श्री मार्तंड देवस्थान (खंडोबा)

जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे

‘जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार। मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर।।’ अशा शब्दांत बाराव्या शतकातील संत नरहरी सोनार यांनी ज्याची महती गायली ते देवस्थान म्हणजे पुण्याजवळील जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर. ‘येळकोट येळकोट जयमल्हार’ या जयघोषात व भंडाऱ्याची उधळण करत हजारो भाविक दररोज येथे खंडोबाच्या दर्शनाला येतात. विवाहानंतर वधू-वरांनी एकत्र येऊन येथील भंडारा कपाळी लावण्याची, तसेच नव्या नवरीला उचलून घेत नवरदेवाने जेजुरीगडाच्या काही पायऱ्या चढून जाण्याची प्रथा आजही पाळली जाते.

जेजुरी गावाच्या दक्षिणेकडील डोंगरावर खंडोबाचे मंदिर आहे. गडावर पूर्व, पश्चिम आणि उत्तर अशा तीन बाजूंनी पायरी मार्गाने जाता येते. उत्तर दिशेकडील पायरी मार्ग रुंद व रहदारीचा आहे. त्या मार्गावर, गडाच्या पायथ्याशी महाद्वाराच्या समोरच नंदीदेवाचे पंचखांबी मंदिर आहे. त्याच्या मूर्तीला भंडारा वाहून, त्याची पूजा करून भाविक गड चढू लागतात. तेथून मंदिरात जाण्यासाठी ३८५ पायऱ्या आहेत. या गडाला नऊ लाख पायरी आहेत, असे उल्लेख खंडोबागीतांतून येतात. मात्र, हा उल्लेख पायऱ्यांसाठी वापरण्यात आलेल्या चिऱ्यांच्या संख्येचा असावा. या मार्गावर आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांचा पुतळा, तसेच वीरभद्र, बाणाई, हेगडी प्रधान यांची छोटीमोठी मंदिरे लागतात. यातील बाणाईच्या मंदिरासमोर मेंढरांच्या अनेक दगडी प्रतिमा ठेवलेल्या दिसतात. रोज मध्यरात्रीनंतर खंडोबा बाणाईच्या भेटीस येतात, अशी लोकश्रद्धा आहे.

गडावरील मुख्य मंदिर हा वास्तुकलेचा एक सुंदर नमुना मानला जातो. मंदिराच्या सभोवती कोट आहे. तो अष्टकोनी असून त्यावर पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशांना प्रवेशद्वारे आहेत. उत्तरेच्या दरवाजावर देवाचा नगारखाना आहे. संपूर्ण कोटावर सज्जा असून कोटाच्या आतील बाजूंनी ६३ ओवऱ्या (कोट वा तटबंदीच्या आतील बाजूस असणाऱ्या कमानीवजा खोल्या) आहेत. या कोटाच्या पुनर्निर्माणाचे काम होळकरांनी केले.

भव्य अशा उत्तराभिमुख महाद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर समोर चार भव्य दीपमाळा दिसतात. दीपमाळांच्या डाव्या बाजूने पुढे गेल्यावर तटबंदीला टेकून उभी असलेली मल्लासुर दैत्याची भव्य मूर्ती दिसते. त्याच्यासमोरच दगडी बांधकामातील अष्टकोनी गाडीबगाड आहे. या बगाडावर भक्तगण पाठीवर गळ टोचून घेत असत.

श्री खंडोबा-म्हाळसा मंदिर पूर्वाभिमुख आहे. सदर, मंडप, गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिरासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव असून भाविक त्यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस करतात. या कासवाच्या पुढे चार पायऱ्या चढून मुख्य मंदिरात प्रवेश करता येतो. तेथे प्रथम सदर असून उंचावर दोन मोठ्या घंटा बांधलेल्या आहेत. मध्य गर्भगृहात उत्तर व दक्षिण बाजूस दोन दगडी घोडे आहेत. उत्तरेकडील घोड्यावर स्वार झालेली खंडोबाची मूर्ती आहे. येथेच बाहेर पडण्यासाठी उत्तराभिमुख दरवाजा आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उत्तरेस यक्षाची एक प्रतिमा आहे.

गर्भगृहात चौरसाकृती मेघडंबरी असून त्यात खंडोबा, म्हाळसा यांची लिंगे आहेत. मागे मार्तंड भैरवाची चतुर्भुज दगडी मूर्ती आहे. त्याच्या आसनाखाली मणि आणि मल्ल यांचे शिर व एक घोडा कोरलेला आहे. मार्तंड भैरवाच्या मूर्तीसमोर खंडोबा-म्हाळसादेवीच्या पाच जोड मूर्ती आहेत. त्यातील दक्षिणेकडील जोड नाना फडणवीस यांनी १७७४ मध्ये अर्पण केला होता. उत्तरेकडील जोड तंजावरचे व्यंकोजीराजे भोसले यांचे पाचवे वंशज शरीफजीराजे यांनी नवसपूर्ती म्हणून अर्पण केला होता. आजही या मूर्तींवर तसा उल्लेख आहे.

गर्भगृहात दक्षिणेच्या खोलीत देवाचे शेजघर असून तेथील उत्तरेकडील खोलीच्या तळघरात खंडोबाचे गुप्तलिंग असल्याचे सांगण्यात येते. मुख्य मंदिरातून बाहेर आल्यानंतर मागच्या भिंतीत एका कोनाड्यात कार्तिकस्वामींची मूर्ती दिसते. तसेच मंदिराच्या मागे तुळजाभवानीचे छोटे मंदिर आहे.

