नागेश्वर मंदिर

आंबवडे, ता. भोर, जि. पुणे

शिवकाळापूर्वीपासून प्रसिद्ध असलेल्या भोर तालुक्यातील निसर्गसमृद्ध आंबवडे गावात प्राचीन व सुंदर नागेश्वर मंदिर आहे. धवलगंगा ओढ्याच्या काठावरील हे मंदिर काहीसे खोलगट भागात आहे. तेथे जाण्यासाठी उतरत्या पायरी मार्गाने जावे लागते. सरदार कान्होजी जेधे यांचे कुलदैवत असलेले हे मंदिर वृक्षवल्लींच्या सहवासात स्थित आहे.

आपल्याकडील शंकराची मंदिरे ही साधारणतः पूर्वाभिमुख असतात. मात्र, नागेश्वराचे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. सुमारे २००० वर्षांपूर्वी नाग जमातीच्या लोकांनी ते बांधले असावे, असे सांगितले जाते. १७६७ मध्ये श्रीमंत सदाशिव चिमणाजी पंतसचिव यांनी, तर १८८९ मध्ये शंकरराव चिमणाजी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याच्या नोंदी आहेत.

मंदिराच्या सभोवती तटबंदी आहे. शिवाय मोठा सभामंडप, पाण्याची कुंडे व ओवऱ्या आहेत. याशिवाय भक्तांना राहण्यासाठी धर्मशाळा आहे. या धर्मशाळेची दुरुस्ती १८८९ मध्ये शंकरराव चिमणाजी यांच्या कार्यकाळात झाली आहे. घडीव दगडात बांधलेले मंदिर, दगडी उंच जोत्यावर उभे आहे. दगडी भिंतीवर बाहेरच्या बाजूने प्राणी व पक्ष्यांच्या आकृत्या, तसेच कमळे कोरलेली दिसतात.

प्रवेशद्वाराजवळच भव्य नंदी आहे. सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपात असलेल्या सहा मोठमोठ्या दगडी खांबांवर नागाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. गाभाऱ्यात शिवपिंडी व भिंतीवरील एका कोनाड्यात सूर्यनारायणाची मूर्ती आहे. याशिवाय येथे आदिमायेच्या दोन मूर्तीही आहेत.

मंदिराच्या शेजारीच पवित्र पंचगंगेचे तीर्थस्थान आहे. मंदिराच्या मागील बाजूने डोंगरातून येणारे पाण्याचे पाच प्रवाह एकत्र करून दगडी गायमुखातून ते पाणी येथील कुंडात सोडले जाते. या कुंडाच्या मधोमध असलेल्या दगडी खांबावर हत्ती कोरला आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे हा प्रवाह वर्षभर कधीही आटत नाही किंवा त्याचे प्रमाणही कमी-जास्त होत नाही. या पाण्याला ‘पंचमुखी पाणी’ असेही म्हणतात. मंदिराच्या मागच्या बाजूस दगडी दीपमाळ आहे. याशिवाय परिसरात अनेक जुन्या देवीदेवतांच्या आखीव-रेखीव मूर्ती आहेत.

या परिसरात मंदिराविषयी काही ओळी लिहिलेल्या आढळतात,
सत्य शोधिशी रामेश्वर, सत्य शोधिशी नागेश्वरा।
रायरेश्वराच्या पायथ्याशी आहे, आमचा गाव नागनाथाचे आंबवडे।।

महाशिवरात्रीला नागेश्वर मंदिरात मोठा उत्सव साजरा होतो. यावेळी तालुक्यातील अनेक भाविक येथे दर्शनाला येतात. याशिवाय श्रावणी सोमवारी भाविकांची गर्दी असते. मंदिर परिसरात लग्नकार्य, तसेच इतर धार्मिक विधीही होतात.

उपयुक्त माहिती

  • भोरपासून आंबवडे गाव १५ किलोमीटर अंतरावर
  • भोरपासून एसटी तसेच रिक्षाची सुविधा
  • मंदिर परिसरात खासगी वाहने जाण्याची सुविधा
  • मंदिरात भाविकांसाठी धर्मशाळेची सुविधा
Back To Home