बनेश्वर मंदिर

नसरापूर, ता. भोर, जि. पुणे

पुणे शहरापासून ३६ कि.मी. अंतरावर नसरापूर हे ऐतिहासिक गाव आहे. शिवगंगा नदीच्या काठावर वसलेल्या या गावात प्राचीन बनेश्वर मंदिर आहे. मोठमोठ्या वृक्षांच्या गर्दीत म्हणजेच बनात असणारा म्हणून ‘बनेश्वर’ असे या तीर्थक्षेत्राचे नामाभिधान झाले असावे, असे सांगितले जाते. नानासाहेब पेशव्यांनी १७४९ मध्ये हे मंदिर बांधले. त्यासाठी ११ हजार ४२६ रुपये खर्च झाल्याची नोंद आहे.

उंचच उंच वृक्षांमधून जाणारा रस्ता आणि कानावर पडणारी विविध पक्ष्यांची किलबिल यामुळे मंदिरापर्यंत जाताना आल्हाददायक अनुभव येतो. मंदिराच्या प्रवेशद्वारावर साडेपाच फूट उंचीचा त्रिशूळ उभारण्यात आला आहे. चिरेबंदी दगडाच्या कमानीतून खाली उतरल्यावर मंदिरासमोर दोन सुंदर पुष्करणी म्हणजेच पाण्याची कुंडे दिसतात. त्यातील रंगीबेरंगी मासे व कासवे पाहण्यासाठी भाविक तेथे काही क्षण थबकतातच. यामध्ये दुर्मिळ असे सोनेरी व पांढऱ्या शुभ्र रंगाचे मासे पाहता येतात. या दोन्ही कुंडांतील माशांच्या खाद्यासाठी संस्थान काळात निधी दिला जात असे, अशा नोंदी आहेत.

बनेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील जलव्यवस्थापन. येथील जलस्रोतांचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. मंदिराचा मुख्य गाभारा आणि सभागृहाला लागून मंदिराच्या बाहेरील बाजूला पाण्यासाठी मार्गिका आहेत. विशेष म्हणजे या मार्गिकांचा आकार मृत्युंजय यंत्रासारखा आहे.

मुख्य मंदिरासमोरील दोन आणि डावीकडील एक, असे तीन कुंड (पुष्करणी) या मार्गिकांनी एकमेकांशी जोडण्यात आले आहेत. प्रत्येक कुंडाला दोन छिद्र आहेत. त्यापैकी खालचे छिद्र लहान आणि वरचे काहीसे मोठे आहे. पहिल्या कुंडातील पाणी दुसऱ्या कुंडात आणि त्यातून तिसऱ्या कुंडात जाते. तिसऱ्या कुंडातील अतिरिक्त पाणी परस्पर मंदिराबाहेर सोडले जाते. या व्यवस्थेमुळे तिन्ही कुंडांमध्ये पाण्याची पातळी समान राहते. मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर उजव्या बाजूला गायमुख आहे. ते जमिनीच्या पातळीखाली आहे. त्याच्या शेजारीच चौथे कुंड आहे. या कुंडातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर ते अंतर्गत वाहिनीद्वारे गाभाऱ्यातील शंकराच्या पिंडीवर पडते, जलस्रोतांच्या या अद्वितीय व्यवस्थापनामुळे या मंदिराला ‘जलमंदिर’ असेही म्हटले जाते. हे जलव्यवस्थापन जाणून घेण्यासाठी अनेक अभ्यासक आवर्जून येथे येतात.

कुंडांशेजारीच नंदीमंडप असून तो संपूर्णतः दगडात उभारला आहे. तो चार खांबांवर स्थित आहे. यातील नंदी खूपच देखणा आहे. नंदीमंडपासमोरच पूर्वाभिमुख बनेश्वर मंदिर आहे. बाहेरून पाहताच मंदिराची स्थापत्य रचना नजरेत भरते. संपूर्ण मंदिर सोळा दगडी खांबांवर उभे आहे. त्यातील बारा खांब हे दगडी भिंतीत, तर चार खांब समोरील बाजूस आहेत. या बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या सभागृहात एकही खांब नाही. सभागृहातील भिंतींनीच कळस तोलून धरले आहे. समोरील खांबांना गोलाकार आणि चौकोनी असा आकार दिलेला आहे. या खांबांवर कमळपत्राचे नक्षीकाम दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच १६८३ हे वर्ष व क्रॉसचे चिन्ह कोरलेली भलीमोठी घंटा आहे. ती पोर्तुगीज बनावटीची असावी, असे सांगितले जाते.

सभामंडपात गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळील दोन कोनाड्यांत गणपती व मारुतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्यात विष्णू-लक्ष्मीच्या मूर्ती आहेत, त्यासोबतच येथे प्रतिकात्मक शिवपिंडी आहे. ही पिंडी वर उचलल्यास त्याखाली साधारणतः दोन फूट खोल असा खळगा आहे. त्यामध्ये पाच उंचवटे आहेत. ती पाच शिवलिंग असल्याचे सांगितले जाते. या खळग्यामध्ये सतत पाणी भरलेले असते. हे पाणी पिंडीखालून प्रदक्षिणा मार्ग व मंदिरासमोरील कुंडांमध्ये चक्राकार पद्धतीने फिरत असते.

मुख्य मंदिरासमोरील बाजूस गणपती व मारुतीचे मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस करंजाई देवीचा डोह आहे. महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवार व त्रिपुरारी पौर्णिमा येथे उत्साहात साजरी होते. भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर सकाळी सहा ते सायंकाळी सातपर्यंत खुले असते. मंदिर परिसराला लागूनच बनेश्वर वन उद्यान आहे. अनेक प्रकारचे वृक्ष, फुलझाडे, विविध पक्षी व प्राणी यांचे ते आश्रयस्थान आहे.

उपयुक्त माहिती

  • भोरपासून २८ किमी, तर पुण्यापासून ३३ किमी अंतरावर
  • पुणे-सातारा महामार्गापासून दोन किमी अंतरावर
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home