कोंडेश्वर मंदिर

कोंडाळा झामरे, ता. वाशिम, जि. वाशिम

प्राचीन काळी भारतात अस्तित्वात असलेल्या १६ महाजनपदांमध्ये वत्स जनपदाचा समावेश होता. ते जनपद म्हणजेच आजचे वाशिम होय. अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये वत्सगुल्म नावाने उल्लेख असलेल्या वाशिमचा परिसर पूर्वी दंडकारण्याचा भाग होता. या प्राचीन आणि पौराणिक परिसराचे माहात्म्य सांगणाऱ्या ‘वत्सगुल्म माहात्म्य’ या संस्कृत ग्रंथामध्ये या भागातील १०८ तीर्थांची माहिती देण्यात आली आहे. कोंडेश्वर हे त्यांपैकीच एक महत्त्वाचे तीर्थ आहे. कोंडाळा झामरे या गावामध्ये कोंडेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर उभे आहे. हे मंदिर बाराव्या शतकातील असावे असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

कोंडाळा झामरे या गावाच्या नावामागे एक रंजक कथा आहे. हे गाव ज्या परिसरात वसलेले आहे, त्याच्या चारही बाजूंना पूर्वी टेकड्या होत्या. एखाद्या गावास किंवा भागास अनेकदा त्याचे वैशिष्ट्य वा रचना यावरून नाव पडते. हे गाव टेकड्यांच्या कोंडाळ्यात असल्यामुळे त्यास कोंडाळा असे नाव प्राप्त झाले आणि येथील महादेवास कोंडाणेश्वर किंवा कोंडेश्वर असे संबोधले जाऊ लागले. येथील कोंडेश्वर मंदिराची आख्यायिका प्रभू श्रीरामचंद्रांच्या वनवासकाळाशी संबंधित आहे. वनवासकाळात असताना श्रीराम, लक्ष्मण आणि सीता हे दंडकारण्यातील या भागात आले होते. त्यावेळी त्यांनी येथील महादेवाच्या मंदिरात येऊन पूजा केली होती. तसेच, त्यांनी काही काळ येथे वास्तव्यही केले होते. श्रीरामचंद्रांचा चरणस्पर्श झाल्याची पवित्र स्मृती म्हणून येथे त्यांचे पादुकास्थान निर्माण करण्यात आले आहे.
कोंडाळा झामरे येथील कोंडेश्वराचे हे मंदिर एका विस्तीर्ण प्रांगणात वसलेले आहे. मंदिराच्या रुंद मार्गावर भव्य प्रवेशद्वार उभारलेले आहे. दाक्षिणात्य पद्धतीची रचना असलेल्या या प्रवेशद्वारातून आत आल्यावर प्रथमतः येथील भव्य मंडप दृष्टीस पडतो. अर्धखुल्या स्वरूपाचा व वर गजपृष्ठाकार पत्र्याचे छत असलेल्या या मंडपात मोठा सभामंच आहे. येथून पुढे काही अंतरावर, खालच्या बाजूस कोंडेश्वराचे मुख्य मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंती शैलीत बांधले आहे. मंदिराची डागडुजी करताना त्याच्या बाह्यभिंतींना गिलावा करून त्यावर रंग दिलेला आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडप आणि गर्भगृह यांवर घुमटाकार शिखरे आहेत, जी जीर्णोद्धारवेळी बांधण्यात आली आहेत.

सभामंडपाचे प्रवेशद्वार नेहमीच्या हेमाडपंती मंदिरांच्या प्रवेशद्वारांहून वेगळ्या स्वरूपाचे आहे. येथे दगडी द्वारचौकटीच्या दोन्ही बाजूंस काही अंतर सोडून दोन स्तंभ आहेत, त्यात कमानाकार रचना आहे. या स्तंभांवर वरच्या बाजूस साधी नक्षी कोरलेली आहे, तर प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस भौमितिक नक्षी पहायला मिळते. सभामंडपास बाशिंगी छत आहे. सभामंडपातील दगडी भिंतींमध्ये आठ खांब आहेत, जे भिंतीत अर्धे झाकले गेले आहेत. अशा स्तंभांना ‘अर्धस्तंभ’ म्हणतात. जमिनीवर संगमरवरी फरशी बसवलेली आहे. मध्यभागी नंदींच्या दोन जुन्या दगडी मूर्ती शेजारी-शेजारी आहेत. अंतराळ छोटेसे आहे व त्याच्या छतावरही कोरीव काम आहे. या हेमाडपंती मंदिराच्या गर्भगृहाचे आतील बाजूने पूर्णतः नूतनीकरण करण्यात आले आहे. येथे जमिनीवर तसेच भिंतींवर संगमरवरी फरशा लावण्यात आल्या आहेत. मध्यभागी कोंडेश्वर महादेवाची काळ्या पाषाणातील पिंडी आहे. पिंडीच्या शाळुंकेत मध्यभागी उंच दंडगोलाकार लिंग आहे. पिंडीच्या भोवती त्याच आकाराचा छोटासा कठडा केलेला आहे. गर्भगृहातील मागील भिंतीतील देवळीत गंगादेवीची वस्त्रालंकारांनी शृंगारलेली सुंदर संगमरवरी मूर्ती आहे. या छोट्या आकाराच्या गर्भगृहाच्या छताकडील भागात पारंपरिक चौकोनी-त्रिकोणी रचना आहे.

