‘प्रति भीमाशंकर’ म्हणून ख्याती असलेले चाकण येथील चक्रेश्वर मंदिर प्राचीन व जागृत देवस्थान आहे. प्रत्यक्ष तुकाराम महाराजांनी या मंदिरात अनेकदा कीर्तन केले होते. छत्रपती शिवाजी महाराजही या मंदिरात दर्शनासाठी आले होते, अशी इतिहासात नोंद आहे.
पुण्यापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या या देवस्थानाचा उल्लेख ‘लिळा चरित्र’ व ‘शिवलिलामृता’च्या पाचव्या अध्यायात आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील महाकाय शिवपिंडी. सहा फूट लांबीची ही भव्य शिवपिंडी बारा ज्योतिर्लिंग मंदिरांमध्ये असलेल्या पिंडींपेक्षाही मोठी आहे. या मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडला गेला आहे.
या मंदिराविषयी आख्यायिका अशी की, पूर्वी चाकणचे नाव ‘एकचक्र’ नगर होते. राजा दशरथाच्या काळात शांडिल्य ऋषींचा येथे आश्रम होता. अनेक धार्मिक विधी येथे होत असत; परंतु असुरांकडून त्यात विघ्न आणले जात असे. शांडिल्य ऋषींच्या विनंतीवरून राजा दशरथाने असुरांबरोबर युद्ध करून विजय मिळविला होता. हे युद्ध सुरू असताना दशरथाच्या रथाचा चाक तुटला. त्यावेळी सारथ्य करत होती दशरथाची पत्नी कैकयी. तिने ते चाक युद्ध सुरू असेपर्यंत पडू दिले नाही. युद्ध संपल्यावर ते चाक पडले म्हणून या नगरीला ‘चाकण’ असे नाव पडले. कैकयीचे हे कसब पाहून दशरथाने कैकयीला काही मागायला सांगितले. त्यावेळी तिने दोन वर मागेन, असे सांगितले होते. त्यानुसार पुढे तिने दशरथाकडे भरताला अयोध्येचे राज्य, तर रामाला वनवास मागितला होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने रामायणाला सुरुवात याच जागेवरून झाल्याचे सांगितले जाते.
मंदिराच्या प्रवेशद्वारावर गरुडध्वजावर बसलेले तुकाराम महाराजांचे देखणे शिल्प आहे. देहू येथील तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरावरही असेच शिल्प आहे. मंदिराचा परिसर मोठा आहे. सभोवतालच्या सुंदर उद्यानातील हिरवेगार गवत व फुलझाडांमुळे मंदिर परिसर सुशोभित दिसतो. चौकोनी पुष्करणीच्या बाजूलाच काहीसे उंचावर हे मंदिर आहे. पुष्करणीत उतरण्यासाठी चारही बाजूने पायऱ्या आहेत. येथूनही मंदिरात जाता येते. पूर्वी येथे दर १२ वर्षांनी गंगा अवतरत असे. त्यामुळे या पुष्करणीत स्नान केल्यानंतर त्वचारोग नाहीसे होतात, अशा श्रद्धेमुळे परिसरातील अनेक भाविक आजही येथे स्नानासाठी येत असतात.
मंदिर परिसरात शांडिल्य ऋषींचे समाधी मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, संत सावतामाळी, संत नामदेव महाराज व तुळजाभवानीचे मंदिर आहे. येथे खोदकामात सापडलेले वराह, नंदी, कासव, नगारखाना यांची चांगल्या पद्धतीने जपणूक केलेली आहे.
संपूर्ण दगडी चौथऱ्यावर असलेले मंदिर प्रशस्त आहे. लाकडी व दगडी बांधकाम असलेल्या सभामंडपात गाभाऱ्यासमोर संगमरवरी नंदी आहे. गाभाऱ्यात जाण्यासाठी येथे काही नियम आहेत. त्यानुसार कमरेचा पट्टा व पायातील मोजे काढूनच प्रवेश करावा लागतो. गर्भगृहात भलीमोठी शिवपिंडी आहे. गाभाऱ्यात ओम नमःशिवायचा उच्चार केल्यावर त्याचा नाद संपूर्ण मंदिरात घुमत असतो.
महाशिवरात्री हा येथील मोठा उत्सव. सात दिवस चालणाऱ्या या उत्सवात हजारो भाविक सहभागी होतात. याशिवाय श्रावणी सोमवारीही भाविकांच्या गर्दीने हा परिसर भरून जातो. कार्तिकी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा होतो. मंदिरात पहाटे ५.४५ व सायंकाळी ७.३० वाजता महाआरती होते. भाविकांसाठी देवदर्शनाची वेळ सकाळी ५.४५ ते रात्री ९ अशी आहे. दुपारी २ ते ४ या वेळेत गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येत नाही. सोमवारी व विशेष उत्सवाच्यावेळी मंदिरातील दर्शनाची वेळ सकाळी ५ ते रात्री १० अशी असते.