चौदाव्या शतकात बांधलेले सोमवार पेठेतील नागेश्वर मंदिर हे पुण्यातील सर्वांत जुन्या शिव मंदिरांपैकी एक समजले जाते. संस्कृत भाषेतील प्राचीन ग्रंथ शिवपुराणात या मंदिराचा उल्लेख आढळतो. गर्भगृहातील शिवपिंडी, भोवतालचा दगडी गाभारा व दगडांचे छत यांवरून हे मंदिर यादवकालीन असण्याला पुष्टी मिळते. गर्भगृहाबाहेरील लाकडी रचना मात्र पेशवेकालीन वास्तुशैलीचा एक भाग आहे. त्यावरून मंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार झाल्याचेही स्पष्ट होते. या परिसराला सुरुवातीला ‘नहाल पेठ’ म्हटले जायचे. त्यानंतर श्री नागेश्वरावरून ‘नागेश पेठ’ आणि तिचेच पुढे ‘सोमवार पेठ’, असे नामकरण झाले.
काही वर्षांपूर्वी मंदिराच्या आवारात पाण्याचे कुंड होते. त्याला नागतीर्थ किंवा नागेंद्रतीर्थ म्हटले जायचे. श्री नागेश्वराचे दर्शन घेऊन पुढे उत्तर प्रदेशात गंगा स्नानाला जायचे आणि परतल्यानंतर गंगेतून आणलेले पाणी कुंडात ओतायचे, अशी प्रथा होती. या कुंडातील पाण्याने स्नान केल्याने कुष्ठरोग बरा होतो, अशी श्रद्धा होती. मात्र, मंदिराच्या आवारात असलेला हा जलाशय पुणे महानगरपालिकेने काही दशकांपूर्वी सीलबंद केला. गर्भगृहाभोवती राम, विष्णू, विठ्ठल, मारुती या देवतांचीही मंदिरे आहेत. गर्भगृहाच्या चारही बाजूंना देवतांची प्रतिष्ठापना करण्याच्या या पद्धतीला देवकोष्ट म्हटले जाते.
संत नामदेव, संत तुकाराम आदी संत मंडळी नागेश्वर मंदिरात येऊन गेल्याची नोंद आढळते. संत नामदेवांच्या लिखाणातही नागेश्वर मंदिर आणि त्याच्या गाभाऱ्याचा उल्लेख आहे. ते या मंदिराला नेहमी शिवक्षेत्र म्हणून संबोधत.
संत तुकाराम महाराजांचे सासरे नागेश्वर मंदिराजवळ असलेल्या लोहेगावात राहत होते. जेव्हा महाराज लोहेगावात यायचे, तेव्हा ते मंदिरात कीर्तन करीत असत. त्यांच्या कीर्तनासाठी भाविकांची तुडुंब गर्दी व्हायची, असे म्हटले जाते.
मंदिराचा पहिला जीर्णोद्धार १७३० मध्ये करण्यात आला. त्यानंतर अनेक वेळा जीर्णोद्धार व नूतनीकरण झाले. मात्र, नूतनीकरण करताना जिप्सम आणि चुन्याने प्लास्टर करण्यात आले आहे. या मंदिराची संपूर्ण रचना लाकडात; तर गाभारा दगडी आहे. ही नागर वास्तुशैली नूतनीकरणाच्या कामांनंतरही जतन करण्यात आली आहे. मंदिराच्या आवारात दोन भव्य दीपस्तंभ आहेत. दर्शनी भागातील सभामंडप आबा शेलूकर नावाच्या सावकाराने पेशवाईच्या काळात बांधल्याची नोंद आहे. तेथील लाकडी खांब आणि भिंती यांवर सुबक कोरीव काम आहे. येथील वरच्या मजल्यावर लाकडी रेलिंग असलेली गॅलरी आहे आणि तेथे सुंदर चित्रे रेखाटलेली आहेत.
जकाते पूल आणि दारूवाला पुलादरम्यान असलेल्या या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री उत्सवाला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मंदिराची प्राचीनता आणि वास्तुशैलीतील सुबकता यांमुळे पुण्यातील मंदिरांत या स्थानाला अत्युच्च स्थान आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याने हा मंदिर परिसर संरक्षित केलेला आहे. सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत भाविकांना या मंदिरात देवदर्शन घेता येते.