मुख्य मंदिराच्या बाहेर यज्ञकुंड व त्यापुढे पाण्याचे मोठे कुंड आहे. या कुंडाची खोली ६० फूट आहे. यज्ञकुंडाजवळ हनुमानाचे मंदिर आहे, ज्यात हनुमानाची पाषाणातील निरावयव मूर्ती आहे. त्याच्या डाव्या बाजूला गणेशाची दगडी मूर्ती आहे व तिलाही शेंदूर लावण्यात आला आहे. या मंदिराशेजारी एक जुनी बारव आहे. विहिरीत आत जाण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. येथून पुढे काही अंतरावर श्रीरामचंद्र पादुका स्थान आहे. चार दगडी खांबांवर वरच्या बाजूला दगडी छत अशी मांडवासारखी या स्थानाची रचना आहे. मंदिराच्या समोरील दगडी स्तंभांच्या तळाशी टेकून ठेवलेली दोन शिल्पे आहेत. यातील डावीकडील शिल्पात अश्वारूढ योद्धा, त्याच्या मागे बसलेली स्त्री आणि खालच्या बाजूला श्वान कोरलेले आहे. यावरून हे शिल्प खंडोबासदृश देवतेचे असू शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे. उजवीकडील शिल्प ग्रामदेवतेचे आहे. आत एका दगडी चौथऱ्यावर श्रीरामाच्या दगडी पादुका आणि बाजूला महादेवाची पिंडी आहे.

येथे नजीकच दुर्गामातेचे छोटेसे मंदिरही आहे. या मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय लहान असल्याने खाली वाकूनच आत यावे लागते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वर एका कोनाड्यात गणेशाची कोरीव मूर्ती आहे आणि आत दुर्गामातेची मूर्ती आहे. या मंदिराजवळ नरकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. त्याच्या प्रवेशमार्गात मध्येच एक स्तंभ उभा आहे, तर बाजूचे दोन स्तंभ भिंतीत असल्याने दिसत नाहीत. आत दोन्ही बाजूला दोन देवकोष्ठके आहेत. एका देवकोष्ठकात तपस्वी पुरुषाची प्राचीन प्रतिमा आहे, तर दुसऱ्या देवकोष्ठकात लोकदेवतेची प्राचीन पाषाणमूर्ती आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार नक्षीदार आहे, ज्यात वरच्या बाजूला गणेशाची मूर्ती आहे. या प्राचीन मंदिराच्या गर्भगृहातही संगमरवरी फरशा बसवलेल्या आहेत. येथे काळ्या पाषाणातील नरकेश्वराचे शिवलिंग विराजमान आहे. मागच्या भिंतीत देवकोष्ठकात पार्वतीमातेची प्राचीन मूर्ती आहे. या मंदिरावरही आधुनिक पद्धतीचे शिखर उभारलेले आहे.

कोंडेश्वर महादेव संस्थानतर्फे येथे रामनवमी, हनुमानजयंती, महाशिवरात्र, नवरात्र आदी विविध सण-समारंभ धार्मिक पद्धतीने साजरे केले जातात. महाशिवरात्रीस येथे मोठा उत्सव असतो. महाशिवरात्र आणि श्रावणातील दर सोमवारी येथे कोंडेश्वराच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. कोंडेश्वर महादेव हा नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे येथे खासकरून पुत्रप्राप्तीसाठी नवस करण्यासाठी अनेक भाविक येतात. येथील सभागृहात विवाहादी अनेक मंगल कार्यक्रम होतात. त्यानिमित्तानेही येथे भाविकांची मोठी वर्दळ असते.

उपयुक्त माहिती:

  • वाशीम येथून ८ किमी अंतरावर
  • वाशीम येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे

कोंडेश्वर मंदिर

कोंडाला ज़मरे, वाशिम, जिला। वाशिम

Back To Home