श्री गुरु गजानन धाम

रेवसा रोड, अमरावती, ता. जि. अमरावती

विदर्भातील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या अमरावती शहराच्या ईशान्य भागात, रेवसा मार्गावर उभारलेले श्री गुरु गजानन धाम हे परिसरातील भाविकांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या समाधी मंदिराची आठवण करून देणारी वास्तुरचना, स्वच्छ परिसर आणि शांत वातावरण यामुळे स्थानिक भाविकांकडून या परिसराचा उल्लेख ‘अमरावतीतील शेगाव’ असाही केला जातो. शेगाव येथे माघ वद्य सप्तमीला प्रकटलेल्या गजानन महाराजांचा अमरावतीशीही जवळचा संबंध होता. ‘श्री गजानन विजय’च्या दहाव्या अध्यायात त्यांच्या अमरावती भेटींचा उल्लेख आढळतो. येथे माघ वद्य सप्तमीचा प्रकटदिन आणि भाद्रपद महिन्यातील ऋषिपंचमीचा समाधीदिन हे दोन प्रमुख वार्षिक उत्सव भक्तिभावाने साजरे केले जातात.

महाराष्ट्राच्या संतपरंपरेत शेगावचे श्री गजानन महाराज सिद्धयोगी आणि परमहंस संत म्हणून पूजले जातात. भक्तपरंपरेत त्यांना दैवी स्वरूप मानले जाते. ‘गण गण गणात बोते’ या मंत्राचा त्यांच्याशी अतूट संबंध आहे. त्यातून जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचा बोध घेतला जातो. महाराज २३ फेब्रुवारी १८७८ रोजी माघ वद्य सप्तमीला शेगाव येथे प्रथम लोकांच्या दृष्टीस पडले. संतकवी दासगणू महाराजविरचित ‘श्री गजानन विजय’मध्ये त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांचे वर्णन आहे. अमरावतीशी संबंधित प्रसंग दहाव्या अध्यायात, तर लोकमान्य टिळकांशी संबंधित अकोल्यातील प्रसंग पंधराव्या अध्यायात येतो.

अमरावतीचे नामवंत कायदेपंडित गणेश श्रीकृष्ण खापर्डे अर्थात दादासाहेब खापर्डे हे गजानन महाराजांचे भक्त होते. ‘श्री गजानन विजय’मध्ये महाराज अमरावतीला आले असताना खापर्डे यांच्या विनंतीवरून त्यांच्या घरी गेल्याचा उल्लेख आहे. १९०८ मध्ये अकोल्यात आयोजित शिवजयंतीच्या सार्वजनिक कार्यक्रमात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गजानन महाराज उपस्थित होते. ‘श्री गजानन विजय’च्या कथनानुसार हा कार्यक्रम वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाला. त्या सभेत टिळकांनी भाषण केले. चरित्रग्रंथातील कथनानुसार महाराजांनी त्या वेळी टिळकांना पुढे शिक्षा होण्याची शक्यता सूचित करणारे शब्द उच्चारले. टिळकांना त्याच वर्षी अटक झाल्यानंतर दादासाहेब खापर्डे यांनी कोल्हटकरांना गजानन महाराजांकडे पाठवले. महाराजांनी त्या वेळी टिळकांसाठी भाकरीचा प्रसाद दिला. पुढे टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालला आणि त्यांना सहा वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यांना मंडाले येथील कारागृहात पाठवण्यात आले.

रेवसा मार्गावर विस्तारलेल्या निवासी परिसरात २०१० च्या दशकात श्री गुरु गजानन धामचे संकुल विकसित झाले. स्थानिक पातळीवरील पुढाकारातून शेगावच्या उपासना परंपरेची आठवण करून देणारे हे केंद्र साकारण्यात आले. विस्तीर्ण परिसरात मंदिर, मोकळे प्रांगण आणि उद्यान विकसित करण्यात आले आहे. शांतता, शिस्त आणि स्वच्छता यांना महत्त्व देऊन मंदिर परिसराची रचना करण्यात आली आहे. रेवसा मुख्य रस्त्यावरून वसाहतीत प्रवेश करताना प्रथम मंदिराची उंच स्वागत कमान दृष्टीस पडते. डांबरी रस्त्यावरून पुढे आल्यावर चारही बाजूंनी तटबंदी असलेला मंदिर परिसर लागतो. दर्शनी भागात वाहनतळ आहे. मुख्य मंदिरासमोर मोकळे प्रांगण आणि धार्मिक अनुष्ठानांसाठी स्वतंत्र यज्ञकुंड आहे. आधुनिक बांधकाम पद्धतीत नागर स्थापत्यशैलीची प्रेरणा घेऊन ही वास्तू उंच अधिष्ठानावर उभारण्यात आलेली आहे.

