पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव येथे भीमा नदीच्या पात्रातील नारायण बेट हे दत्त संप्रदायातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र व शक्तिपीठ मानले जाते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सद्गुरू नारायण महाराज यांनी या स्थानाची निर्मिती केली. येथील मुख्य मंदिरात श्री दत्तात्रेयांची साडेतीन किलो वजनाची हिरेजडित सुवर्णमूर्ती येथील मुख्य आकर्षण आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंत्तीच्या आधी येणाऱ्या गुरुवारी ही मूर्ती भक्तांच्या दर्शनास उपलब्ध असते. त्यावेळी श्रीदत्तांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची या नारायण बेटावर उपस्थिती असते. नारायण महाराजांच्या वास्तव्यामुळे पावन झालेले हे ठिकाण लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
सद्गुरू नारायण महाराज यांचा जन्म १८८५ मध्ये कर्नाटक राज्यातील बागलकोट येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे बालपण अत्यंत संघर्षात गेले. वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी पित्याचे आणि पाचव्या वर्षी मातृछत्र हरपल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. लहानपणापासूनच त्यांना ईश्वरी भक्तीची ओढ लागली. ते घराजवळील व्यंकटेश मंदिरात तासनतास ध्यानस्थ बसत असत.
वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. भ्रमंती करत असताना १९०० ते १९०१च्या काळात त्यांचे गाणगापूर येथे वास्तव्य होते. गाणगापूरच्या पवित्र भूमीत त्यांना प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांनी दर्शन देऊन दीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी लोककल्याणासाठी स्वतःला वाहून घेतले. १९०२ ते १९०४ या काळात त्यांनी आर्वी व सुपे या भागात वास्तव्य केले आणि अखेर १९०५ मध्ये त्यांचे दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात आगमन झाले. त्यावेळी हे ठिकाण अत्यंत दुर्गम आणि हिंस्र प्राण्यांच्या वावराने भरलेले होते. महाराजांनी आपल्या गुरूंच्या म्हणजे श्रीदत्ताच्या मंदिरासाठी एका शांत जागेचा शोध सुरू केला. त्यांना चारही बाजूंनी ओढा असलेली ही बेटासारखी जागा विशेष आवडली. त्यांनी ही जमीन खरेदी केली आणि १९१३ मध्ये येथे दत्त मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. पाहता पाहता या उजाड जागेचे रूपांतर एका सुंदर ‘नारायण बेटा’त झाले. याच काळात वसनजी शेट दासानी यांनी मंदिरासाठी मौल्यवान अशी सुवर्णमूर्ती अर्पण केली. पुढे हे स्थान संपूर्ण देशात दत्त भक्तीचे एक प्रमुख केंद्र म्हणून नावारूपाला आले.
मंदिरात स्थापित श्रीदत्ताच्या सुवर्णमूर्तीसमोर महाराजांनी १९३० मध्ये पहिले अतिरुद्र अनुष्ठान केले होते.
त्याच वर्षी श्री सत्यनारायणाच्या १०८ पूजांचा सोहळा झाला. १९३३ मध्ये या ठिकाणी महाराजांनी एकाच वेळी ११०८ सत्यनारायण महापूजांचा सोहळा पार पाडला. याशिवाय १९३६ मधील मार्च महिन्यात एका आठवड्यात दर तासाला १०८ अशा अहोरात्र सत्यनारायण पूजा झाल्या. त्यानंतर १९३७ मध्ये महाराज तीर्थयात्रेसाठी निघून गेले. ते पुन्हा १९४३ मध्ये बेटावर आले. १९४४ मध्ये महाराजांनी या बेटावर महामृत्युंजय अनुष्ठान केले. १९४५ साली त्यांनी नारायण बेट सोडले व ते बंगळुरूला गेले, ते परत नारायण बेटावर आलेच नाहीत. तेथेच श्रावण वद्य द्वादशी, ३ सप्टेंबर १९४५ या दिवशी अतिरुद्र स्वाहाकार अनुष्ठान झाले व सायंकाळी ५ वाजता सद्गुरू नारायण महाराज दत्तचरणी विलीन झाले. तेथून त्यांच्या अस्थी आणून नारायण बेटातील महाराजांच्या समाधी स्थानावर ठेवण्यात आल्या.
