त्रिशुंड गणपती मंदिर

सोमवार पेठ, पुणे

पुण्यातील सोमवार पेठेतील श्री त्रिशुंड गणेश मंदिराची रचना वेरूळच्या लेण्यांसारखी आकर्षक आहे. पेशव्यांच्या राजवटीत १७५४ ते १७७० यादरम्यान श्रीमंत गोसावी महाराजांनी हे मंदिर बांधले, असे सांगितले जाते.

मंदिरातील गर्भगृहाच्या चौकटीवर संस्कृत व फारसी भाषांमध्ये तीन शिलालेख आहेत. विशेष बाब म्हणजे अजूनही ते सुस्थितीत आहेत. संस्कृतमधील पहिल्या शिलालेखात मंदिराच्या बांधकामाचा काळ आणि दुसऱ्यात भगवद्‌गीतेतील आरंभीचा नमनाचा श्लोक कोरलेला आहे. फारसी शिलालेखात हे स्थान दत्तगुरूंचे असल्याचे म्हटले आहे. येथील वास्तुशैलीत राजस्थानी, माळवा व दाक्षिणात्य अशा तिन्ही शैलींचा सुंदर मिलाफ आढळतो.

पाच ते सहा फूट उंचीच्या दगडी जोत्यावर उभे असलेले हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल कोरलेले आहेत. तेथे धारदार कमानीवर शेषशायी विष्णूची प्रतिमा आहे. येथील भिंतींवर यक्ष, किन्नर, मोर, पोपट, भैरव, मंगल कलश, दशावतार कोरलेले दिसतात.

गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर उजव्या सोंडेच्या गणेशाचे दर्शन‌ होते. त्याखाली गणेशचक्र आहे. गर्भगृहातील गणेशमूर्ती अतिशय वेगळी आहे. एक मुख, तीन सोंडी व सहा हात असलेली ही मूर्ती मोरावर आरूढ आहे. उजवीकडील सोंड मोदकपात्रास स्पर्श करते, मधली सोंड पाटावर उंदराजवळ रूळली आहे, तर डावी सोंड मांडीवर बसलेल्या शक्ती देवतेच्या हनुवटीला स्पर्श करताना दिसते. मूर्तीच्या मागील भिंतीवर शेषशायी विष्णूची प्रतिमा आणि गणेशयंत्र कोरलेले आहे. मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा निश्चित काळ सापडत नाही.

प्रदक्षिणेच्या वाटेवर दक्षिणेकडील भिंतीत दगडांत नटराज कोरलेला आणि तेथील भिंतीत शिवलिंगदेखील आहे.‌ फक्त शाळुंका असलेल्या शिवलिंगाच्या या प्रतिमेच्या वर आकाशाच्या दिशेने उडणारा हंस, खाली मुसंडी मारणारा वराह व शिवलिंगावर छत्र धरलेला नाग दिसतो. ही शिवलिंगाची दुर्मीळ प्रतिमा असल्याचे म्हटले जाते. उत्तरेकडील बाजूस विष्णू आणि काळभैरवाच्या सुंदर मूर्ती आहेत.

मंदिराला तळघर आहे आणि तिथे जिवंत पाण्याचा झरा आहे. या तळघरातच मोरया गोसावी महाराजांची समाधी आहे. या मंदिराची स्थापत्यरचना अशी आहे की, वर गणपतीच्या मूर्तीला अभिषेक केल्यानंतर ते पाणी खाली तळघरात असलेल्या गोसावी महाराजांच्या समाधीवर पडते. त्याशिवाय या तळघराला अनेक दालने आहेत आणि त्यांचा वापर साधनेसाठी होत असावा, असे सांगण्यात येते. दरवर्षी गुरुपौर्णिमेला या तळघराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात येतात.

मंदिरात तत्कालीन राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी प्रतिमाही कोरलेली आहे. ब्रिटिशांनी बंगाल व आसामवर सत्ता प्रस्थापित केली. त्याची प्रतीकात्मक मांडणी या प्रतिमेत आहे. त्यामध्ये एक इंग्रज शिपाई बंगाल व आसामचे प्रतीक असणाऱ्या गेंड्याला साखळदंडाने बांधताना दिसतो आहे. याशिवाय तेथे एकशिंगी गेंडाही कोरण्यात आला आहे.

अभ्यासकांच्या मते- या मंदिराची रचना शिव मंदिराप्रमाणे आहे. येथील एका शिलालेखामध्ये हे रामेश्वर शिव मंदिर असल्याचा उल्लेख आहे; तसेच गाभाऱ्याच्या मागील बाजूस असणाऱ्या शिवलिंगाच्या प्रतिमेमुळेही त्याची खात्री पटते. मात्र, कालांतराने शाक्त पंथीयांनी येथे गणेशाची स्थापना केलेली असावी, असे मत अभ्यासकांकडून व्यक्त होते. कोरीव काम आणि शिल्पकलेच्या दृष्टीने हे मंदिर अतिशय महत्त्वाचे वारसास्थळ आहे. भाविकांना येथे सकाळी ६ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत देवदर्शन करता येते.

उपयुक्त माहिती

  • वेरूळच्या लेण्यांप्रमाणे मंदिराची रचना
  • पुण्यातील अनेक भागांतून पीएमपीएमएलची बस सेवा
  • खासगी वाहनांनी मंदिरापर्यंत येण्यासाठी व्यवस्था
  • निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
Back To Home