खंडेरायाच्या जेजुरी गडावरून खाली पाहिले असता एक भव्य गोलाकार तलाव दिसतो. या पेशवेकालीन तलावाच्या तटबंदीमध्येच जमिनीच्या पोटात दगडी बांधकामातील शंकराला समर्पित असलेले बल्लाळेश्वर देवस्थान आहे. जमिनीखाली सुमारे ५० फूट खाली असलेले हे ऐतिहासिक मंदिर वास्तुशास्त्राचा एक सुंदर ठेवा आहे.
जेजुरीच्या पूर्वेकडे जयाद्री डोंगर रांगेच्या पायथ्याशी पहिले बाजीराव पेशवे यांनी अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात सुमारे ३६ एकर जागेत या अष्टकोनी तलावाची निर्मिती केली. तलावाचे बांधकाम करतानाच या मंदिराची व पुष्करणीची निर्मिती करण्यात आली. या मंदिराला सभामंडप अथवा कळस नाही. आहे ती भलीमोठी पुष्करणी व गर्भगृहात शिवशंकराचे स्थान.
जेजुरी गडाच्या पायथ्यापासून पायी दहा मिनिटांवर असलेले हे मंदिर त्याच्या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. याशिवाय खंडेरायाच्या दर्शनाला येणारे अनेक भाविक या मंदिरातही आवर्जून दर्शनाला जातात.
परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळावे या उद्देशाने पेशव्यांनी या तलावाची निर्मिती केली. या शिवाय सैनिकांच्या शेकडो घोड्यांना पाण्याची सोय व्हावी, हाही उद्देश होता. जेजुरीच्या गडाच्या पायथ्याशी मराठ्यांना विश्रांतीसाठी थांबून पुढे जाता यावे, यासाठीही या ठिकाणाचा वापर होत असे.
या मंदिरात प्रवेश करतानाच भली मोठी सुंदर नंदीची मूर्ती आहे. नंदीच्या बाजूलाच चार अर्ध स्तंभ आहेत. यावरून काही वर्षांपूर्वी तेथे नंदीमंडप असावा, अशी शक्यता आहे. तेथून काही पायऱ्या उतरल्यावर पुष्करणीकडे जाता येते.
पुष्करणीच्या पश्चिमेकडे तलावाच्या भव्य तटबंदीमधील गर्भगृहात बल्लाळेश्वराची पिंडी आहे. काहीशी उंचावर असणारी ही पिंडी आकर्षक आहे. पुष्करणीच्या तटावरून येथे जाता येते. तलावातील पाणी हाताने घेऊन ते पिंडीवर सोडता येईल, अशी सोय येथे आहे. ही शिवपिंडी तलावाचे बांधकाम सुरू असतानाच सापडली होती, असे सांगितले जाते.
येथे सकाळी ५ व सायंकाळी ७ वाजता आरती होते. रुढार्थाने मंदिर नसल्यामुळे येथे भाविकांना कधीही देवदर्शनासाठी जाता येते. महाशिवरात्रीला तीन दिवस येथे उत्सव साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे आलेल्या भाविकांना भोजन दिले जाते.