साडेतीन शक्तिपिठांपैकी एक असलेल्या तुळजापुरचे तुळजाभवानी मंदिर महाराष्ट्रात परिचित आहे. तुळजापूरची भवानी ही साक्षात् छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी होती. शिवाजी महाराज अनेकदा कार्यारंभी या देवीचा कौल घेत असल्याच्या नोंदी ऐतिहासिक बखरींमध्ये आहेत. भवानी तलवार त्यांना साक्षात तुळजाभवानीनेच दिली होती, ही आख्यायिका महाराष्ट्रात सुपरिचित आहे. अशा या देवीची महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीची मंदिरे राज्यात विविध ठिकाणी आहेत. यापैकी अनिकट येथील तुळजाभवानी मंदिर हे अकोल्यातील प्रतितुळजापूर म्हणून प्रसिद्ध आहे. येथे देवी तुळजाभवानी स्वयंभू आसरांसह विराजमान आहे.
‘भव’ या शब्दाचे महादेव, मदन व संसार असे अर्थ आहेत. त्या सर्वांना चैतन्य देणारी देवी ती भवानी, असे स्पष्टीकरण अठराव्या शतकात होऊन गेलेले तंत्रशास्त्रातील थोर विद्वान व भाष्यकार भास्करराय यांनी दिले आहे. भव म्हणजे शंकराची पत्नी ती भवानी अशीही या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार, तंत्रशास्त्रातील अनेक सिद्धांत शिव-पार्वती संवादरूपानेच आले आहेत, म्हणजेच अनेक रूपे धारण करून विविध कार्ये करणारी शिवशक्ती हीच देवी किंवा भवानी आहे. संस्कृतातील सौंदर्य लहरी, ललिता सहस्रनाम, देवी भागवत, भवानी भुजंगम स्तोत्र इ. ग्रंथांत शक्तिरूपिणी देवीची म्हणजे भवानीची अनेक कार्ये वर्णिली आहेत. ती पंजाबमधील थानेसर (ठाणेश्वर) येथील शक्तिपिठाची अधिष्ठात्री देवता आहे, तर महाराष्ट्रातील उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील तुळाजापूर हे भवानीचे शक्तिपीठ म्हणून ख्यातकीर्त आहे.
‘तुळजा माहात्म्या’त देवीविषयी अशी पौराणिक आख्यायिका सांगितली आहे की कृतयुगात कर्दम नामक एक विप्र राहात असत. त्यांच्या मृत्यूच्या समयी त्यांची अनुभूती नामक पत्नी गरोदर होती. त्यामुळे ती पतीसमवेत सहगमन करू शकली नाही. काही दिवसांनी प्रसूत झाल्यानंतर तिने मंदाकिनी नदीतीरावर तपश्चर्या सुरू केली. एकदा तेथे शिकारीच्या निमित्ताने आलेल्या कुक्कुट नामक दैत्याने तिला पाहिले. तिचे तेजस्वी रूप पाहून तो तिच्यावर मोहीत झाला. त्याने तिच्या देहाला स्पर्श केला.
तेव्हा अनुभूतीने मनोमन पार्वती मातेचा धावा केला. तिची हाक ऐकून साक्षात् पार्वती तेथे भवानी स्वरूपात प्रकट झाली व तिने कुक्कुट दैत्याचा वध केला. भक्ताच्या हाकेस त्वरित धावून आली म्हणून या देवीस तुरजा वा त्वरिता असे संबोधले जाऊ लागले. या आख्यायिकेस जोडून अशी कथा आहे, की कुक्कुट दैत्याने मरता मरता महिषासुराचे रूप घेतले होते. देवीने त्याचा वध केला. त्यामुळे देवी तुळजापूर येथे महिषासूरमर्दिनीच्या स्वरूपात विराजमान आहे.
देवीचे येथील मंदिर पूर्वी छोटेखानी स्वरूपाचे होते. १९९९ मध्ये ग्रामस्थांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर त्यास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. मोर्णा नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिराचा परिसर शांत व प्रसन्न आहे. मंदिराला चारही बाजूंनी आवारभिंत व त्या भिंतीत देवीचे वाहन सिंहाचा मुखवटा असलेले आकर्षक प्रवेशद्वार आहे. १८ फूट उंच व १३ फूट रुंद असलेले हे प्रवेशद्वार लोखंडी गज व सिमेंट काँक्रिटचा वापर करून उभारण्यात आले आहे. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणातील उद्यानात कालियामर्दन करणाऱ्या श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती आहे. याशिवाय गणेश व कार्तिकेयासह शिव-पार्वतीची शिल्पे आहेत.
मूळ मंदिरासमोर असलेल्या खुल्या सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना सिंहशिल्पे आहेत. सभामंडपासमोरील एका चौथऱ्यावर कालभैरवाचे स्थान व येथून काही पावलांवरच देवीचे वाहन असलेल्या सिंहाचे शिल्प आहे. भाविकांच्या सुविधेसाठी या सभामंडपावर पत्र्याचे छप्पर आहे. येथील सभामंडपात मध्यभागी होमकुंड व बाजूने भाविकांसाठी आसने आहेत. सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील स्तंभशाखांवर नक्षीकाम आहे. गर्भगृहातील वज्रपिठावर तुळजाभवानी मातेची सुंदर मूर्ती विराजमान आहे. या वस्त्रालंकारित देवीच्या शिरावर चांदीचा मुकुट आहे. गर्भगृहातील देवकोष्टकांत गणपतीची मूर्ती, गजानन महाराजांची मूर्ती व तुळजाभवानीची प्रतिमा आहेत.
या गर्भगृहाच्या दोन्ही बाजूने जमिनीखाली असणाऱ्या आसरा मातेच्या स्थानाकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. सहा ते सात पायऱ्या उतरून मूळ गर्भगृहाच्या खाली जमिनीत असणाऱ्या आसरा मातेच्या गर्भगृहात प्रवेश होतो. या गर्भगृहात स्वयंभू आसरा मातेचे स्थान आहे. येथील एका स्वयंभू शेंदूरचर्चित पाषाणावर देवीच्या सात प्रतिमा रंगविलेल्या आहेत. हा पाषाण आसरा माता म्हणून पुजला जातो. या पाषाणाच्या मागील भिंतीतील देवकोष्टकात देवीची मूर्ती आहे.
या मंदिरात नित्यनेमाने पूजाअर्चा केली जाते. येथे चैत्री तसेच शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या उत्सवानिमित्त गोंधळ, हवन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परिसरातील असंख्य भाविक या उत्सवांच्या प्रसंगी देवीच्या दर्शनासाठी येतात. दररोज सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांना येथे देवदर्शन करता येते.