अकोल्याची मातृदेवता असलेली अंबिका देवी ही बागातील देवी, रिझर्व्ह माता, रिझोरा माता आदी नावांनीही प्रसिद्ध आहे. मूळची मरिमाता असलेली ही देवी येथे अंबिका माता म्हणून पूजली जाते. देवीची येथील मूर्ती स्वयंभू असल्याचे सांगण्यात येते. सुमारे ४२५ वर्षांपूर्वी येथे प्रगट झालेली ही देवी जागृत असल्याची लाखो भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे दररोज शेकडो भाविक तिच्या चरणी लीन होतात. नवरात्रोत्सवांदरम्यान जिल्ह्याच्या विविध भागांतून येणाऱ्या हजारो भाविकांच्या गर्दीमुळे परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.
पौराणिक आख्यायिकेनुसार, अकोलसिंह नावाच्या राजपूत सरदाराने या गावाची स्थापना केली. तो पूर्वीच्या काळी अकोल्यापासून सहा मैल अंतरावर असलेल्या काथेरी येथे राहात असे. सध्या अकोला जेथे वसलेले आहे, त्या भागात घनदाट जंगल होते. अकोलसिंह याने या भागात कालांतराने वस्ती वसवली, तसेच येथे आपली गढी बांधली. याच गढीच्या जागी पुढे औरंगजेबाचा वजिर-ए-आझम असदखान याने इ.स. १६९७ मध्ये किल्ला बांधला. औरंगजेबाने असदखान याला अकोल्याची जहागिरी दिली होती. तोवर हे एक छोटेसे खेडे होते, तर येथून साधारणतः ३० किमी अंतरावरील बालापूर हे एक संपन्न गाव होते.
त्यामुळे त्या काळात अकोल्यास अकोला-बालापूर म्हणून ओळखले जात असे. साधारणतः याच, मुघल सत्तेच्या काळात येथे अंबिकेची स्वयंभू मूर्ती प्रकट झाल्याचे सांगण्यात येते.
अकोल्यातील स्थानिक भक्त या देवीस आजही मरिमाता म्हणून संबोधतात. मरिमाता ही साथीच्या रोगांचे निवारण करणारी उग्र प्रवृत्तीची लोकदेवता आहे. याच देवतेचे कालांतराने उन्नयन होऊन तिला येथे अंबिकेच्या रुपात पूजले जाऊ लागले. मात्र तिची मूळ ओळख आजही कायम आहे. या मंदिराविषयी आख्यायिका अशी की इ.स. १८५३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने निझामाकडून अकोल्याचे प्रशासन आपल्या हाती घेतले. ब्रिटिशांच्या सत्ताकाळात या मंदिराचा परिसर पोलीस ठाणे उभारण्यासाठी निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे येथील अंबिकेचे मंदिर हटवण्याचे आदेश एका ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्याने दिले. त्यानुसार मंदिर पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. परंतु त्याच वेळी त्या अधिकाऱ्याच्या कुटुंबातील अनेक सदस्य आजारी पडले. अनेक डॉक्टरांनी उपचार केल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत फरक पडेना. तेव्हा या मंदिराच्या तत्कालीन पुजाऱ्याने या अधिकाऱ्यास सांगितले की ‘मंदिर पाडण्याचे काम थांबवल्यास तुमच्या कुटुंबातील लोक बरे होतील.’ सुरूवातीला या अधिकाऱ्याने पुजाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र, नंतर त्याने मंदिर पाडण्याचा निर्णय रद्द केला. त्यानंतर पुजाऱ्याने मंदिरात पूजा करून उरलेले पूजेचे पवित्र जल या अधिकाऱ्याच्या कुटुंबातील आजारी लोकांवर शिंपडल्यावर ते लगेच बरे झाले. या घटनेनंतर त्या अधिकाऱ्याने या पुजाऱ्याच्या कुटुंबीयांना काही भेटवस्तू देण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, या भेटवस्तू नाकारत पुजाऱ्याच्या कुटुंबीयांनी त्याच्याकडून हे मंदिर कधीही न हटवण्याचे वचन घेतले. त्यानंतर त्या अधिकाऱ्याने मंदिराच्या चारही बाजूंनी लोखंडी पट्ट्या लावल्या. आजही या पट्ट्या दिसतात. या घटनेपासून या मंदिरातील देवीला ‘रिझर्व्ह माता’ किंवा ‘रिझोरा माता’ असे नाव पडले. पूर्वी या परिसरात मोठा बगिचा होता. त्यामुळे हे मंदिर ‘बागेतल्या देवीचे मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मंदिराच्या दुमजली प्रवेशद्वारातून प्रांगणात प्रवेश होते. या परिसरात पुजासाहित्य व प्रसाद विक्रीची अनेक दुकाने आहेत. मंदिराच्या प्रांगणात काशिविश्वनाथ व गणपती अशी लहान मंदिरे आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात मध्यभागी शीतलामातेचे देवळीवजा मंदिर आहे. येथे सप्तमातृकांचे मुखवटे व त्या शेजारीच भैरवनाथाचे स्थान आहे. सभामंडपाच्या भिंतींवरील खिडक्यांच्या जाळ्यांवर नवसपूर्तीनिमित्त भाविकांनी बांधलेल्या शेकडो ओट्या आहेत. सभामंडपाच्या पुढील बाजूला प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. भाविकांच्या गर्दीचे नियोजन करता यावे यासाठी गर्भगृहाच्या बाहेर लाकडी रेलिंग बसवलेले आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंकडील भिंतींवर आकर्षक नक्षीकाम आहे. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहातील वज्रपिठावर अंबिका मातेची मूर्ती विराजमान आहे. चांदीचा मुकुट परिधान केलेल्या या मातेच्या मुखावर शेंदूर लावलेला आहे. चतुर्भूज असलेल्या या वस्त्रालंकारित देवीच्या डाव्या बाजूकडील वरच्या हातात तलवार आणि खालचा हात अभय मुद्रेत आहे. उजव्या बाजूकडील वरच्या हातात त्रिशूळ आणि खालच्या हातात गुलाबपुष्प आहे. मूर्तीच्या मागील प्रभावळीवरही कलाकुसर आहे.
नवसाला पावणारी असा या देवीचा लौकिक आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंगळवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. येथे आषाढी एकादशी, तसेच नवरात्रोत्सव हे प्रमुख उत्सव असतात. या नवरात्रोत्सवादरम्यान नऊही दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कालावधीत मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.