सुमारे २०० वर्षांपूर्वी भगवान स्वामीनारायण महाराजांनी गुजरातमध्ये स्वामीनारायण भक्त संप्रदायाला सुरुवात केली. संप्रदायाच्या गुरू-शिष्य परंपरेतील तिसरे गुरू ब्रह्मस्वरूप शास्त्रीजी महाराज यांनी गुजरातमधीलच बोचासन शहरात या संप्रदायाची पुनर्स्थापना केली. त्यामुळेच या संप्रदायाला नंतरच्या काळात बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था अर्थात ‘बीएपीएस’ असे संबोधले गेले.
मागील १०० वर्षांत या संप्रदायाचा जगभर प्रसार झाला. सध्या जगभरात या संप्रदायाचे ५५ हजार स्वयंसेवक आहेत; तर १० लाखांच्या आसपास भक्तगण आहेत. ‘बीएपीएस’ने आतापर्यंत जगभरात विविध ठिकाणी स्वामीनारायण मंदिरे उभारली आहेत. या संप्रदायाने नेहमी हिंदू तत्त्वज्ञानावर आधारलेला नि:स्वार्थी सेवेचा विचार मांडला. नि:स्वार्थी वैयक्तिक प्रगतीतून निकोप समाजनिर्माणाची दृष्टी देणारा सिद्धांत हा संप्रदाय सांगतो. सत्य-शिव-सुंदराची प्रतिमा मनोपटलावर उभी करणारी स्वामीनारायण मंदिरेही त्याच निकोप दृष्टीचा दाखला देतात.
२०१७ साली पुण्यातील आंबेगाव डोंगराच्या पायथ्याशी नऱ्हे येथे ‘बीएपीएस’ने हे भव्य मंदिर उभारले. मंदिराच्या उभारणीत मातकट लाल रंगाच्या दगडांचा वापर केलेला आहे. प्राचीन वास्तुकलेवर आधारलेल्या या मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. येथील प्रत्येक भिंत व खांबांवरील कोरीव कामांवर नजर खिळून राहते. मंदिर परिसरात प्रवेश करताच आध्यात्मिक संगीताचे सुमधुर सूर कानावर पडतात. मंदिराचे बांधकाम दिल्लीतील प्रसिद्ध श्री अक्षरधाम मंदिराच्या धर्तीवर करण्यात आले आहे. परिसरातील सुंदर उद्यानांमधील कारंजांमुळे मंदिराचे रूप खुलून दिसते.
मंदिरसंकुलातील अन्य मंदिरांमध्ये इष्टगुरू आणि इष्टदेवांचे स्मरण, प्रार्थना व पूजा करता येते. मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात श्री स्वामीनारायण व अक्षरब्राह्मण गुणतीतानंद स्वामी यांच्या मूर्तीं आहेत. त्या जोडीला हरिकृष्ण महाराज, राधाकृष्ण, ब्रह्मस्वरूप भगतजी महाराज, ब्रह्मस्वरूप शास्त्रीजी महाराज, ब्रह्मस्वरूप योगीजी महाराज, ब्रह्मस्वरूप प्रमुख स्वामी महाराज यांच्या मूर्ती आहेत.
मंदिरसंकुलात श्री बालाजी, विठ्ठल-रुक्मिणी, शंकर-पार्वती, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांची मंदिरे आहेत. आध्यात्मिक आनंदाबरोबरच सुशोभित वास्तुरचनेचा आनंद मिळत असल्याने सहकुटुंब फिरायला येण्यासाठी पुण्यातील हे स्थान एक आकर्षण ठरते आहे.
या मंदिरात दररोज पाच वेळा आरती होते. त्यामध्ये सकाळी ६ वाजता मंगल आरती, सकाळी ७.३० वाजता शृंगार आरती, सकाळी ११.१५ वाजता राजभोग आरती, सायंकाळी ७ वाजता संध्या आरती व रात्री ८.३० वाजता शयन आरती होते. भाविकांना सकाळी ७.३० ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत मंदिरात जाऊन दर्शन घेता येते.