पुणे-बंगळूर रस्त्याने मुंबईच्या दिशेने जाताना नसरापूर सोडले की धांगवडी गाव लागते. येथे महामार्गाला लागूनच अडबलसिद्धनाथाचे प्राचीन मंदिर आहे. असे सांगितले जाते की पांडव अज्ञातवासात असताना त्यांचे येथील राजाचे गोधन सोडविण्यासाठी कौरवांबरोबर एक युद्ध झाले होते. त्या युद्धभूमीवर हे मंदिर असल्याचे मानले जाते.
महामार्गाच्या अगदी जवळ असले तरी या मंदिराचा परिसर शांत निवांत असा आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी दक्षिण व पश्चिमेकडे कमानी आहेत. पश्चिम कमानीवर एक प्रचंड मोठे पिंपळाचे झाड आहे. अनेक वर्षांपासून विस्तारलेल्या पिंपळाचा भार सावरत ही कमान अद्यापही भक्कमपणे उभी आहे.
दक्षिणेच्या कमानीतून मंदिर आवारात प्रवेश केल्यावर समोरच नंदी आहे. त्याला लागूनच छोटीशी दगडी दीपमाळ आहे. दक्षिणेच्या या कमानीवर साधनेला बसलेल्या तपस्व्याची आणि त्याच्या सोबत एका घोड्याची मूर्ती दिसते. तशीच मूर्ती आतही दिसते. मात्र हे पुतळे अलीकडच्या काळात बसवल्याचे सांगितले जाते. मंदिर परिसरात झाडांची गर्दी आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही इथे सावली आणि गारवा असतो. या मंदिर परिसरात दत्ताचे व शनिदेवाचे मंदिर आहे.
मंदिराच्या आवारात अलीकडच्या काळात सुधारणा करून भाविकांसाठी फरशी बसवलेली आहे. समोरच एक छोटा दरवाजा आहे. एखाद्या गुंफेसारखा दगडात कोरलेला आतील सभामंडप चार खांबांवर आपला तोल सावरून आहे. युद्धभूमीवर उभारण्यात आले असल्यामुळे की काय हे मंदिर साधेसुधे आहे. फार कलाकुसर इथे दिसत नाही. मंदिराचा सभामंडप दगडात कोरल्यासारखा दिसत असला तरी गाभारा मात्र बांधीव आहे. दगडी बांधकामातून उभारलेला घुमटाच्या मध्यभागी फुलाची नक्षी आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर त्रिशूळ कोरलेला आहे. गाभाऱ्यात दोन मूर्ती दिसतात. त्यातील एक पुरुष रुपातील तर एक स्त्री रुपातील आहे. या मूर्ती कृष्ण आणि वनवासात स्त्रीरुपात असलेल्या अर्जुनाच्या असल्याचे सांगितले जाते.
मंदिराबाबतची आख्यायिका अशी, की जेव्हा पांडव अज्ञातवासात होते तेव्हा कौरवाच्या सैन्याने वाईच्या राजाच्या गाई पळवल्या. त्यांना स्त्रीरुपातील अर्जुन आणि श्रीकृष्णांनी अडवले. कौरवांशी युद्ध करत सर्व गायींची सुटका केली होती. त्याची आठवण म्हणून बांधण्यात आलेल्या या मंदिराला अडबलनाथ असे म्हटले जाते. काहींच्या मते मात्र अडबलनाथ हे भैरवनाथांचेच रुप असून ते इथे त्यांच्या पत्नीसोबत विराजमान आहेत.
चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला येथे अडबलनाथांची मोठी यात्रा भरते. या यात्रेत बगाडही असते. त्यासाठी या परिसरातील ग्रामस्थ, तसेच नोकरीनिमित्त दूरदूर स्थायिक झालेले नागरिक आवर्जून येतात. मंदिरात दर रविवारी आणि दर पौर्णिमेला महाप्रसाद असतो. प्रत्येक वेळी महाप्रसाद म्हणून वेगवेगळे पदार्थ दिले जातात. सकाळी अकरा वाजता सुरू झालेला महाप्रसाद शेवटचा भाविक येईपर्यंत सुरू असतो.