव पेशवे (१७७४ ते १७९५) पुण्यात राहावयास आल्यानंतर पेशवे सरकारच्या योग्यतेस साजेशा थाटाने हा उत्सव तेथे साजरा करण्यात येऊ लागला. पेशवे दप्तर ३२मधील ५ सप्टेंबर १७७४च्या एका पत्रावरून पुण्यातील तत्कालिन गणेशोत्सवाची कल्पना येते. पुरंदर येथून पेशव्यांचे सरदार सखारामबापू यांनी नारा आप्पाजी खासगीवाले यांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की ‘गणपती उत्सवाची याद
पावली. अनुष्ठानाचे एकवीस ब्राह्मण चार दिवस लावणे. कलावंताचे ताफे चांगली पांच-सात व हरदास जुने बहुता दिवसांचे सात, आठ, दहापर्यंत असतील तितके या करवी उछाह करणे. सालाबादप्रमाणे इतक्यास बिदागी करणे.’
महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशाच प्रकारे गणेशोत्सव साजरा करण्यात येत असे. लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’मध्ये १८९४च्या गणपतीविसर्जनाचे जे वर्णन प्रसिद्ध झाले, त्यात ‘पूर्वी पेशव्यांचे वेळेस जे गणपती निघत होते व हल्ली बडोदे, सांगली वगैरे ठिकाणी जे समारंभ निघतात त्यांच्या बरोबरीचा हा समारंभ झाला असे म्हणण्यास हरकत नाही’, असे म्हटले आहे. यावरून त्या काळात अन्य शहरांतही मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जात असल्याचे स्पष्ट होते. लोकमान्य टिळकांनी १९८३मध्ये या सार्वजनिक गणेशोत्सवास राष्ट्रजागृतीच्या माध्यमाचे स्वरूप दिले हे त्याचे वेगळेपण मानले जाते. या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आठ वर्षे आधी, १८८५ मध्ये सोलापूरमधील काही राष्ट्रप्रेमी कार्यकर्त्यांनी एकत्र येत आजोबा गणपतीचा उत्सव सुरू केला. लोकमान्य टिळकांनी याच गणेशोत्सवापासून प्रेरणा घेतली, असे येथील जुन्या मंडळींचे म्हणणे आहे.
या गणेशोत्सवाचा इतिहास असा सांगण्यात येतो की सोलापूरमधील शुक्रवार पेठेतील कार्यकर्त्यांनी गणरायाच्या या उत्सवास प्रारंभ केला. यामध्ये मल्लिकार्जुन कवळे, महालिंगप्पा वजीरकर, मल्लिकार्जुनप्पा शेटे, संगनबसय्या नंदीमठ, देवबा मंठाळकर आदींचा सहभाग होता. पहिल्या वर्षी म्हणजे १८८५मध्ये या गणेशाची मूर्ती पर्यावरणस्नेही सामग्री वापरून तयार करण्यात आली. त्याकरीता कागद, कापड, कामट्या, खळ, डिंक यांचा वापर करण्यात आला. ही मूर्ती जुनी झाल्यामुळे १९८३मध्ये केरळमधील मूर्तिकारांकडून नवी मूर्ती घडवण्यात आली. शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेल्या या मूर्तीकरीता तणस, गूळ, कापड, गवत, शाडू, डिंक आदी वस्तूंचा वापर करण्यात आलेला आहे. या गणेशास आजोबा गणपती असे नाव का पडले याबाबत कथा अशी की येथे पहिल्यांदा जी मूर्ती घडवण्यात आली, ती एखाद्या आजोबासारखी पायाची घडी घालून बसलेल्या अवस्थेत होती. तिच्या त्या रूपावरून तिला आजोबा असे संबोधण्यात येऊ लागले.
सुरूवातीला शुक्रवार पेठेतील एक घरासमोर व त्यानंतर त्रिपुरांतकेश्वर मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा करण्यात येत असे. त्यानंतर बरीच वर्षे सोलापूरचे महापौरपद भूषविलेले विश्वनाथ बनशेट्टी यांच्या ट्रंक कारखान्यात आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येत असे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या आर्य समाजाचे नेते स्वामी श्रद्धानंद यांची २३ डिसेंबर १९२६ रोजी हत्या झाली. त्यानंतर त्यांच्या स्मृत्यर्थ येथे श्रद्धानंद समाजाची स्थापना करण्यात आली. या समाजाच्या सदस्यांतर्फे त्या काळात विविध राष्ट्रीय कार्यांबरोबरच आजोबा गणपतीचा उत्सवही मोठ्या धामधुमीत साजरा करण्यात येत असे. १९९४मध्ये शहरातील माणिक चौक येथे आजोबा गणपतीचे मंदिर उभारण्यात आले.
बाजारपेठेतील दाटीवाटीच्या परिसरात रस्त्यालगत आजोबा गणपती मंदिराची दुमजली इमारत आहे. कमानीदार प्रवेशद्वारातून या इमारतीत प्रवेश होतो. प्रवेशद्वारासमोर एका मोठ्या गर्भगृहात वज्रपिठावर आजोबा गणपतीची भव्य मूर्ती स्थापित आहे. चांदीच्या सिंहासनावर बसलेल्या या मूर्तीवरील मुकूट, दोन्ही कान, समोरील दोन्ही हात व पाय हे सोन्याचे आहेत. या चतुर्भूज मूर्तीच्या वरच्या उजव्या हातात सुवर्णाचा परशु, तर डाव्या हातात सुवर्णाचा पाश आहे. खालच्या डाव्या हातात शिवपिंडी व उजवा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. मूर्तीच्या वरच्या बाजूस चांदीचे मोठे छत्र आहे. वज्रपिठाच्या खालील बाजूस काळ्या पाषाणातील गणेशमूर्ती व तिच्या दोन्ही बासूस रिद्धी व सिद्धी आहेत.
आजोबा गणपती ट्रस्टतर्फे या मंदिराचा कारभार चालवला जातो. मंदिरात रोज सकाळी व सायंकाळी शास्त्रोक्त पद्धतीने गणेशाची पूजा व आरती केली जाते. गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, गणेश जयंती या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिरात दसरा, दिवाळी, पाडवा व महाशिवरात्र हे उत्सवही अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात. येथे दर चतुर्थीला महिलांतर्फे अथर्वशीर्ष पठण केले जाते. सोलापूरमधील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत आजोबा गणपतीस मानाचे स्थान असते. ही मिरवणूक किमान १५ ते २० तासांपर्यंत चालते. दररोज सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात आजोबा गणपतीचे दर्शन घेता येते.