
यादव काळात लोकप्रिय असलेल्या चांगदेव या देवतेच्या नावावरून ओळखले जाणारे चांगदेव हे गाव व त्याचा परिसर ही योगीराज चांगा वटेश्वर अर्थात चांगदेव यांची मूलभूमी मानण्यात येते. मुक्ताईनगर तालुक्यात मुक्ताबाईंच्या अंतर्धान स्थानापासून जवळच, पूर्णा आणि तपोष्णीच्या संगमावर, चांगदेवांचे प्राचीन मंदिर उभे आहे. सुमारे ८०० वर्षांपूर्वीचे हे मंदिर हेमाडपंती शैलीतील आहे. असे सांगण्यात येते की १४०० वर्षे आयुष्य जगलेल्या चांगदेवांनी या मंदिराच्या परिसरात योग तपश्चर्या केली होती. एवढेच नव्हे, तर अभ्यासकांच्या मते हेच चांगदेवांचे समाधीस्थान आहे.
असे सांगण्यात येते की चांगदेव या गावास पूर्वी सुंदरपुरी असे म्हटले जात असे. सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या चरित्रातही या गावाचा उल्लेख आहे. ‘लीळाचरित्रा’च्या पूर्वार्धातील लीळा क्र. ४१७ अशी आहे की ‘मग तेथौनि गोसावीं चांगदेवासि बीजें केलें : चांगदेवीं जगतीआंतुली मढीं अवस्थान जालें :।।’ लीळाचरित्राच्या ‘रामेश्वरबाबांची वासना’ या प्रतीत त्यांनी येथे ‘पंचरात्री’
म्हणजे पाच रात्री वास्तव्य केले असे म्हटलेले आहे. या गावाच्या नावाच्या दोन उत्पत्ती सांगितल्या जातात. एक उत्पत्ती कथा अशी की इ.स. १००० ते १२१६ या काळात या भागात पाटणे येथील निकुंभ वंशाच्या राजांची सत्ता होती. त्याच्या ताब्यात खान्देशातील सुमारे १६०० गावे होती.
निकुंभ नृपती गोवन (द्वितीय)चा नातू व कृष्णराज (द्वितीय)चा मुलगा इंद्रदेव याच्या पदरी चंगदेव नावाचा प्रधान होता. पाटणे येथील महादेव मंदिरात कोरलेल्या शिलालेखात या राजाचा व चंगदेवाचा उल्लेख आहे. या चंगदेवाचे नाव या गावास देण्यात आले आहे. अन्य उत्पत्तीनुसार योगीराज चांगदेव यांच्यावरून या गावास चांगदेव असे नाव पडले. मात्र ख्यातनाम संशोधक रा. चिं. ढेरे यांच्या ‘श्रीपर्वताच्या छायेत’ या पुस्तकात असे स्पष्ट म्हटले आहे की ‘या स्थानाचे हे नाव तेथील चांगदेव नामक देवतेमुळे पडलेले आहे, चांगा वटेश्वरांमुळे पडलेले नव्हे. चांगदेव नामक देवता यादवकाळात लोकप्रिय होती. लोक पुत्रप्राप्तीसाठी चांगदेवाला नवस करीत.’ चांगा वटेश्वर यांचे मूलस्थान हे हेच गाव असून, येथे त्यांचे प्रथम दर्शन झाले असे सांगण्यात येते.