मुखमंडपातून सभामंडपात प्रवेश करण्यासाठी आठ पायऱ्या आहेत. सभामंडपाची रचना अर्धखुल्या स्वरूपाची आहे. सभामंडपात प्रवेश करताच मध्यभागी काळ्या पाषाणातील कासव शिल्प दिसते. सभामंडपाच्या पुढे अंतराळाच्या दोन्ही बाजूंना सोंड उंचावलेल्या हत्तींची दोन शिल्पे आहेत. गर्भगृहाच्या लाकडी प्रवेशद्वाराच्या दोन्ही झडपांवर कोरीव नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात संगमरवरी वज्रपीठावर गजानन महाराजांची ध्यानस्थ मूर्ती आहे. मूर्तीमागे बारीक नक्षीकाम केलेली चांदीची प्रभावळ आहे आणि मस्तकावर नक्षीदार चांदीचे छत्र टांगलेले दिसते. गर्भगृहाभोवती बंदिस्त प्रदक्षिणामार्ग आहे.

मंदिराच्या बाह्य रचनेत सभामंडप आणि गर्भगृहावर स्वतंत्र शिखरे आहेत. दोन्ही शिखरांच्या बाजूंवरील देवकोष्ठांमध्ये विविध देवीदेवतांच्या मूर्ती बसवण्यात आलेल्या आहेत. गर्भगृहावरील शिखर इतर भागांपेक्षा उंच असून त्याभोवती लहान अंगशिखरांची रचना केली आहे. मंदिरासमोर आणि भोवतालच्या विस्तीर्ण प्रांगणात हिरवेगार उद्यान विकसित करण्यात आलेले आहे. उद्यानाच्या मध्यभागी तुळशीवृंदावन आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी ठिकठिकाणी बाकांची व्यवस्था आहे. उद्यानात वाघ, सिंह, हत्ती, माकड आणि सांबर अशा वन्यप्राण्यांच्या तसेच मोर, हंस आणि बदक यांसारख्या पक्ष्यांच्या विविधरंगी प्रतिकृती उभारल्या आहेत. या प्रतिकृतींमुळे बालकांना निसर्ग आणि वन्यजीवांची ओळख होते. बालकांसाठी घसरगुंडी आणि झोपाळे आहेत. नागरिकांसाठी खुल्या व्यायामाची साधनेही उपलब्ध आहेत. विविध औषधी वनस्पती, शोभेची फुलझाडे आणि हिरवळीमुळे परिसर प्रसन्न वाटतो. उद्यानाच्या एका भागात हनुमानाचे स्वतंत्र छोटे मंदिर आणि महाप्रसादासाठी अन्नपूर्णा मंडप उभारण्यात आला आहे.

श्री गुरु गजानन धामची दैनंदिन धार्मिक दिनचर्या पहाटेपासून सुरू होते. दररोज पहाटे ५.३० वाजता भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले होते. पहाटे ५.३० ते ६ या दरम्यान मंगलवादन होते. त्यानंतर पहाटे ६ ते ६.३० या वेळेत काकडा आरती केली जाते आणि लगेचच ६.३० ते ७ या वेळेत श्रींची षोडशोपचार पूजा व अभिषेक संपन्न होतो. ८ वाजता श्रींची सकाळची आरती होते. दुपारच्या सत्रात ११ ते ११.१५ या वेळेत श्रींची माध्यान्ह आरती करून नैवेद्य दाखवला जातो. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत श्री हरिपाठ आणि त्यानंतर ६.३० वाजता पुन्हा मंगलवादन होते. सूर्यास्तासमयी श्रींची सायंकालीन आरती केली जाते आणि शेवटी रात्री ९ ते ९.३० या वेळेत श्रींची शेजारती होऊन मंदिराचे दैनंदिन कामकाज थांबते. गुरुवारी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची विशेष गर्दी असते. या दिवशी पादुकापूजन आणि सामूहिक नामजपासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात.

या मंदिरात वर्षभर गजानन महाराजांच्या भक्तिपरंपरेशी संबंधित विविध उत्सव साजरे केले जातात. माघ वद्य सप्तमी हा श्री गजानन महाराजांचा प्रकटदिन येथील प्रमुख वार्षिक उत्सव आहे. या निमित्ताने श्रींचे विशेष पूजन व अभिषेक केला जातो. ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाचे सामुदायिक पारायण, भजन, हरिपाठ आणि महाप्रसादाचे आयोजनही केले जाते. भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमीला महाराजांचा समाधिदिन भक्तिभावाने साजरा केला जातो. गजानन महाराजांनी १९१० मध्ये ऋषिपंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली, अशी भक्तपरंपरा आहे. याशिवाय आषाढ पौर्णिमेचा गुरुपौर्णिमा सोहळा आणि मार्गशीर्ष महिन्यातील दत्तजयंतीही साजरी केली जाते. या प्रसंगी विशेष पूजन, भजन, कीर्तन आणि इतर कार्यक्रम आयोजित केले जातात.

उपयुक्त माहिती

  • अमरावती रेल्वे व एसटी बस स्थानकापासून ८ किमी अंतरावर
  • बडनेरा जंक्शन रेल्वे स्थानकापासून १५ किमी अंतरावर
  • अमरावती शहरातील प्रमुख भागांतून एसटी व ऑटो रिक्षांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : सुधीर वाकोडे , मो. ९६३७४१५११६, ८६६८३८०२४७
Back To Home