भर नदीपात्रात किमान पावणे चारशे वर्षांपासून उभे असलेले मंदिर म्हणजे वाळवा तालुक्यातील बाहे येथील मारूतीचे मंदिर. समर्थस्थापित अकरा मारूतींपैकी एक असलेले हे मंदिर एका लहान बेटावर स्थित आहे. येथे राममंदिरही आहे. या ठिकाणी श्रीरामाने शिवलिंग स्थापन केले होते. त्यामुळे त्यास रामलिंग तीर्थ असेही म्हटले जाते. सांगली जिल्ह्यातील असेच आणखी एक बेट येलूरमध्येही आहे. येथेही रामलिंग महादेवाचे मंदिर आहे. मात्र हे बेट कृष्णा नदीच्या पात्रात नसून ते एका प्रचंड मोठ्या जलाशयामध्ये तयार झालेले आहे.
पौराणिक आख्यायिकांनुसार, प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूचे अवतार होते. असे असले तरी या अवतारात ते महादेवाची पूजा करीत असत. रामेश्वर येथे श्रीरामांनी शिवलिंगाची स्थापना केली होती. वनवास काळात त्यांनी सीता व लक्ष्मण यांच्यासह ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केले, त्या ठिकाणी त्यांनी शिवलिंगाची स्थापना करून त्यांची पूजा केल्याच्या कथा आहेत. असेच एक मंदिर वाळवे परिसरातील येलूर या गावी आहे. असे सांगितले जाते की स्वतः वाल्मिकी ऋषींनी त्यांच्या शिष्यगणांसह या परिसरात वास्तव्य केले होते. याच भागातील बाहे गावातील रामलिंग मंदिराप्रमाणेच येथील शिवलिंगाची स्थापनाही श्रीरामांनी केली. त्यामुळेच या महादेवासही रामलिंग महादेव असे नाव पडले. ‘बेटावरील शिवमंदिर’ म्हणूनही ते ख्यातनाम आहे.
या मंदिराच्या बांधकामाचा नेमका काळ वा त्यामागील ऐतिहासिक तथ्ये अद्याप अज्ञात आहेत. मात्र या मंदिराची स्थापत्यशैली ही हेमाडपंती म्हणजे शुष्कसांधी शैलीतील आहे. शुष्कसांधी शैलीत दगडावर दगड रचून बांधकाम केले जाते व त्यात चुना, सीमेंट यांसारख्या गोष्टींचा वापर केला जात नाही. हे मंदिर याच प्रकारे बांधलेले आहे. ही पद्धत रामदेवराय यादव यांचा श्रीकरणाधिप (प्रधानमंत्री) हेमाडपंत ऊर्फ हेमाद्री पंडित यांच्या नावाने पुढे ओळखली जाऊ लागली. हेमाडपंत हे संत ज्ञानेश्वरांचे समकालीन आहेत. यावरून येलूर येथील या मंदिराचा काळ तेराव्या शतकानंतरचा असावा, असा अभ्यासकांचा कयास आहे.
येलूरमधील हे बेट आकाराने मोठे आहे. एवढे की त्यात येथील ग्रामस्थांची शेतेही आहेत. अशाच काही बागायती शेतांमध्ये विस्तिर्ण प्रांगणात रामलिंग महादेवाचे मंदिर वसलेले आहे. पूर्वी खासकरून पावसाळ्याच्या दिवसांत या मंदिर परिसरात जायचे म्हणजे एक दिव्य होते. परंतु अलीकडे तेथे एक लोखंडी पादचारी पूल बांधण्यात आला आहे. त्यामुळे मंदिर परिसरात जाणे सुकर झाले आहे. मंदिराच्या प्रांगणात सर्वत्र पेव्हर ब्लॉक्सची फरसबंदी करण्यात आलेली आहे. मंदिरासमोर एका दगडी चौथऱ्यावर चार स्तरीय जुनी दगडी दीपमाळ आहे. त्याच्या पुढे नंदीची पाषाणात कोरलेली मूर्ती आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपावर पत्र्याचे दोन्ही बाजूंना उतरते छत आहे. हा मंडप मूळ मंदिराच्या बांधकामानंतर बांधलेला असल्याचे दिसते. सभामंडपाचे प्रवेशद्वार दगडी व साध्या बांधणीचे आहे. त्यावर उत्तरंग भागात ओमकाराची प्रतिमा आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस भिंतीमध्ये प्राचीन वीरगळ आहेत. आत प्रवेश करताच समोर नंदीची रंगीत मूर्ती दिसते. सभामंडपाच्या उजवीकडील भिंतीत खालच्या बाजूस अष्टमातृकांचा शिल्पपट बसवलेला आहे. साधारणतः मातृकांची संख्या सात असते, असा समज आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सप्तमातृकांचा पट असतो. परंतु ‘देवीकोशा’च्या दुसऱ्या खंडानुसार, शंकराने १९० मातृकांचा मातृगण उत्पन्न केला होता. येलूर येथील मंदिरात यापैकी ब्राह्मणी, वैष्णवी, ऐंद्री, चामुंडा, माहेश्वरी, कौमारी, वाराही आणि योगेश्वरी या आठ मातृकांचा पट आहे. येथील मातृकांच्या मूर्ती बसलेल्या स्वरूपात आहेत. या मातृकांच्या पटामध्ये त्यांच्या रक्षणासाठी गणेशाची मूर्ती कोरलेली असावी, असा संकेत ‘सुप्रभेदागम तंत्र’ या ग्रंथात दिलेला आहे. त्यानुसार येथील अष्टमातृकापटातही डाव्या कोपऱ्यात गणेशाची मूर्ती कोरलेली आहे.
