धवल श्रीराम मंदिर

शिव पार्वती मंदिर

अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर

एकेकाळी आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत ग्रामपंचायत असलेल्या अकलुजची गणना आता सुनियोजित शहरात होते. येथे इतर शहरांप्रमाणे बांधकामांची फार गर्दी दिसत नाही. येथील प्रशस्त रस्त्यांभोवती आणि रस्त्यांच्या मध्यभागीही अनेक ठिकाणी झाडे आणि हिरवळ राखलेली दिसते. या शहरात असलेल्या प्रशस्त मंदिरांभोवतीच्या भल्या मोठ्या प्रांगणांतही अशीच हिरवीगार वनराई दिसते. अशाच हिरवळीने सजलेल्या आणि फुलझाडांनी बहरलेल्या परिसरात असलेली धवल श्रीराम शिवपार्वती ही दोन मंदिरे अकलूजकरांची श्रद्धास्थाने आहेत

पूर्वीच्या काळी असदनगर, सादनगर या नावांनी प्रसिद्ध असलेले हे गाव ग्रामदेवता अकलाई देवीच्या नावावरून अकलूज म्हणून ओळखले जाऊ लागले. अकलूजमध्ये तेराव्या शतकातील एक भुईकोट किल्ला आहे. यादव राजा सिंघन यांनी या किल्ल्याची बांधणी केली होती. त्यानंतर या किल्ल्याने बहामनी, आदिलशाही, मुघल आणि मराठा राजवटी पाहिल्या. सोलापूर जिल्ह्याचे ऐतिहासिक वैभव म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. दुसऱ्या बाजीरावांचे पेशवेपद बरखास्त झाले तेव्हा ते तीन महिन्यासाठी या किल्ल्यावर वास्तव्यासाठी होते. सध्या हा किल्ला शिवसृष्टी किल्ला म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगांचे सुंदर शिल्पांकन येथे केलेले आहे. असे हे ऐतिहासिक वारसा सांगणारे गाव धार्मिकदृष्ट्याही समृद्ध आहे. ग्रामदैवत अकलाई मंदिरासोबतच येथे आनंदी गणेश मंदिर, येथून जवळ असलेले महाळूंग येथील यमाई देवी मंदिर, धवल श्रीराम मंदिर शिव पार्वती मंदिर हे अकलूजमधील महत्त्वाची धार्मिक स्थाने आहेत

शहरातील जयश्रीनगर परिसरात असलेल्या एका मोठ्या प्रांगणात धवल श्रीराम मंदिर आहे. त्यात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या शुभ्र संगमरवरी मूर्ती आहेत. भाविकांसाठी हे राम मंदिर असले तरी संपूर्ण अकलूजसाठी मात्र ते एक महत्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे. मंदिराभोवती असलेल्या भल्यामोठ्या प्रांगणात रामनवमी, दसरा अशा धार्मिक उत्सवांसोबतच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत असते. त्यात अकलूज महोत्सव, अश्व महोत्सव आणि कुस्ती स्पर्धांचा समावेश असतो.

सभामंडप गर्भगृह अशी या दुमजली मंदिराची संरचना आहे. या मंदिराच्या तळमजल्यावर सभागृह आहे. पहिल्या मजल्यावरील मंदिरात जाण्यासाठी जमिनीपासून दोन पायरी मार्ग आहेत. सुमारे २० पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. येथील सभामंडप हा अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. यातील नक्षीदार स्तंभ एकमेकांशी महिरपी कमानीसदृश्य कलाकुसरींनी जोडलेले आहेत. संगरमरवरी फरसबंदी असलेल्या सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर लाकडी कलाकुसर आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर त्यावरील भागात गणेश मूर्ती आहेत. गर्भगृहात उंच वज्रपिठावर श्रीराम, लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती आहेत. येथील शुभ्र मूर्तींमुळे हे मंदिर धवल राम मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे

मंदिरात श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. श्रीरामाच्या जन्मोत्सवासाठी अकलूजसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. दसऱ्यालाही येथे सोने लुटण्याचा मोठा सोहळा होतो. यावेळी मंदिर परिसरात रावणाच्या प्रतिमेचे दहनही केले जाते. यावेळी येथे होणारी फटाक्यांची आतषबाजी हेही येथील आकर्षण ठरते. परिसरातील उद्योजकांना नव्या संधी देणारा अकलूज महोत्सव याच परिसरात आयोजित करण्यात येतो. गेल्या काही वर्षांपासून येथे अश्व महोत्सवही आयोजित करण्यात येऊ लागला आहे. त्या निमित्ताने वेगवेगळ्या जातीच्या घोड्यांचे प्रदर्शन येथे भरविले जाते. महाराष्ट्र केसरीसाठी कुस्त्यांच्या प्राथमिक स्पर्धाही या मैदानात घेतल्या जातात. अकलूजच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवनात या मंदिराला आणि परिसराला महत्वाचे स्थान आहे.

शिव पार्वती मंदिर

अकलूजमधील अनेक मंदिरांप्रमाणे शिव पार्वती मंदिरालाही प्रशस्त प्रांगण आहे. हिरवळीने सजलेल्या आणि फुलझाडांनी बहरलेल्या उद्यानवजा प्रांगणात शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिव पार्वती मंदिर आहे. या प्रांगणात शिव पार्वतीच्या मुख्य मंदिरासोबत असलेल्या तीन मंदिरसमुहात श्रीदत्त, शिवपिंडी आणि म्हाळसाबानूसह खंडोबाचे मुखवटे आहेत

रस्त्यापासून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी पेव्हरब्लॉकची फरसबंदी असलेला मार्ग आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला शोभिवंत झाडे आहेत. तेथून सुमारे ३० पायऱ्या चढून कमानीवजा मुख्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराची ही कमान गुलाबी दगडातून घडविण्यात आलेली आहे. प्रवेशद्वाराजवळ आतल्या बाजूला प्रांगणात अशाच गुलाबी दगडांचा वापर करून सुंदर दीपमाळ उभारलेली आहे. त्यापुढे उंच शिखर असलेले शिवपार्वतीचे मुख्य मंदिर आणि शेजारी तीन छोटी शिखरे असलेला मंदिर समूह दिसतो

उंच जगतीवर असलेल्या या मंदिराच्या मुखमंडपात येण्यासाठी सुमारे १५ पायऱ्या आहेत. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मुखमंडपातून मंदिराच्या बंदिस्त सभामंडपात (गुढमंडप) प्रवेश होतो. प्रवेशद्वाराजवळ सुंदर कलाकुसर केलेला नंदी आहे. सभामंडपाच्या गजपृष्ठाकार छतावर आतील बाजूने लाकडी कोरीव काम केलेले आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतींवरील देवकोष्टकांत गणपती लक्ष्मीविष्णू यांच्या मूर्ती आहेत. अर्धगोलाकार गर्भगृहात शाळुंखेसारख्या वज्रपिठावर शंकर पार्वतीच्या शुभ्र संगमरवरी जोडमूर्ती आहेत. त्यांना दररोज फुलांची सजावट करण्यात येते. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा असते. नोकरी धंद्याच्या निमित्ताने अकलूजबाहेर गेलेले येथील ग्रामस्थ यानिमित्ताने अकलूजमध्ये येतात आणि शिवपार्वतीचा आशिर्वाद घेतात

उपयुक्त माहिती

  • अकलूज बस स्थानकापासून किमी अंतरावर
  • माळशिरसपासून १३ किमी, तर सोलापूरपासून ११६ किमी अंतरावर
  • सोलापूरमधील अनेक शहरांतून अकलूजसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरांच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home