पारंपरिक चरित्रकथेनुसार महायोगी चांगदेव यांना त्यांच्या सिद्धीचा गर्व झाला होता. तो संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवून हरण केला. पुढे त्यांनी संत मुक्ताबाईंचे शिष्यत्व पत्करले. चांगा वटेश्वर यांनी अभंगरचना केली आहे. त्यांचा ‘तत्त्वसार’ हा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. चांगदेवांबाबत अशी लोकधारणा आहे की त्यांनी आत्मबलाने १४०० वर्षे शरीर जतन केले होते. संत नामदेवांच्या गाथेत याविषयी ‘चौदाशें वरुषें शरीर केलें जतन। बोधावीण शीण वाढविला।।’ असे म्हटले आहे. या बाबत रा. चिं. ढेरे यांनी असे म्हटले आहे की योग्यांच्या दीर्घजीवित्वासंबंधीच्या अनेक कथा प्राचीन वाङ्मयात कौतुकाने सांगितलेल्या आढळतात. परंतु चांगदेवांच्या परंपरेतील एक ग्रंथकार रत्नाकर यांनी आपल्या ‘दीपरत्नाकर’ या ग्रंथात असे म्हटले आहे की ‘मुक्ताबाईने चांगदेवाशीं। सांगितलें ब्रह्मज्ञानासी। जेणें चौदावे वर्षी शरिराशीं। काळवंचनेसि ठेविलें।।’ रत्नाकराच्या या साक्षीनुसार चांगदेव चौदाशे वर्षे जगले हे खरे नसून त्यांनी चौदाव्या वर्षी वयस्तंभन केले आणि दीर्घकाळपर्यंत काळवंचना करून चौदा वर्षांच्या वयासारखे युवावस्थेतील शरीर सतत टिकवले. चांगदेवांची समाधी पुणतांबे येथे असल्याचे सांगण्यात येते. मात्र तेथे चांगा वटेश्वरांची नव्हे, तर त्यांचे प्रशिष्य चांगा केशवदास अथवा चांगा मुधेश यांची समाधी आहे. चांगा वटेश्वरांची समाधी चांगदेव या गावी तापी–पूर्णा संगमावर असल्याचे रा. चिं. ढेरे यांनी संशोधनांती म्हटले आहे. श्यामजी मरुद्गणाच्या ‘चांगदेवचरित्रा’त ‘शरीर गुप्त झालें वटेश्वरी’ अशी नोंद आहे. या गावानजीकच चांगदेवांच्या गुरू संत मुक्ताबाई यांचे अंतर्धान स्थान आहे. या मुळे चांगदेव गाव आणि तेथील चांगदेव मंदिर अनन्यसाधारण महत्त्वाचे असल्याचे दिसते.
संगमाच्या किनारी मोठ्या आवारात काही फूट उंच जोत्यावर वसलेले हे मंदिर बाराव्या शतकातील प्रचलीत नागरशैलीत उभारले आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी त्याची रचना आहे. मंदिराची लांबी ९७ फूट आहे. या
भागास वेळोवेळी बसलेला मुस्लिम आक्रमकांचा फटका, तसेच नदीपरिसर असल्याने बसलेले पुराचे तडाखे या मंदिराला सहन करावे लागले. त्यामुळे या मंदिराचा बराचसा भाग हा पडझड होऊन भग्नावस्थेत आहे. पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने येथे दिलेल्या माहितीफलकानुसार, आजच्या काळात उभे असलेले मंदिर पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या काळात म्हणजे इ.स. १७६६ ते १७९५ दरम्यान बांधले गेले आहे. मंदिराच्या काही जुन्या भागावर विटांचे बांधकाम केलेले आहे.
पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरास तीन प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या द्वारचौकटीवर ललाटबिंब स्थानी गणेशाची मूर्ती आहे. त्यावरील भागातही एक कोरीव मूर्ती दिसते. परंतु ती ओळखण्यापलीकडे आहे. द्वारचौकटीच्या खालच्या बाजूस काही कोरीव मूर्ती दिसतात. चौकटी शेजारी असलेले स्तंभ पाहता मूळ मंदिराचे प्रवेशद्वार भव्य असल्याचे स्पष्ट होते. या स्तंभांवर खालच्या बाजूस प्रतिहारींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. येथील एका स्तंभावर शिलालेख कोरलेला आहे. कालौघात पुसट झाल्याने त्याचे वाचन होऊ
शकलेले नाही.
मंदिराचा मूळचा सभामंडप नष्ट झालेला असल्याने तेथे नंतर आधुनिक बांधकामात मंडप उभारलेला आहे. या मंडपात चार ओळींत १६ स्तंभ होते. आता येथे त्यांचे अवशेष दिसतात. मंदिराच्या अंतराळास सहा बाह्य दगडी स्तंभ आहेत. त्यातील काही खांबांवर भारवाहक किचकांची शिल्पे स्पष्ट दिसतात. अंतराळाच्या बाह्यभिंतीनजीक हनुमानाची प्राचीन मूर्ती आहे, तर आत एका चौथऱ्यावर योगीराज चांगदेवांची व्याघ्रारूढ रंगीत मूर्ती आहे. ही मूर्ती आधुनिक आहे.
