बारादरी संस्थान
वनवासी राम मंदिर

बालापूर, ता. बालापूर, जि. अकोला

उत्तरवाहिनी मनकर्णिका (मन) नदीच्या तीरावर असलेले बारादरी संस्थान हे संतांची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. स्वयंभू बालादेवीचे प्रसिद्ध मंदिर असलेल्या बालापूर गावातील या संस्थानाला सुमारे हजार वर्षांचा इतिहास आहे. येथील राममंदिरात वनवासी रामाची मूर्ती आहे. दाढी-मिशा असलेली ही प्राचीन मूर्ती नेपाळमधील गंडकी नदीपात्रातील शाळीग्राम दगडात घडवलेली आहे. या संस्थानाच्या परिसरात संतांच्या ४० हून अधिक समाध्या आहेत.
अकोल्या जिल्ह्यातील मुख्य नदी असलेल्या पूर्णा नदीची उपनदी असलेली मन ही नदी प्राचीन काळी मनकर्णिका म्हणून ओळखली जात असे. ही नदी उत्तरवाहिनी आहे. हिंदू धार्मिक परंपरेनुसार उत्तरवाहिनी नद्यांच्या काठावरील मंदिरांना तीर्थक्षेत्रांचा दर्जा प्राप्त होतो. त्यामुळे या परिसरासही तीर्थक्षेत्राचा मान आहे व ही जागा अनेक संतांची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. मन नदीच्या काठावर असलेल्या बारादरी संस्थानच्या परिसरात अनेक साधु-संतांनी तपश्चर्या केल्याचे इतिहासात दाखले आहेत. एकांतात तप करता यावे तसेच त्रिकालसंध्येसाठी पाण्याची सुविधा असावी, अशा योग्य जागेच्या शोध घेत हे साधु-संत उत्तरवाहिनी मनकर्णिका नदीकाठी असलेल्या या ठिकाणी आले. या परिसरातील आश्रमाला मोठी गुरु-शिष्य परंपराही लाभली आहे. येथील राममंदिर तसेच शिवमंदिर प्राचीन असल्याचे सांगण्यात येते.
पूर्वी या परिसरात सीताराम महाराज नावाच्या महापुरुषाचे वास्तव्य होते. त्यांनी येथे अनेक वर्षे तपश्चर्या केली. ते गावात भिक्षा मागत असत. भिक्षा देणाऱ्या व्यक्तींना प्रसाद म्हणून ते आपल्या झोळीतील ठेवलेल्या तुळशीच्या पानांपैकी दोन पाने देत असत. त्यांच्या काळात येथील आश्रमात शे-दीडशे गोमाता होत्या. १९६५ मध्ये त्यांनी येथे समाधी घेतल्यानंतर काही वर्षे हा आश्रम काहीसा दुर्लक्षित होता. या काळात काही समाजकंटकांनी राममंदिरातील रामाच्या मूर्तीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता. ८० च्या दशकात येथे पुन्हा संतांचे येणे सुरू झाले. २००४ मध्ये येथील राममंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
मन आणि म्हैस नद्यांच्या संगमावर वसलेल्या बालापूरला बहमनी काळापासूनचा मोठा इतिहास आहे. येथील बालापूर किल्ला हा विदर्भातील सर्वात मजबूत किल्ला समजला जातो. औरंगजेबाचा पुत्र आझमशाह याने १७२१ मध्ये या किल्ल्याच्या उभारणीस सुरुवात केली. या किल्ल्याचे काम तत्कालीन एलिचपूरचा (सध्याचे अचलपूर) नवाब इस्माईल खान याने १७५७ मध्ये पूर्ण केल्याची नोंद आहे. या किल्ल्याच्या दक्षिण दिशेला बालादेवीचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. या देवीवरूनच या शहराला बालापूर असे नाव पडल्याचे सांगण्यात येते. पूर्वी बालापूर हा बेरार प्रांतातील एक श्रीमंत परगणा होता. बालापूर शहरातील बाजारपेठ पूर्वी विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ समजली जात असे. बहमनी, मुघल तसेच निजामाचा इतिहास पाहिलेल्या या गावाच्या दक्षिणेकडे नदीकाठावर मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंह यांनी बांधलेली छत्री आहे. या छत्रीकडे जाण्याच्या मार्गावर हे संस्थान आहे.
गावाच्या वेशीवर असलेल्या या मंदिराचा परिसर शांत व प्रसन्न आहे. या परिसरात अनेक तपस्वींच्या छोट्या-मोठ्या आकाराच्या समाध्या आहेत. असे सांगितले जाते की पूर्वी येथे ८० समाध्या होत्या. त्यापैकी आता सुमारे ५० समाध्या शिल्लक आहेत. यातील अनेक समाध्यांवर कोरीव नक्षीकाम आहे. या संस्थानाच्या परिसरात गोशाळा व लहान शिवमंदिरही आहे. उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराचा आकार श्रीयंत्राप्रमाणे आहे. तीन दर्शनमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रांगणातून सात पायऱ्या चढून दर्शनमंडपात प्रवेश होतो. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला कठडे व त्यांवर स्तंभ आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या येथील सभामंडपात संगमरवरी फरसबंदी आहे. सभामंडपाच्या पुढील बाजूस अष्टकोनी गर्भगृह आहे. या गर्भगृहाला बाहेरील बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. त्यासाठी सभामंडपातून दोन दरवाजे आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वामी स्वकर्मानंद सरस्वती यांची एका चौथऱ्यावर मोठी बैठी मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपिठावर नेपाळमधील गंडकी नदीपात्रातील शाळीग्राम दगडात घडवलेली वनवासी रामाची मूर्ती आहे. दाढी-मिशी असलेली ही प्राचीन मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. मूर्तीच्या डाव्या हातात धनुष्य व उजव्या हातात तीर आहे. या मूर्तीच्या खालील भागात प्राचीन शीलालेखही आहे. पण तो अवाचनीय आहे. मूर्तीच्या उजवीकडे मारुती व डावीकडे गरूड मूर्ती आहेत. या मूर्तीच्या मागील बाजूस श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. तिन्ही मूर्तींवर सुंदर मुकूट व मागील बाजूस प्रभावळ आहेत. या गर्भगृहावर गोलाकार आकारांचे थर असणारे व वर निमुळते होत जाणारे शिखर आहे. शिखराच्या अग्रभागी आमलक व कळस आहेत. या मंदिर परिसरात काही समाध्या व प्राचीन विहीर आहे. विहिरीनजीक सीताराम महाराजांची समाधी आहे.
गुजरातमधील मांडवी येथे इ.स. ७२६ मध्ये स्थापन झालेल्या ‘श्री पंचायती तपोनिधि निरंजन आखाडा’ या शैव संप्रदायी आखाड्याचे साधू गजाननपुरी महाराज यांचे या मंदिरात वास्तव्य आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील आश्रमाचे कामकाज चालते. येथे महाशिवरात्र, हनुमान जयंती, रामनवमी, सीताराम महाराज पुण्यतिथी आदी उत्सव साजरे केले जातात. महाशिवरात्र हा येथील मोठा उत्सव असतो. त्यानिमित्त येथे अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यात नवकुंडी यज्ञ, ज्ञानयज्ञ, शिवपुराण कथा, श्रीमद्‌भागवत कथा सोहळा आदींचा समावेश असतो. या उत्सवाला अनेक भाविक उपस्थित असतात. भाविकांना या वेळी महाप्रसादाचेही वाटप करण्यात येते.

उपयुक्त माहिती:

  • बालापूर बस स्थानकापासून १ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून बालापूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home