तुकडोजी महाराज जन्मस्थान स्मृतीमंदिर

यावली शहीद, ता. जि. अमरावती

स्वातंत्र्यसैनिक, थोर समाजसुधारक आणि ‘ग्रामगीता’ या युगप्रवर्तक ग्रंथाचे प्रणेते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थान स्मृतीमंदिर विदर्भातील अमरावती तालुक्यातील यावली शहीद या गावी वसले आहे. गावाचा सर्वांगीण विकास हाच राष्ट्राच्या उन्नतीचा खरा पाया आहे, हा विचार मांडून तुकडोजी महाराजांनी स्वयंपूर्ण खेड्यांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आयुष्यभर लोकप्रबोधन केले. राष्ट्रपतिभवनात तुकडोजी महाराजांचे खंजिरी भजन ऐकल्यानंतर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधले होते. राष्ट्रसंतांचे मूळ जन्मस्थान असलेले हे स्मृतीमंदिर देशभरातील हजारो गुरुदेव भक्तांचे आणि राष्ट्रप्रेमींचे प्रमुख श्रद्धास्थान मानले जाते.

यावली गावाच्या नावाशी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील रक्तरंजित आणि बलिदानी इतिहास जोडलेला आहे. एस. व्ही. फिट्झगेराल्ड आणि ए. ई. नेल्सन यांनी संपादित केलेल्या १९११ च्या ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस डिस्ट्रिक्ट गॅझेटिअर्स : अमरावती डिस्ट्रिक्ट’ तसेच महाराष्ट्र शासनाने १९६८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या सुधारित अमरावती जिल्हा गॅझेटिअरमध्ये या परिसराच्या तत्कालीन सामाजिक, आर्थिक आणि ऐतिहासिक स्थितीविषयी नोंदी आढळतात. महात्मा गांधींनी ऑगस्ट १९४२ मध्ये पुकारलेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनाला यावली गावात मोठा प्रतिसाद मिळाला. १५ ऑगस्ट १९४२ पासून गावातील आंदोलनाने जोर धरला आणि स्वातंत्र्यसैनिकांनी राष्ट्रीय तिरंगा फडकवून ब्रिटिश सत्तेविरुद्ध उघड प्रतिकार केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १८ ऑगस्ट १९४२ रोजी सशस्त्र पोलीस गावात दाखल झाले. राष्ट्रध्वजाचे रक्षण करण्यासाठी जमलेल्या गावकऱ्यांशी संघर्ष झाल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. या संघर्षात बळीरामजी बोराडे, राजारामजी औरंगपुरे आणि कृष्णराव पवार यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी हौतात्म्य पत्करले. गणपतराव यावले हे गोळीबारात गंभीर जखमी झाले आणि त्यानंतर त्यांचाही मृत्यू झाला. स्थानिक स्मृतिपरंपरेत तुळशीराम तडस, मोतीराम पाचघरे, अकबरशाह आणि मैताबशाह यांच्यासह अन्य हुतात्म्यांचीही नावे आदराने घेतली जातात. या बलिदानाच्या स्मरणार्थ गावाची ‘यावली शहीद’ ही ओळख रूढ झाली. या काळात तुकडोजी महाराजांची देशभक्तीपर कवने आणि पदे स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा देत होती. ब्रिटिश सरकारने १९४२ मध्ये महाराजांना अटक केली. त्यांना प्रथम नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आणि नंतर रायपूर मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे घराणे वारकरी परंपरेशी जोडलेले होते आणि पंढरपूरचा विठ्ठल हे त्यांचे कुलदैवत मानले जात असे. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी यावली येथे झाला. त्यांचे मूळ नाव माणिकदेव बंडोजी इंगळे होते. लहानपणापासूनच भजन, ध्यान आणि साधनेची आवड असलेल्या माणिकने अमरावती जिल्ह्यातील वरखेड येथील सिद्ध संत समर्थ आडकोजी महाराज यांचे शिष्यत्व स्वीकारले. समर्थ आडकोजी महाराजांनी त्यांना प्रेमाने ‘तुकड्या’ अशी हाक मारली आणि त्यातून पुढे ‘तुकडोजी’ हे नाव रूढ झाले. त्यांनी रामटेक, सालबर्डी, रामदिघी आणि गोंदोडा परिसरातील अरण्यांत राहून तपश्चर्या आणि योगसाधना केली. संतपरंपरेतील आत्मज्ञानाला राष्ट्रभक्तीची जोड देत त्यांनी मानवकल्याण हे आपल्या जीवनकार्याचे ध्येय मानले. खंजिरीच्या तालावर त्यांनी गायलेली ‘आते है नाथ हमारे’ यांसारखी पदे १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरली. ‘ग्रामगीता’ या त्यांच्या युगप्रवर्तक ग्रंथाशिवाय ‘अनुभव सागर भजनावली’, ‘राष्ट्रीय भजनावली’, ‘सेवास्वधर्म’, ‘आनंदामृत’ आणि ‘लहर की बरखा’ यांसारखी साहित्यरचना त्यांनी केली. ग्रामविकास, मानवता, राष्ट्रसेवा आणि नैतिक जीवनाविषयीचे त्यांचे विचार आजही मार्गदर्शक मानले जातात.

तुकडोजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर त्यांच्या जन्मस्थानाचे पावित्र्य जतन करण्यासाठी आणि भावी पिढ्यांना त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने यावली शहीद येथे जन्मस्थान स्मृतीमंदिर उभारण्यात आले. पूर्वी या ठिकाणी महाराजांचे वडील बंडोजी बाबा आणि आई मंजुळाबाई यांचे साधे मातीचे, कौलारू घर होते. त्याच मूळ घराच्या जागेचा ऐतिहासिक वारसा जपत स्मृतीमंदिराचे निर्माणकार्य करण्यात आले. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि स्थानिक गावकऱ्यांच्या पुढाकारातून ही दुमजली वास्तू उभी राहिली.

यावली गावात पोहोचताच जन्मस्थान संस्थानकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोन उंच दगडी चौथरे उभारलेले दिसतात. त्यावर प्रत्येकी चार गोलाकार स्तंभ असून स्तंभांच्या माथ्यावर अर्धचंद्राकार तोरणांची स्वागतकमानीची रचना आहे. या कमानीतून पुढे आल्यावर काही अंतरावर जन्मस्थान स्मृतीमंदिराचे विस्तीर्ण आवार सुरू होते. मंदिरासमोरील प्रांगणात पेव्हर ब्लॉक बसवलेले आहेत. या प्रांगणात दुमजली इमारती बांधण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नियमित सेवा देणाऱ्या कार्यकर्त्यांची निवासस्थाने, देवस्थानचे प्रशासकीय कार्यालय, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बंदिस्त सभागृह आणि परगावाहून येणाऱ्या भाविकांच्या मुक्कामासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था आहे. स्मृतीमंदिराची मुख्य वास्तू दुमजली आहे. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी बाहेरील बाजूने पायऱ्या बांधल्या आहेत.

मंदिराच्या अंतर्भागाची रचना सभामंडप, अंतराळ, मुख्य गर्भगृह आणि तळघरातील दोन गर्भगृहे अशा क्रमाने आहे. बंदिस्त सभामंडपात नैसर्गिक प्रकाश आणि हवा खेळती राहण्यासाठी वातायने आहेत. डाव्या आणि उजव्या बाजूला बाहेर जाण्यासाठी दोन अतिरिक्त दरवाजे आहेत. सभामंडपात उजव्या हाताला तुकडोजी महाराजांच्या मूळ घराची प्रतिकृती साकारली आहे. यामध्ये ग्रामीण जनजीवनाचे दर्शन घडवणारी साधी कौलारू झोपडी, समोरील दगडी विहीर आणि जुन्या खेडेगावातील वातावरणाची प्रतिकृती उभी केली आहे. सभामंडपाच्या भिंतींवर महाराजांच्या जीवनप्रवासातील महत्त्वाचे प्रसंग दर्शवणारी छायाचित्रे तसेच त्यांच्या आई-वडिलांची चित्रे लावलेली आहेत. सभामंडपात एक लाकडी पाळणा टांगलेला आहे. जन्मोत्सवाच्या वेळी त्याचा वापर केला जातो. सभामंडपापेक्षा अंतराळाचा भाग उंचावर आहे. तेथे जाण्यासाठी डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी चार पायऱ्या आहेत. अंतराळात मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना काचबंद देवकोष्टकांत दगडी गजराज शिल्पे ठेवलेली आहेत.