नारायण बेटाशी अनेक प्राचीन पौराणिक संदर्भ आणि आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत. एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार, महाराज जेव्हा पहिल्यांदा या जागी आले, तेव्हा त्यांनी दोन पिंगळा पक्षांचा संवाद ऐकला होता. ते पक्षी या भूमीला श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेले क्षेत्र मानत होते. वनवासात असताना श्रीरामांनी येथे काही काळ मुक्काम केल्याचा उल्लेख त्यांच्या संवादात आला होता. ही भूमी भविष्यात हजारो लोकांना अन्न व आध्यात्मिक शांती देणारी ठरेल, असा संकेत मिळाल्यावर महाराजांनी येथे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. एकदा महाराज नदीकाठी एका मोठ्या शिळेवर ध्यान करत असताना अचानक नदीला मोठा पूर आला आणि पाण्याची पातळी वेगाने वाढू लागली. परंतु पुराचे पाणी महाराजांना स्पर्श न करता त्या शिळेच्या बाजूने वळून निघून गेले. हे दृश्य पाहून उपस्थित भक्तांना महाराजांच्या तपोबलाची प्रचिती आली. त्याचप्रमाणे महाराजांच्या वास्तव्यकाळात येथे एक वाघ नियमितपणे येत असे आणि तो त्यांना वंदन करून निघून जात असे. भाविकांची अशी दृढ श्रद्धा आहे की या बेटावर पाय ठेवताच भक्तांच्या मानसिक व्याधी आणि शारीरिक दुःख नष्ट होतात.
पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या केडगाव येथे भीमा नदीच्या पात्रातील सुमारे ११ एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या या बेटाला सभोवताली भक्कम तटबंदी आहे. त्यातून प्रवेश करण्यासाठी दोन बुरूज असलेले प्रवेशद्वार आहे. येथून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात डेरेदार वृक्षांची दाटी असून येथे मंदिर कार्यालय, अन्नछत्र आणि मोठे सभागृह आहे. प्रांगणाच्या उजव्या बाजूला श्रीदत्त मंदिर आहे. त्यासमोर पहारेकऱ्यांची निवासस्थाने व साठवण कक्ष आहेत. पावसाळ्यात नदीचे पाणी वाढते तेव्हा हे स्थान चहुबाजुने पाण्याने वेढले जाते.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी श्रीदत्त मंदिराची रचना आहे. मूळ मंदिराच्या सभोवती सभामंडप नंतरच्या काळात बांधल्याचे सांगितले जाते. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. प्रत्येक चार स्तंभांमधील वितानावर मध्यभागी चक्रनक्षी आहे. सभामंडपात उत्सवकाळात वापरली जाणारी पालखी ठेवलेली आहे. बाजूला गुरुगादी आहे. पुढे सुमारे तीन फूट उंच जगतीवर मूळ मंदिर आहे. अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची मूळ रचना आहे. अंतराळात बाह्यबाजूने नक्षीदार स्तंभ आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले आहेत.
स्तंभांवरील हस्त, तोरण व वरील भाग नक्षीने सुशोभित आहे. स्तंभांवरील हस्तांवर देवी-देवता व साधूसंतांची शिल्पे आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस चतुर्भुज द्वारपाल शिल्पे आहेत. दोन्ही बाजूच्या द्वारपालांच्या हातात चवरी व चाबूक आहे. डाव्या बाजूच्या द्वारपालाच्या इतर दोन हातात दंड तर उजव्या बाजूच्या द्वारपालाच्या इतर दोन हातात पानपात्र व पाश आहेत. प्रवेशद्वारात नक्षीदार द्वारशाखा आहेत. द्वारशाखांवर खालील बाजूस चतुर्भुज विष्णू व लक्ष्मीची शिल्पे आहेत. ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. मंडारकापाशी चंद्रशिळा आहेत. प्रवेशद्वारावर गजलक्ष्मीसहित गंधर्व गायिका शिल्प आहेत.
