ऐश्वर्य मंदिर,

सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक

यादव काळात नाशिकमधील सिन्नर हे राजधानीचे शहर होते. याच काळात सिन्नर शहरात १२ ज्योतिर्लिंगे उभारली गेली. या कलाकृतींमध्ये मानाचे स्थान असणारे ऐश्वर्य मंदिर येथील सरस्वती नदीच्या काठावर निसर्गरम्य परिसरात स्थित आहे. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात दक्षिणी शैलीमध्ये उभारले गेलेले एकमेव मंदिर म्हणून या मंदिराची ख्याती आहे. आयेश्वर, ऐश्वर्येश्वर अशीही या मंदिराची ओळख आहे.

नाशिक-पुणे मार्गापासून जवळच सिन्नर शहरात हे ऐश्वर्य मंदिर आहे. हे अतिप्राचीन मंदिर शिल्पकलेच्या अभ्यासकांसाठी पर्वणी समजले जाते. मंदिर पूर्वाभिमुख असून सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी तेथील रचना आहे. सभामंडप हा मुख्य मंदिरापासून काहीसा वेगळा झालेला दिसतो. सभामंडपातील नक्षीदार खांब हे उत्कृष्ट शिल्पकलेचे नमुने आहेत. या खांबांवर खालच्या बाजूला सूरसुंदरी, तर वरच्या टोकाला भारवाहक यक्ष कोरलेले दिसतात. ऐश्वर्य मंदिराच्या अंतराळाच्या प्रवेशद्वारावर दिवे लावण्यासाठी देवळ्यांची रचना आहे.

अंतराळाच्या कमानीवर चैत्य गवाक्षाची नक्षी कोरलेली असून नृत्य करणाऱ्या शिवाचे आणि पार्वतीचे शिल्प आहे. या अर्धगोलाकृतीमध्ये दोन बाजूस दोन मकर, मध्यभागी तांडव करणारा शिव, तसेच शिवाचे हे तांडव पार्वती पाहात आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला शिवाचे गण हे ताशा वाजवत आहेत, असे हे दृश्य आहे. तसेच या अर्धगोलाकार नक्षीमध्ये छोटे-छोटे यक्ष बसलेल्या स्वरूपात दाखवले असून येथे दर्शविलेल्या उभ्या माळा आणि हंसाची माळ फारच बारकाईने कोरलेली आहे. या रचनेला ‘मकर तोरण’ असेही म्हणतात. (दोन मगरींच्या तोंडातून निघालेली वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे) मंदिराच्या स्थापत्यामध्ये अंतराळाला विशेष महत्त्व असते, तसेच महत्त्व ऐश्वर्येश्वर मंदिराच्या अंतराळाला दिल्याचे लक्षात येते.

ऐश्वर्य मंदिराच्या अंतराळाच्या वितानावर (छत) अष्टदिक्पाल (आठ दिशांचे पालन करणाऱ्या आठ देवता) आहेत. यामध्ये पूर्वेस इंद्र, आग्नेयेस अग्‍नी, दक्षिणेस यम, नैऋत्येस निऋती, पश्चिमेला वरुण, वायव्येला वायू, उत्तरेला कुबेर आणि इशान्य दिशेला ईशान ही शिल्पे येथे कोरलेली आहेत.

गर्भगृहाच्या ललाटावर सप्तमातृका कोरलेल्या असून डाव्या बाजूला गणाच्या बरोबर शिव आणि उजव्या बाजूस गणपती आणि भैरव आहेत. अशी अकरा शिल्पे ऐश्वर्य मंदिराच्या अंतराळाच्या ललाटावर आहेत. तसेच गर्भगृहाच्या द्वारशाखेवरील ललाटबिंबावर गजलक्ष्मी आहे. त्याखालील बाजूस शेषशायी विष्णू व ब्रह्मा यांची शिल्पे आहेत.

गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल आहेत. मंदिराच्या गर्भगृहामध्ये फारसे नक्षीकाम नाही. आतमध्ये पाषाणातील शिवलिंग आहे. ‘स्थानपोथी एक पुरातत्त्वीय अभ्यास’ या ग्रंथातील उल्लेखानुसार हे मंदिर साधारणतः अकराव्या शतकाच्या शेवटच्या चतुर्थकात सेउणचंद्र यादव याचा मुलगा परमदेव याच्या कारकिर्दीत बांधले असावे. हे मंदिर संरक्षित वास्तू म्हणून घोषित झाल्याने पुरातत्त्व विभागाकडून या मंदिराचे सौंदर्य जपण्याचा प्रयत्न होत आहे. पुरातत्त्व विभागाने मंदिर परिसराला कुंपण घातले असून मंदिरासभोवती अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शहरातील वर्दळीच्या भागात असूनही या मंदिर परिसरात शांतता अनुभवायला मिळते. अनेक भाविकांसोबतच इतिहासप्रेमी, शिल्पकलेचे अभ्यासक व पर्यटक आवर्जून या मंदिराला भेट देतात. सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येते.


उपयुक्त माहिती:

  • नाशिकपासून ३० किमी, तर नाशिक रोड रेल्वेस्थानकापासून २३ किमी अंतरावर
  • नाशिकहून सिन्नरसाठी एसटी व महापालिका परिवहन बसची सुविधा
  • सिन्नर बसस्थानकापासून २ किमी अंतरावर
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home