अगस्ती ऋषी आश्रम,

अनकाई किल्ला, मनमाड, जि. नाशिक

एका घोटात संपूर्ण समुद्राचे पाणी प्राशन करणारे सप्तऋषींमधील एक श्रेष्ठऋषी अगस्ती यांचा मनमाड येथील अनकाई किल्ल्यावर आश्रम आहे. असे सांगितले जाते की, या स्थानावरच अगस्ती ऋषींनी श्रीरामांना रावण वधासाठी विशेष अस्त्रे दिली होती. हा परिसर अगस्ती ऋषींची तपोभूमी म्हणून ओळखला जातो. श्रीराम, महादेव यांच्या वास्तव्याने पावन झालेला हा परिसर भाविक, इतिहास अभ्यासक व पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.

या आश्रमाची आख्यायिका अशी की देवतांच्या विनंतीला मान देऊन अगस्ती ऋषी काशी येथून दक्षिणेकडे म्हणजे आताच्या नाशिक परिसरात आले. पूर्वीच्या काळी दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली. त्रेतायुगात श्रीराम-सीता आणि लक्ष्मण वनवास काळात नाशिकजवळील अगस्तींच्या आश्रमात आले होते (सध्याचे अगस्ती आश्रम). त्यांनी येथे एक दिवस वास्तव्य केले होते. त्यावेळी श्रीरामांना विशेष दीक्षा देऊन ऋषींनी लंकाधीश रावणाचा या भूमीवर सुरू असलेला अत्याचार संपविण्याचे सुचविले. यासाठी अगस्तींनी श्रीरामांना दिव्य शस्त्रास्त्रांसह कधीही समाप्त न होणाऱ्या बाणांचा भाता दिला. सीता अपहरणानंतर अगस्ती ऋषींकडून ‘रामायण’ ऐकण्यासाठी स्वतः महादेवांनीही सतीसह चार महिने येथे वास्तव्य केले होते.

नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ अंकाई गावाच्या उत्तरेकडील डोंगरावर अंकाई व टंकाई असे दोन किल्ले प्रसिद्ध आहेत. या किल्ल्यांच्या पायथ्याशी जैन लेण्या व एका गुंफेत महावीर मूर्ती आहेत. अंकाई किल्ला सुमारे १००० वर्षांपूर्वी देवगिरीच्या यादवांनी बांधला होता. १६३५ मध्ये मुघलांनी त्यावर ताबा मिळवला. १६६५ मध्ये मुघलांकडून निजामाने तो ताब्यात घेतला. १७५२ मध्ये भालकीच्या तहानंतर हा किल्ला मराठा साम्राज्यात आला, अशा नोंदी आहेत. या किल्ल्यावर आता काही बांधकाम दिसत नसले तरी येथील तटबंदी मात्र अजूनही शाबूत आहे.

याच किल्ल्यावर सर्वात वरच्या भागातील एका गुहेत अगस्ती ऋषींचा आश्रम आहे. येथे जाण्यासाठी सुमारे ९०० पायऱ्या आहेत. अनेक ठिकाणी तीव्र चढही आहे. पुरातत्त्व खात्याकडून या पायरी मार्गावर काही अंतरावर भाविक व पर्यटकांना बसण्यासाठी बाकड्यांची सोय केली आहे. किल्यावरून काही अंतर वरच्या बाजूला गेल्यानंतर एका गुहेत अगस्ती आश्रम दिसतो. याच गुहेत अगस्तींनी अनेक वर्षे तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. या आश्रमात अगस्ती ऋषींच्या मूर्तीसह श्रीराम-सीता-लक्ष्मण व श्रीदत्त यांच्या मूर्ती आहेत.

गुहेच्या समोरील बाजूस एक पार असून तेथे श्रीरामांच्या संगमरवरात कोरलेल्या विशेष पादुका आहेत. या पादुकांवर काही आकृत्या कोरलेल्या असून त्याखाली ‘श्रीरामाच्या वनमार्गातील अनेक तीर्थांची पवित्र रज समन्वित श्रीराम चरणारविन्दांचे पूजन, दर्शन, विश्वाच्या समस्ततीर्थांचे पुण्य प्रदाता, शास्त्रांनी मान्य केले आहे’ असा मजकूर कोरलेला दिसतो. या गडाच्या पायथ्यापासून जवळच असलेल्या पाटोदा येथील रामेश्वर मंदिरातही अशाच प्रकारचा मजकूर असलेल्या पादुका आहेत. दिल्ली येथील श्रीराम संस्कृतिक शोध संस्थेने काही वर्षांपूर्वी देशभरात केलेल्या संशोधनात त्यांना वनवास काळातील श्रीरामांच्या विशिष्ट पाऊलखुणा असलेली २९४ तीर्थे आढळून आली. त्यामध्ये अयोध्येपासून लंकेपर्यंतच्या ठिकाणांचा समावेश आहे. त्यात पाटोदा येथील रामेश्वर मंदिर व अगस्ती आश्रम यांचा समावेश आहे.

श्रीरामांच्या पादुकांच्या शेजारीच हनुमंताचे छोटेसे मंदिर आहे. या आश्रमाशेजारी ‘सीता गुंफा’ आहे. आजही या गुंफेत अनेक साधू तपश्चर्येसाठी येतात. या गुंफेबाबत अभ्यासकांमध्ये दुमत असून ही गुंफा सीतेची नसून ती महादेवांसोबत येथे वास्तव्याला असलेल्या सतीची असावी, असे काहींचे म्हणणे आहे. आख्यायिकेनुसार श्रीराम, सीता व लक्ष्मण यांचे वास्तव्य येथे एक दिवसाचे होते, तर महादेव व सती यांचे वास्तव्य चार महिने होते. त्यामुळे ही गुंफा सतीची असावी, या शक्यतेला बळ मिळते.

अगस्ती आश्रमाच्या पुढे पठारावर काशी तलाव आहे. असे सांगितले जाते की, या तलावाच्या मध्यभागी असलेली समाधी ही अगस्ती ऋषींची आहे. पठारावर असूनही या तलावातील पाणी बाराही महिने आटत नाही. श्रीराम, महादेव, अगस्तींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या परिसराला भेट देण्यासाठी दररोज शेकडो भाविक व पर्यटक येत असतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी अगस्ती ऋषींची यात्रा भरते. त्यातही तिसऱ्या श्रावणी सोमवारी येथील आश्रमात प्रत्यक्ष अगस्ती ऋषींचे वास्तव्य असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी या संपूर्ण किल्ल्याला जत्रेचे स्वरूप आलेले असते. महाशिवरात्र, नवरात्रोत्सव, गुरुपौर्णिमा आणि दत्तजयंती उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.

उपयुक्त माहिती:

  • नाशिकपासून ९८ किमी, तर मनमाडपासून ११ किमी अंतरावर
  • मनमाडपासून अंकाईसाठी एसटीची सुविधा
  • जवळचे रेल्वे स्थानक अंकाई
  • खासगी वाहने अंकाईच्या पायथ्यापर्यंत जाऊ शकतात
  • पायथ्यापासून पायी जाण्यासाठी ४५ मिनिटे ते एक तास लागू शकतो
  • आश्रम परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home