अंतराळातून लाकडी झडपा असलेल्या प्रवेशद्वाराने मुख्य गर्भगृहात प्रवेश होतो. या गर्भगृहात संगमरवरी वज्रपीठावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पांढऱ्या संगमरवरी पाषाणातील ध्यानस्थ मूर्ती आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना पारंपरिक पितळी समया व लाकडी मांडणीवर महाराजांनी लिहिलेले ग्रंथ पूजेसाठी ठेवले आहेत. पीठाच्या अगदी समोर भाविकांना नतमस्तक होण्यासाठी संगमरवरी स्मृती चौथरा आहे. मुख्य गर्भगृहाच्या खाली तळघर आहे. त्यात उतरण्यासाठी सभामंडपातून अंतराळाच्या दोन्ही बाजूंच्या पायरीमार्गाने खाली जावे लागते. पहिल्या तळघरातील गर्भगृहात पीठावर तुकडोजी महाराजांचे वडील बंडोजी बाबा यांची संगमरवरी मूर्ती आहे. तेथून आणखी काही पायऱ्या उतरून दुसऱ्या तळघरातील गर्भगृहात पोहोचता येते. हेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मूळ जन्मस्थळ मानले जाते. या तळघरातील पीठावर बालरूपातील तुकडोजी महाराजांची संगमरवरी मूर्ती आणि त्यामागे मातोश्री मंजुळाबाईंची मूर्ती आहे. येथे एका देवकोष्टकात महाराजांचे गुरू संत आडकोजी महाराज यांची संगमरवरी मूर्ती आहे, तर गर्भगृहालगतच्या दुसऱ्या कक्षात मातोश्री मंजुळाबाईंचे पूर्णाकृती शिल्प साकारलेले आहे. स्मृतीमंदिराच्या बाह्य छतावर चारही बाजूंनी सुरक्षा कठडा व गर्भगृहाच्या माथ्यावर चौकोनी शिखर आहे.

स्मृतीमंदिरात नित्य पूजाविधी आणि सामुदायिक प्रार्थना शिस्तबद्ध रीतीने पार पडतात. भाविकांसाठी मंदिर दररोज पहाटे ५ वाजता खुले केले जाते. पहाटे ५:३० वाजता सामुदायिक ध्यान आणि प्रार्थना होते. त्यानंतर सकाळी ६ वाजता महाराजांच्या मूर्तीची प्रातःआरती केली जाते. सकाळी ६:३० ते दुपारी १२:३० या वेळेत भाविकांना जन्मस्थान आणि मूर्तींचे दर्शन घेता येते. दुपारी १२:३० ते ३:३० या वेळेत गर्भगृह दर्शनासाठी बंद राहते. दुपारी ३:३० वाजता मंदिर पुन्हा उघडल्यानंतर सायंकाळी ६:३० वाजता संध्या प्रार्थना आणि सामुदायिक आरती होते. रात्री ८:३० वाजता शयन आरती झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. नित्य दिनचर्येत ‘ग्रामगीता’ वाचनाची परंपराही नियमितपणे पाळली जाते.

मंदिरात दरवर्षी २३ एप्रिल ते ३० एप्रिल या काळात राष्ट्रसंतांचा जन्मोत्सव सप्ताह मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या उत्सवकाळात भजन, कीर्तन, प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि ‘ग्रामगीते’चे पारायण केले जाते. विविध भजनी दिंड्या आणि गायन स्पर्धांचेही आयोजन होते. ३० एप्रिल हा तुकडोजी महाराजांचा जन्मदिन असून या दिवशी मुख्य जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. या वेळी प्रबोधनपर पाळणे गायले जातात. उत्सवानिमित्त परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि महाप्रसादाचे वाटप केले जाते. याशिवाय आश्विन महिन्यात पुण्यतिथी महोत्सव तसेच प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी विशेष राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केले जातात.

उपयुक्त माहिती

  • अमरावती शहरापासून २४ किमी अंतरावर
  • बडनेरा रेल्वे जंक्शनपासून ३४ किमी अंतरावर
  • अमरावती व बडनेरा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात भाविकांच्या निवासासाठी देवस्थानचे भक्तनिवास उपलब्ध
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९५४५४१३७७७, ८८८८९४२२०१
Back To Home