गर्भगृहास त्रिशाखीय दगडी प्रवेशद्वार आहे. द्वारचौकटीचे स्तंभ कोरीव नक्षीकामाने सुशोभित आहेत. चौकटीवरील ललाटबिंबस्थानी मूर्तीचे स्थान दिसते. मात्र ते आता सपाट झाले आहे. त्याच्या वरच्या भागात एक चक्र कोरलेले आहे. आत संगमरवरी टाइल्स लावलेल्या चौथऱ्यावर शेंदूर लावलेला पाषाणाचा तांदळा आहे. त्यावर डोळे कोरलेले आहेत व मस्तकी त्रिपुंड लावलेले आहे. ही चांगदेवांची मूर्ती असल्याचे मानले जाते. त्याच्या बाजूस
गणेशाची मूर्ती, तसेच मुखलिंग स्वरूपातील शंकराची पिंडी व त्यापुढे नंदी आहे. या मूर्ती व पिंडी संगमरवरात कोरलेल्या आहेत. गर्भगृहाच्या छताच्या बाजूला दगडात कोरलेला वर्तुळाकार घुमट आहे. त्यावर नंतर बसवलेले घुमटाकार शिखर आहे.
चांगदेवांच्या या प्राचीन मंदिराचे शिल्पसौंदर्य गर्भगृहाच्या बाह्यभिंतींमध्ये पाहावयास मिळते. या भिंतीवर मधल्या भागात विविध मुद्रांतील अनेक सूरसुंदरींची शिल्पे कोरलेली आहेत. विशेष म्हणजे त्यातील काही शिल्पे नग्नावस्थेतील आहेत. येथे काही पुरूष देवतांचीही शिल्पे दिसतात. त्यातील एक शिल्प विष्णुचे आहे. या स्तंभांच्या शीर्षस्थानी भारवाहक किचकांची लहान शिल्पे आहेत. मंदिरातील अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्यासाठी सुंदर मकरप्रणाल बसवण्यात आले आहे व त्यापुढे छोटे चौकोनी कुंड आहे.
मंदिराच्या मागच्या बाजूला तेथे पूर्वी असलेल्या मंदिराचे भग्न अवशेष दिसतात. येथे हनुमानाचे एक छोटे मंदिर आहे. त्याचप्रमाणे एक प्राचीन
शिवमंदिर आहे. त्याच्या सभामंडपात नंदीची मोठी दगडी मूर्ती आहे. गाभाऱ्यात भूतलापासून खालच्या स्तरावर असलेले प्राचीन दगडी शिवलिंग आहे. चांगदेव मंदिराच्या पश्चिम आणि दक्षिण बाजूस २००८ साली भारतीय पुरातत्व विभागाने उत्खनन केले होते. त्यावेळी दगडी मंदिराचे एकेक भग्न अवशेष सापडत गेले. त्यात अनेक उत्तम शिल्पे आहेत. या मंदिराचे प्राचीनत्व, स्थापत्यशैली आणि इतिहास लक्षात घेऊन भारतीय पुरातत्व खात्याने या मंदिराला संरक्षित स्मारक असे घोषित केले आहे. मात्र येथील अनेक देवतांची शिल्पे, मंदिराचे अवशेष उघड्यावर इतस्ततः, कोणत्याही संरक्षणाविना टाकून दिलेले दिसतात. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींशीही हे मंदिर जोडले गेलेले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी चाललेल्या चळवळींचे एक केंद्र चांगदेव येथे होते. ‘हिस्टारिसिटी रिसर्च जर्नल’च्या ऑगस्ट २०१५ मधील अंकात दिनेश महाजन यांनी लिहिलेल्या लेखात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, येथे १९३० मध्ये मंदिर प्रवेश सत्याग्रह करण्यात आला होता. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. तत्कालिन पूर्व खान्देशच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २२ मे १९३० रोजी शासनास पाठवलेल्या गोपनीय पत्रात हा सत्याग्रह कसा फसला याची माहिती दिलेली आहे.
चांगदेव मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी मोठा जत्रोत्सव साजरा करण्यात येतो. त्यावेळी उत्तर महाराष्ट्रातील विविध भागांतील हजारो भाविक चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी येथे येतात. गेल्या काही वर्षांपासून हे स्थान पर्यटकांनाही आकर्षित करीत आहे. येथील संगमावर नौकाविहाराची सोय आहे.