साईबाबा मंदिर

गुरुछाया कॉलनी, साईनगर, अमरावती, ता. जि. अमरावती

अमरावती शहरातील साईनगर, गुरुछाया कॉलनी परिसरातील साईबाबा मंदिर हे विदर्भातील हजारो साईभक्तांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते. ‘सबका मालिक एक’ आणि ‘श्रद्धा आणि सबुरी’ या तत्त्वांवर आधारलेली ही संतपरंपरा मानव कल्याणाचा संदेश देते. शिर्डीच्या मूळ मंदिराच्या धर्तीवर या मंदिराची रचना करण्यात आल्यामुळे परिसरातील भाविकांमध्ये हे मंदिर ‘प्रतिशिर्डी’ म्हणून ओळखले जाते. येथे दरवर्षी रामनवमी आणि विजयादशमी यांसारखे उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अमरावती शहराचे नाव येथील प्राचीन अंबादेवी मंदिरावरून अथवा मुबलक औदुंबराच्या वृक्षांवरून म्हणजेच उदुंबरावती या शब्दावरून पडल्याची नोंद अमरावती जिल्हा गॅझेटियरमध्ये आढळते. विसाव्या शतकाच्या अखेरीस अमरावती शहराचा विस्तार बडनेरा मार्गाच्या दिशेने वेगाने सुरू झाला. सन १९९५ ते २००० या कालखंडात साईनगर आणि गुरुछाया कॉलनी हा नागरी परिसर आकारास आला. याच काळात सहजपणे शिर्डीला जाणे शक्य नसलेल्या स्थानिक भाविकांना बाबांच्या दर्शनाचा लाभ मिळावा, या विचारांतून स्थानिक साईभक्तांनी एकत्र येऊन या मंदिराची पायाभरणी केली.

महाराष्ट्रातील संतपरंपरेत शिर्डीचे साईबाबा हे सर्वसमावेशक अध्यात्माचे प्रतीक मानले जातात. इ.स. १८५४ च्या सुमारास सोळा वर्षांचे एक तरुण तपस्वी शिर्डीतील कडुलिंबाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेले ग्रामस्थांना दिसले. हे स्थान पुढे गुरुस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले. काही काळानंतर तेथून निघून गेलेले बाबा पुन्हा १८५८ मध्ये चांद पाटील यांच्या नातेवाईकाच्या लग्नाच्या वऱ्हाडासोबत शिर्डीत आले. त्या वेळी खंडोबा मंदिराचे पुजारी म्हाळसापती यांनी ‘आओ साई’ या शब्दांत त्यांचे स्वागत केले आणि तेव्हापासून ‘साई’ हे नाव रूढ झाले. बाबांनी शिर्डीतील जुन्या पडक्या मशिदीत वास्तव्य केले. त्या वास्तूला त्यांनी द्वारकामाई असे नाव दिले. तेथे दिवाळीच्या वेळी वाण्याने तेल देण्यास नकार दिल्यावर बाबांनी पाण्याने दिवे पेटवले, तसेच अखंड पेटत्या धुनीतील उदीच्या माध्यमातून भाविकांचे रोगनिवारण केले, असा उल्लेख ‘श्री साईसच्चरित्र’ या चरित्रग्रंथात आढळतो. बाबांनी ‘सबका मालिक एक’ या विचारातून एकेश्वरवादाचा प्रसार केला आणि मानवांमधील भेदाभेद निरर्थक असल्याचे सांगितले.

