भोरेश्वर मंदिर

भोर, ता. भोर, जि. पुणे

भोरच्या राजवाड्याला लागूनच निरा नदीच्या काठावर प्राचीन व भव्य भोरेश्वर मंदिर आहे. या मंदिरावरूनच शहराचे नामकरण झाल्याचे सांगितले जाते. जुन्या शैलीतील या मंदिराची रचना अत्यंत रेखीव आहे.

भोर संस्थानचे पंत सचिव श्रीमंत सदाशिव चिमणाजी यांच्या कार्यकाळात १७८३ मध्ये भोरेश्वर मंदिराची उभारणी करण्यात आली होती. यासाठी त्यांना १७ हजार रुपयांचा खर्च आला होता, अशा आशयाची पाटी मंदिरावर लावण्यात आली आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराला चारही बाजूंनी तटबंदी आहे. प्रवेशद्वाराच्या वरच सनई चौघडा वाजविण्यासाठी नगारखाना बनविलेला आहे.

प्रवेशद्वारातून काही पायऱ्या चढल्यावर समोरच नंदी मंडप आहे. चार खांबांवर असलेले हे नंदी मंडप सुरेख आहे. त्यातील विशालकाय नंदीची मूर्ती एकाच पाषाणातून घडविली असल्याचे जाणवते. नंदीच्या गळ्यातील आभूषणांवरही सुंदर नक्षीकाम आहे. मंदिराची व नंदी मंडपाची रंगसंगती सारखीच आहे. मंदिराच्या आवारातच भैरवनाथाचे मंदिर आहे. यातील काळ्या पाषाणातील भैरवनाथाची मूर्ती लक्ष वेधून घेते. मंदिराच्या समोरच्या बाजूला दीपमाळ आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला या परिसरात शेकडो दिवे लावून रोषणाई केली जाते.

मुख्य मंदिर काहीसे उंच दगडी जोत्यावर आहे. या जोत्यावरील दगडांमध्येही सुंदर फुलांची नक्षी आहे. मंदिरातील प्रवेशद्वारावर वरच्या बाजूला गणेशमूर्ती, तर खाली कीर्तिमुख आहे. आतमध्ये सभामंडप व गाभारा आहे. मंदिराचे छत संपूर्ण दगडी बांधकामात असून त्यावरही सुंदर नक्षीकाम दिसते.

मंदिराचे सभामंडप प्रशस्त असून त्याचे छत लहान होत जाणाऱ्या दगडी वर्तुळांचे आहे. या सभागृहामध्ये एकही खांब नाही. गाभारा काहीसा खोलगट आहे. तेथील शिवपिंडीवर फुलांची सजावट केली जाते. मंदिराच्या कळसावरचे नक्षीकाम नजरेत भरते. त्यासाठी विटा व चुन्याचा वापर झाला असावा, असे सांगण्यात येते.

महाशिवरात्री, कार्तिकी पौर्णिमा, श्रावणी सोमवारी या दिवशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. याशिवाय भोरेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे गोकुळाष्टमी व रामनवमी उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. भाविकांसाठी दिवसभर हे मंदिर खुले असते.

उपयुक्त माहिती

  • भोर बसस्थानकापासूनचे अंतर पायी दहा मिनिटांवर
  • पुणे ते भोर अंतर ५४ किमी
  • पुणे, मुंबईहून भोरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतातनिवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home