मंदिराच्या पश्चिमद्वारातून कडेपठारावर मार्ग जातो. कडेपठार हे खंडेरायाचे मूळ स्थान मानले जाते. तेथे जाण्यासाठी ७५० पायऱ्या आहेत. तेथे शंकर-पार्वतीचे स्वयंभू लिंग आहे, तसेच मार्तंड भैरवाची मूर्ती आहे. हे मंदिरही दगडी बांधणीचे आहे.

जेजुरीगडावरील या मंदिरांच्या इतिहासाचा सांधा थेट आठव्या शतकाशी जुळतो. त्या काळात येथे मंदिर बांधण्यात आले होते, असे सांगण्यात येते. त्यानंतरचे पुरावे तेराव्या शतकातील आहेत. इसवी सन १२४८ मध्ये वीरपाल व वीरमल्ल यांनी जेजुरी गड बांधल्याचे पुरावे एका शिलालेखावरून मिळतात. मुख्य मंदिराच्या सभामंडपाच्या बाहेर असलेल्या शिलालेखात तसा उल्लेख होता, असे सांगण्यात येते. हा शिलालेख आता अवाचनीय झाला आहे. सोळाव्या तसेच सतराव्या शतकात या मंदिराचा विस्तार, तसेच महाद्वारे आदी बांधकामे झाली. १७१२ साली येथे नवे मंदिर बांधण्यात आले. त्यानंतरही या मंदिराचे जीर्णोद्धार व विस्तारीकरण होतच होते. होळकर घराण्याचा त्यात मोठा सहभाग आहे. होळकर राजसत्तेचे संस्थापक मल्हारराव होळकर हे स्वतः खंडोबाभक्त होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जेजुरी नगरीच्या विकासात मोलाचा वाटा आहे. ऐतिहासिक होळकर तलाव, चिंचेची बाग, चिलावती कुंड आदी वास्तूंची निर्मिती त्यांनी केली.

माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्रीस मल्लेश्वराचे गुप्तलिंग असलेले मुख्य मंदिरातील तळघर आणि मंदिराच्या कळसात असणारे शिवलिंग उघडण्यात येते. स्वर्ग लोकातील शिवलिंग, पृथ्वीलोकावरील खंडोबा लिंग स्वरूपातील शिवलिंग आणि पाताळलोकातील गुप्त लिंग यांचे एकाच वेळी या मुहूर्तावर दर्शन घेण्याची पर्वणी भाविकांना मिळते.

सोमवती अमावस्या हा या गडावरील एक महोत्सव असतो. (सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात.) या पर्वकाळात गडावरून खंडेरायाची पालखी काढण्यात येते. भंडाऱ्याची उधळण, खंडेरायाचा जयजयकार करत छत्रचामरे, मानाचा अश्व यांसह पालखी प्रस्थान ठेवते. मल्हार गौतमेश्वर मंदिरावरून कऱ्हा नदीतिरी पापनाशन तीर्थावर पालखी नेली जाते. तेथे उत्सवमूर्तीसह भाविकही विधिवत स्नानाची पर्वणी लुटतात. त्यानंतर पालखी पुन्हा गडकोटात दाखल होते. तेथे रोजमुरा म्हणजेच चिमूटभर तृणधान्याचे वाटप होऊन सोहळ्याची सांगता होते. या काळात गडावर हजारोंच्या संख्येने भाविक येतात.

पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर साताऱ्यातील पाली येथे श्री खंडोबा आणि म्हाळसादेवी यांचा विवाह झाल्याची श्रद्धा आहे. त्याच्या स्मृत्यर्थ जेजुरीत मोठा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी यात्रा भरते.

यात्रेत मोठ्या प्रमाणावर गाढवांची खरेदी-विक्री होते. याशिवाय चैत्र शुद्ध पौर्णिमेला शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला होता, त्यानिमित्तही येथे मोठी यात्रा भरते. येथील यात्रांच्या वेळी लाल पागोटी गुंडाळलेल्या उंच काठ्या मिरवणुकीने गडावर येतात. त्या काठ्यांचा शिखरास स्पर्श घडविला जातो. नंतर त्या आपापल्या गावी परत जातात. नवरात्रीमध्येही येथे देवाचा मोठा उत्सव असतो. याशिवाय येथे सातत्याने येणारे भाविक तळी भरून, तसेच जागरण गोंधळ घालून आपल्या नवसांची पूर्ती करीत असतात. (तळी भरणे म्हणजे, एका ताटात कुळातील खंडोबा देवाचा टाक म्हणजेच देवघरातील पंचकोनी खंडोबाची मूर्ती, विड्याची पाने, सुपारी, खोबरे, भंडारा आदी वस्तू ताटात घेऊन ‘येळकोट येळकोट…’च्या गजरात विधिवत पूजा करून ते ताट मस्तकाला लावणे.)

उपयुक्त माहिती

  • पुण्यापासून ४९ किमी, सासवडपासून १७ किमी
  • राज्याच्या अनेक भागांतून जेजुरीसाठी एसटी सुविधा
  • पुण्यातून पीएमपीएमएल बसची सुविधा
  • खासगी वाहनांनी गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते
  • वयोवृद्ध तसेच अपंगांना गडावर जाण्यासाठी डोलीची सुविधा
Back To Home