शिर्डी येथे १५ ऑक्टोबर १९१८ रोजी, विजयादशमीच्या दिवशी साईबाबांनी समाधी घेतली. ‘जो मनापासून हाक मारेल, त्याच्या रक्षणासाठी मी सदैव पाठीशी उभा राहीन’ या बाबांच्या वचनावर जगभरातील भाविकांची अढळ श्रद्धा आहे. याच भावनेतून देश-विदेशात उभारल्या गेलेल्या अनेक मंदिरांप्रमाणेच अमरावतीच्या साईनगरमध्येही साई मंदिराची स्थापना झाली. स्थानिक नागरिकांच्या पुढाकारातून साधारण १९९५ ते २००० या कालावधीत साकारलेले हे मंदिर आज परिसरातील एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र म्हणून नावारूपाला आले आहे.
साईनगर चौकात रस्त्यालगत वसलेल्या या मंदिराला चारही बाजूंनी संरक्षक तटबंदी बांधलेली आहे. तटबंदीच्या कोपऱ्यावरील मुख्य प्रवेशद्वार वैशिष्ट्यपूर्ण दिसते. याशिवाय तटबंदीमध्ये डाव्या व उजव्या बाजूला आणखी दोन प्रवेशद्वारे आहेत. रस्त्याच्या पातळीपेक्षा उंचावर बांधल्यामुळे मुख्य प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी पायऱ्यांची सोय केलेली आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना चौथरे केले आहेत. त्यावर प्रत्येकी चार स्तंभ आणि स्तंभांवरील सज्जावर आमलकयुक्त घुमटाकार शिखरे आहेत. प्रवेशद्वारावर नक्षीदार महिरपी तोरण दिसते. प्रवेशद्वारातून आत मंडपात प्रवेश होतो. येथे भाविकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था केलेली आहे. येथून पुढे उपमंडपात प्रवेश होतो. या उपमंडपाच्या मध्यभागी बांधलेल्या चौथऱ्यावर शिवपिंड आणि नंदीची मूर्ती आहे. त्यापुढे असलेल्या सभामंडपाच्या दर्शनी भागात नक्षीदार स्तंभ व त्यावर तोरण कोरलेले आहे. हा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा असून नैसर्गिक प्रकाश व हवेशीरपणासाठी भिंतींमध्ये गवाक्षे बसवली आहेत. छताला काचेची झुंबरे लावली आहेत, तर दर्शनरांगेच्या व्यवस्थापनासाठी स्टीलचे कठडे बसवले आहेत. सभामंडपातील भिंतींवर साईबाबांच्या जीवनप्रसंगांच्या तसबिरी लावल्या आहेत.

सभामंडपाच्या पुढे चार स्तंभांच्या मध्यभागी गर्भगृह बांधले आहे. गर्भगृहातील चौथऱ्याभोवती संगमरवरी पाषाणातील जाळीदार कठडे आहेत. आत समाधीच्या चौथऱ्यावरील सिंहासनावर साईबाबांची पांढऱ्या संगमरवरातील मूर्ती आहे. वस्त्रालंकार ल्यायेल्या या मूर्तीच्या मस्तकावर चांदीचा मुकुट आणि वर चांदीचे छत्र आहे. मूर्तीमागील भिंतीवर मयूरतोरण व पानफुलांची नक्षी असलेली चांदीची प्रभावळ लावली आहे. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणामार्ग आहे. प्रदक्षिणामार्गावरील भिंतींवरही बाबांच्या विविध तसबिरी लावल्या आहेत. मंदिराच्या छतावर सुरक्षा कठडा व गर्भगृहाच्या छतावर वरच्या दिशेने निमुळते होत गेलेले चौकोनी शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक, कलश आणि धर्मध्वज आहे.

दररोज सकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते. दर गुरुवारी पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. या दिवशी मूर्तीवर अभिषेक, नैवेद्य आणि विशेष पूजेचे आयोजन केले जाते. शिर्डीच्या मंदिराप्रमाणेच येथे वर्षभरात विविध धार्मिक उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. चैत्र महिन्यातील रामनवमी हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मानला जातो. त्यानिमित्ताने मंदिरात भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे वाटप केले जाते. आश्विन महिन्यातील विजयादशमी हा साईबाबांचा समाधी दिन पुण्यतिथी उत्सव म्हणून भाविक साजरा करतात. याशिवाय आषाढ पौर्णिमा, गुढीपाडवा आणि दिवाळी या सणांच्या वेळी मंदिरात विशेष विद्युत रोषणाई केली जाते.

उपयुक्त माहिती

  • बडनेरा जंक्शन व अमरावती रेल्वे स्थानकापासून ६ किमी अंतरावर
  • अमरावती मध्यवर्ती बस स्थानकापासून (राजापेठ) ४ किमी अंतरावर
  • शहरातील विविध भागांतून एसटी, ऑटोरिक्षा व वाहनांची सोय
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध
Back To Home