गर्भगृहात वज्रपीठावर श्रीदत्त रूपात ब्रह्मा, महेश, विष्णू आहेत. सामान्य दत्त मूर्तीत ब्रह्मा, विष्णू, महेश असा क्रम असतो. परंतु येथील मूर्तीत महेश मध्यवर्ती असल्याने ही शैवप्रधान दत्तमूर्ती असल्याचे सांगितले जाते. मूर्तीच्या मागे चांदीची नक्षीदार प्रभावळ आहे. त्यात कीर्तिमुख, पताका, पद्म, शंख इत्यादी शुभचिन्हे आहेत. गर्भगृहाच्या बाह्यबाजूने अंतराळातून जाणारा प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या बाह्यभिंतीत तिन्ही बाजूस देवकोष्टके आहेत. त्यांत यमराज, वरुण व कुबेर या देवतांची शिल्पे आहेत.
गर्भगृहाच्या छतावर चौकोनी आकाराचे उंच व निमूळते शिखर आहे. शिखरात दीपकोष्टके व उरुश्रृंगी प्रकारची लघु शिखरे आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक आणि त्यावर कळस व ध्वजपताका आहे.
दत्त मंदिरापासून काही अंतरावर नारायण महाराजांचे समाधी मंदिर आहे. हेच नारायण महाराजांचे निवासस्थान होते. समाधी मंदिरासमोर तुळशी वृंदावन आहे. मुखमंडप व सभामंडप असे समाधी मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपात संगमरवरी आसनावर नारायण महाराज यांची संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे महाराजांच्या समाधीचा चौथरा आणि चौथऱ्याच्या मागे महाराजांचे रजत सिंहासन आहे. सिंहासनाच्या दोन्ही बाजूस चांदीची सिंह शिल्पे आहेत. वर चांदीचा मखर आहे. चौथऱ्याच्या उजव्या बाजूला महाराजांचा छताला टांगलेला पाळणा आहे. हा पाळणा अखंड हलत असल्यामुळे येथे महाराजांचे अस्तित्व असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
नारायण बेटावर वर्षभर विविध धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरे केले जातात. मार्गशीर्ष पौर्णिमेला होणारा दत्त जयंतीचा सोहळा येथील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. त्या आधी येणाऱ्या गुरुवारी येथे तब्बल साडेतीन किलो वजनाची हिरेजडित सुवर्णमूर्ती दर्शनासाठी बाहेर काढली जाते. अन्य वेळी सुरक्षिततेसाठी ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली जाते. या उत्सवाच्या सात दिवस आधी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केले जाते आणि पौर्णिमेच्या दिवशी पालखी सोहळा पार पडतो. आषाढ पौर्णिमेला होणारा गुरुपौर्णिमा उत्सव आणि महाशिवरात्रीला होणारे विशेष विधी भाविकांसाठी महत्त्वाचे असतात. ३ सप्टेंबर हा दिवस महाराजांचा पुण्यतिथी दिन म्हणून पाळला जातो आणि या दिवशी भजन-कीर्तनांचे आयोजन केले जाते. मंदिरामध्ये पहाटे ५ वाजता सुमधुर घंटानादाने दिवसाची सुरुवात होते. त्यानंतर पंचामृत पूजा व पादुकांवर रुद्राभिषेक केला जातो. महाराजांनी सुरू केलेली अन्नदानाची परंपरा आजही सुरू आहे. दररोज शेकडो भाविक येथे महाप्रसादाचा लाभ घेतात. रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.