रायरेश्वर मंदिर

 रायरेश्वर पठार, ता. भोर, जि. पुणे

वयाच्या सोळाव्या वर्षी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून शिवरायांनी बारा मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ते ऐतिहासिक ठिकाण म्हणजे रोहिरेश्वर अर्थात रायरेश्वर महादेवाचे मंदिर. शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक व भाविकांना अतिशय प्रिय असणारे हे प्राचीन मंदिर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात रायरेश्वर पठारावर स्थित आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शके १५६७, वैशाख शुद्ध एक या तिथीच्या पत्रात या मंदिरासंदर्भात उल्लेख आहे, तो पुढीलप्रमाणे –
‘श्री रोहिरेश्वर तुमचे खोरीयातील आदि कुलदेव तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्रीलगत स्वयंभू आहे. त्याणी आम्हास यश दिल्हे व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे. राजश्री दादापंताचे विद्यमाने बावाचे व तुमचे व आमचे श्रीपासी इमान झाले ते कायम वज्रपाय आहे. हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे… बहुत काय लिहिणे।।’

भोर शहरापासून ३० किमी अंतरावर असलेला रायरेश्वर पठार समुद्रसपाटीपासून १४३३ मीटर उंचीवर आहे. तेथे जाण्यासाठी पायथ्यापासून पायऱ्या आहेत. काही ठिकाणी लोखंडी शिड्या आहेत. या शिड्यांवरून पठारावर आल्यानंतर मंदिरापर्यंत जाण्यासाठी पेव्हरब्लॉकचा वापर करून पायवाट बनविली आहे. पायथ्यापासून मंदिरापर्यंत पोचण्यासाठी ३० मिनिटे लागतात.

हा संपूर्ण पठार साडेअकरा किलोमीटर लांब व सव्वा किलोमीटर रुंद आहे. निसर्गाची सारी रूपे रायरेश्वर पठाराने आपल्या कवेत घेतली आहेत. पावसाळ्यात कौला (स्थानिक नाव) म्हणजेच स्मिथियाच्या पिवळ्या फुलांनी हे संपूर्ण पठार भरून जाते. निसर्गाची मुक्तहस्त उधळण असलेल्या या पठारावर पावसाळ्याच्या दिवसात शेकडो पर्यटक येत असतात.

पठारावरील गोमुखी तलावाजवळून वरच्या बाजुला येताच रायरेश्वराचे प्राचीन मंदिर दिसते. दगडी बांधकामातील या मंदिराच्या चारही बाजुने तटबंदी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. या चौथऱ्याला लागूनच चुन्याच्या घाण्याचे चाक आहे. मंदिराजवळ नैसर्गिक व स्वच्छ बारमाही वाहणारा झरा आहे. येथील स्थानिक व पर्यटक याच पाण्याचा पिण्यासाठी वापर करतात.

मंदिर पूर्वाभिमुखी असून ओसरी, सभामंडप आणि गर्भगृह असे त्याचे स्वरुप आहे. मंदिराच्या ओसरीत दोन नंदी आहेत. गर्भगृह साधारणतः दोन फूट खाली असून तेथे रायरेश्वराचे स्वयंभू शिवलिंग आहे. शिवलिंगासमोरील भिंतीवर शिवराय सवंगड्यांसोबत रायरेश्वराची शपथ घेतानाचे मोठे छायाचित्र आहे. तर डावीकडील भींतीवर ढाल आणि दोन तलवारी लावलेल्या पाहायला मिळतात. सभागृहातील भिंतीवर दोन शिलालेख आहेत, त्यातील एकाची झीज झाल्याने अक्षरांचा बोध होत नाही. दुसऱ्या शिलालेखात मंदिराच्या जिर्णोद्धारासंबंधीचा तपशील आहे. त्यामध्ये दापघर गावच्या पाटलांनी २०० वर्षांपूर्वीच्या या मंदिराचा शके १८०५ मध्ये ७०० रुपये खर्चून जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे.

मंदिरात दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराज्यभिषेक दिन सोहळा उत्साहात पार पडतो. त्यात परिसरातील अनेक भाविक व राज्यभरातून येणारे शिवप्रेमी सहभागी होतात. गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या पंचमीला येथे रायरेश्वराची यात्रा भरते, तर सप्तमीला शपथदिन साजरा होतो. यावेळी शिवाजी महाराजांची मिरवणूक व रुद्राभिषेक केला जातो. या शिवाय अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मंदिर परिसरात भाविकांसाठी धर्मशाळा आहे.

मंदिर परिसरात पूर्वकल्पना दिल्यास स्थानिकांकडे राहण्याची तसेच न्याहरीची व्यवस्था होऊ शकते. पठारावरील काही ग्रामस्थ भाविक व पर्यटकांसाठी तंबुची अथवा त्यांच्या घरात राहण्याची सोय करतात.

उपयुक्त माहिती

  • भोर शहरापासून ३० किमी अंतरावर
  • पायथ्यापासून मंदिरापर्यंत ३० मिनिटे पायी अंतर
  • खासगी वाहने पठाराच्या पायथ्यापर्यंत जाऊ शकतात
  • न्याहरी व होम स्टेसाठी संपर्क : शंकर जंगम, मो. ९६८९६८८४९७
  • स्थानिकांकडे निवास व न्याहरीची व्यवस्था होऊ शकते
Back To Home