मंदिरातील अंतराळात कोरीव दगडी स्तंभ आहेत. त्यांच्या कोरीव कामावरून त्यांचे प्राचीनत्व लक्षात येते. येथील बाहेरच्या बाजूस असलेले स्तंभ खालच्या बाजूस चौकोनाकार आहेत. त्यांच्या शीर्षस्थानी चौकोनी कणी आणि वर तरंगहस्त आहेत. आतील खांब हे खालच्या बाजूस चौकोनाकार, तर मधल्या बाजूस अष्टकोनी व चौकोनी आहेत. अंतराळाच्या दर्शनीभिंतीवर डावीकडे गणेशाची शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती आहे. तर उजव्या बाजूस सटवाईचे स्थान आहे. येथे पादुका स्वरूपात सटवाई पूजली जाते. या ठिकाणी सात पाषाणही आहेत. ते सप्तमातृकांचे प्रतिक असल्याचे सांगण्यात येते.
गर्भगृहाचे प्रवेशद्वारही दगडातच कोरलेले आहे. या एक द्वारशाखीय प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर अर्धचौकोनी चंद्रशीला आहे. द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. उत्तरांग भागातही कोरीव नक्षीकाम आहे. गर्भगृहात मध्यभागी रामलिंग महादेवाची पिंडी आहे. अन्य मंदिरांतील शिवपिंडीपेक्षा येथील पिंडी वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती भूमीच्या पातळीच्या वर आहे. तिचे ब्रह्मभाग, विष्णूभाग आणि रुद्रभाग असे तीन भाग आहेत. पिंडीच्या खालच्या चौकोनी भागास ब्रह्मभाग म्हणतात. त्यावरचा भाग विष्णूभाग असतो आणि सर्वांत वरच्या गोलाकार उभट भागास रुद्रभाग असे म्हणतात. अनेकदा यातील ब्रह्मभाग आणि विष्णूभाग हे जमिनीत पुरलेले असतात. रामलिंग मंदिरातील शिवपिंडीत हे तिन्ही भाग भूमीच्या पातळीच्या वर आहेत. पिंडीची शाळुंका चौकोनी आहे व त्यावरील लिंगाचा रुद्रभाग हा उंच दंडगोलाकार आहे. या पिंडीवर अभिषेकपात्र टांगलेले आहे. गर्भगृहाच्या मागच्या भिंतीवर शंकराची प्रसन्नमुद्रेतील मोठी प्रतिमा लावलेली आहे.
गर्भगृहाच्या बाह्यभिंती या एकावर एक उभ्या आयताकृती शिळा ठेवून बांधलेल्या आहेत. या भिंतींचा खालचा स्तर तुलनेने कमी उंचीचा आहे. त्यावर कणीच्या दोन रांगा आहेत. मधला भाग मोठा सपाट शिळांचा आहे. सर्वांत वरच्या भागात तरंगहस्त आहेत. त्यावर छताचा कठडासदृश भाग आहे. मंदिरावर द्विस्तरीय आमलक असलेले बसके छोटे शिखर आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसणाऱ्या भूमीज शैलीतील मंदिरांप्रमाणेच हे मंदिर आहे. त्याच्या बाह्य वा अंतर्गत भिंती, तसेच स्तंभ हे अनलंकृत आहेत.
या मंदिरात दर सोमवारी, खासकरून श्रावणी सोमवारी भाविकांची मोठी गर्दी असते. येथे महाशिवरात्रीचा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. त्याच प्रमाणे मंदिरात सटवाईचे स्थान असल्याने अनेक माता नवजात अर्भकांना घेऊन येथे दर्शनासाठी येत असतात. या मंदिराची असलेली प्रचिती व येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येच्या आधारावर महाराष्ट्र सरकारनेही या मंदिराला तिर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा देऊन सन्मान केला आहे.