ॐकारेश्वर मंदिर

शनिवार पेठ, पुणे

ॐकारेश्वर मंदिर हे पुण्यातील सर्वांत जुने शिव मंदिर समजले जाते. शनिवार पेठेत मुठा नदीच्या काठावर ते आहे. अठराव्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सदाशिवभाऊ पेशवा अर्थात चिमाजी आप्पा यांच्या कारकिर्दीत पेशव्यांचे आध्यात्मिक गुरू कृष्णाजी पंत चित्राव यांनी शिवराम भट यांच्याकडून हे मंदिर बांधून घेतले, अशी नोंद आहे. या मंदिरातून मुठा नदीत उतरणारा घाटही येथे बांधण्यात आला.

या मंदिराचे संपूर्ण बांधकाम अनन्यसाधारण असे आहे. मऊ स्फटिकरूपी दगडांपासून बनवलेले घुमट पांढरे चकचकीत दिसतात. मंदिराबाहेरील भागाबरोबरच छतालाही कोरीव नक्षीकाम आहे. या शिल्पकलेमुळे ही वास्तू दुर्मीळ ऐतिहासिक ठेवा ठरते आहे. या वास्तूची मजबुती १९६२ च्या पानशेत धरणफुटीच्या वेळी सिद्ध झाली. पुराचे पाणी घुसल्याने पुण्यातील अनेक घरे वाहून गेली; पण पाण्याखाली जाऊनही हे मंदिर मात्र जसेच्या तसे होते. अडीचशे वर्षांच्या या वास्तूची लोकप्रियता खऱ्या अर्थाने या चमत्कारानंतरच वाढली.

मंदिराच्या गर्भगृहाच्या चारही बाजूंना व्हरांडा आहे आणि त्यात दगडाचे खांब आहेत. हे खांब सुबक गोल, चौकोनी आकारात कोरलेले आहेत. मंदिरात काळ्या दगडांत कोरलेले सुंदर शिवलिंग आहे. शिवलिंगाचे शाळुंका आणि बाण असे दोन भाग असतात. येथे हे दोन्ही भाग आहेत आणि त्यापैकी बाणाची दगडात कोरलेली मूर्ती १७३८ मध्ये नर्मदा नदीतून आणली गेली होती आणि त्यासाठी ७०० रुपये खर्च झाला होता, अशी पेशवेदफ्तरी नोंद आढळते. मंदिरात नंदीच्या सुबक मूर्तीचेही दर्शन होते. या मंदिराच्या शिखराचा भाग नागर वास्तुशैलीचा नमुना आहे आणि तो पाच वेगवेगळ्या स्तरांत कोरलेला आहे. प्रत्येक स्तरामध्ये देव-देवतांच्या प्रतिकृतींचे कोरीव काम आहे. परिसरात मुख्य मंदिराबरोबरच शनिदेव, हनुमान, विष्णू, गणपती व दुर्गा देवीचे मंदिर आहे.

मंदिरात नगारखाना आहे. तेथील नगारा दर शनिवारी संध्याकाळी ७.३० वाजता वाजविण्यात येतो. काळ्या दगडांच्या भिंतीमुळे मंदिरातील वातावरण उन्हाळ्यात थंड; तर हिवाळ्यात उबदार राहते.

१९७१ पर्यंत या मंदिर परिसरात हिंदू स्मशानभूमीदेखील होती. त्यानंतर येथे फक्त अंतिम कार्ये करण्यात येतात. असे म्हटले जाते की, चिमाजी आप्पा हे या मंदिराच्या कामासाठी सलग सहा वर्षे दरमहा एक हजार रुपये खर्च पाठवत होते. एवढा मोठा खर्च त्यावेळी या मंदिराच्या उभारणीसाठी झाला होता. जिवंत असेपर्यंत चिमाजी आप्पा दरवर्षी या मंदिराला भेट देत होते. मृत्यूनंतर त्यांची समाधीही याच मंदिर परिसरात बांधण्यात आली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी अन्नपूर्णा याही येथेच सती गेल्या, असे म्हटले जाते. त्यांच्याप्रमाणेच काळूबुवा महाराज, केशवराव महाराज देशमुख, नाना महाराज साखरे यांच्या समाधीही येथे आहेत.

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात हे मंदिर भाविकांप्रमाणेच स्वातंत्र्यसैनिकांसाठीही महत्त्वाचे केंद्र होते. स्वातंत्र्यलढ्यातील योजना आखण्यासाठी लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी अनेक दिग्गज इतर स्वातंत्र्यसैनिकांसह येथे नियमितपणे जमत असत. मंदिरातील त्या ठिकाणाला तालीम, असे म्हटले जात असे. १९०६ मध्ये परदेशी वस्तूंचे दहन करून, त्यावर बहिष्कार टाकण्याच्या आंदोलनाची अंमलबजावणीही पहिल्यांदा याच तालमीत झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. परंपरेप्रमाणे आजही येथे महाशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा, श्रावणी सोमवारसारखे उत्सव शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. यावेळी होणाऱ्या भजन, कीर्तन आणि इतर धार्मिक कार्यक्रमांना मोठी गर्दी होते.

या मंदिरात प्रवेश करताना काही नियम व निर्बंध आहेत. पुरुषांनी धोतर-सदरा आणि महिलांनी साडी, ब्लाऊज वा ओढणीसह पंजाबी, अशी वस्त्रे परिधान करणे बंधनकारक आहे. तोकड्या कपड्यांना येथे परवानगी नाही. भाविकांसाठी देवदर्शनाची वेळ सकाळी ७ ते रात्री ८.३० अशी आहे.

उपयुक्त माहिती

  •  शनिवारवाड्यापासून पायी १० मिनिटांवर
  • शिवाजी नगरपासून दोन किमी अंतर
  • पुण्यातील अनेक भागांतून पीएमपीएमएलची बस सेवा
  • खासगी वाहनांनी मंदिर परिसरात येण्यासाठी व्यवस्था
  • निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
Back To Home