मोरया गणेश

सोमाटणे-शिरपूर मार्ग, तळवडे, पुणे

जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून प्रवास करताना सोमाटणे फाट्याजवळ एका लहानशा टेकडीवर असलेली गणेशाची सात मजली इमारतीएवढी भव्य बैठी मूर्ती दुरूनच लक्ष वेधून घेते. ‘मोरया गणेश’ या नावाने ओळखले जाणारे हे देवस्थान बिर्ला उद्योग समूहाकडून उभारण्यात आले आहे.

महामार्गावरील सोमाटणे फाट्यापासून शिरगाव रस्त्यावर साधारणतः दोन कि.मी. अंतरावर हे देवस्थान आहे. पुणे व परिसरात ते ‘बिर्ला गणेश’ नावानेही प्रसिद्ध आहे. सोळा एकरावर निर्माण केलेल्या सुंदर परिसरात हा गणेश विराजमान आहे.

पायथ्यापासून गणेशाच्या दर्शनाला जाण्यासाठी १७९ पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुंदर उद्यान आहे. त्यातील रंगीबेरंगी फुलझाडे पाहत व निसर्गाचा आस्वाद घेत पायऱ्यांवरून जाताना ही चढण सुसह्य होते. पायऱ्यांवर ठिकठिकाणी भाविकांना बसण्याचीही सुविधा आहे.

गणेशाची मूर्ती तब्बल ७२ फूट उंच (सुमारे सात मजली) असून तिचे वजन एक हजार टन म्हणजेच दहा लाख किलो इतके आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने सिमेंट काँक्रिटचा वापर करून मूर्ती तयार करण्यात आली आहे. त्यावर तांब्याचा मुलामा देण्यात आल्याने मूर्तीचे सौंदर्य कित्येक पटीने खुलले आहे.

आसनावर विराजमान असलेल्या गणेशाचा एक पाय दुमडलेला आहे. दुसरा पाय आसनाखाली सोडलेला आहे. प्रसन्न मुद्रा असलेल्या या मूर्तीच्या चार हातांपैकी एका हातात पाश, दुसऱ्यात मोदक, तिसऱ्यात अंकुश, तर चौथा हात आशीर्वाद देताना आहे. गणेशाच्या पायाजवळ मोठा मूषकराज लाडूचा प्रसाद घेऊन उभा आहे. मूर्तीभोवती सुंदर प्रदक्षिणा मार्ग आहे. प्रदक्षिणा मार्गाच्या बाजूने सुंदर उद्यान आहे. पूजाविधीसाठी येथे याच गणेशाची छोटी प्रतिकृती बसविण्यात आली आहे. राजस्थानचे कारागीर मातुराम वर्मा व नरेश वर्मा यांनी ही सुंदर मूर्ती घडवली. त्यासाठी त्यांना दोन वर्षे लागली. १७ जानेवारी २००९ मध्ये चिन्मय मिशनचे प्रमुख स्वामी तेजोमयानंदजी यांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण झाले.

सायंकाळच्या सुमारास येथील विद्युत रोषणाई पाहण्यासाठी व गणेशाचे दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविक व पर्यटक येत असतात. त्यावेळी सर्व बाजूंनी मूर्तीवर रंगीत प्रकाशझोत सोडण्यात येत असल्याने मूर्तीचे सौंदर्य आणखी खुलते. या टेकडीवरून जुना मुंबई-पुणे रस्ता, देहूरोड परिसर व आजूबाजूला पाच ते सात किलोमीटरचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. पावसाळ्याच्या दिवसांत हा परिसर रमणीय भासतो. गणेशाच्या उंच मूर्तीला वाऱ्याबरोबर येणारे जाणारे ढग स्पर्श करून जातात, हे न्याहाळणे आनंददायी आहे. हिंदू पुराणानुसार नऊ ही संख्या शुभ मानली गेली आहे. त्याच शुभ अंकाचा वापर येथे अनेक ठिकाणी करण्यात आला आहे. म्हणजे मूर्तीची उंची ७२ फूट (७ + २ = ९), मूर्तीचा पाया ५४ फूट (५ + ४ = ९), पायाची उंची १८ फूट (१ + ८ = ९).

दररोज सकाळी आठ वाजता येथे आरती होते. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाच्या वेळी येथे होणाऱ्या आरतीला परिसरातील अनेक भाविक उपस्थित असतात. या मूर्तीचे दर्शन परिसरातून २४ तास होत असले तरी येथे जाऊन देवदर्शन करण्याची वेळ सकाळी ५.३० ते रात्री ८ अशी आहे.

उपयुक्त माहिती:

  • मुंबई-पुणे मार्गावरून दोन किमी अंतरावर
  • येथे येण्यासाठी एसटी तसेच पीएमपीएमएलचा पर्याय
  • खासगी वाहने देवस्थानाच्या पार्किंगपर्यंत येऊ शकतात
  • तळेगावमध्ये निवासासाठी अनेक पर्याय
Back To Home